एक रखरखीत दुपार मराठी निबंध| Mi Anubhavleli Dupar Marathi Nibandh
डोक्यावर विजेचे पंखे भिरभिरत होते. कुठे थंड पाण्याच्या सहवासात फिरणारे ‘रूम कूलर' त्या रखरखीतपणावर मात करीत होते. बहुतेक दारे, खिडक्या वाळ्याच्या पडदयांनी सज्ज झाल्या होत्या. तरी आतील मानवी समाज कुरकुरत होता, 'काय उकडत आहे!
काळाकुळकुळीत डांबरी रस्ता उन्हाने तळपत होता. जणू संतप्त सहस्ररश्मींचा काही गुन्हाच त्याने केला होता. उन्हाने हवालदिल झालेल्या रस्त्याचे काळे अंतःकरण आता द्रवू लागले होते. त्या रस्त्याला काटकोनात छेदणारा बोळ सुद्धा उदास आणि एकाकी दिसत होता. नेहमी तेथे 'विटीदांडूचा खेळ' किंवा 'क्रिकेटचा गेम' रंगलेला असतो. पण आज चिटपाखरूही त्या गल्लीबोळात दिसत नव्हते. आता पाऊण एक महिना त्या गल्लीला दुपारचा असाच एकाकीपणा साहावा लागणार होता.
त्या सून्न वातावरणाचा भंग करणारा आवाज झाला, "भांडीऽऽ, बाई, भांडी घ्या." त्या बाईच्या डोक्यावरील भल्यामोठ्या टोपलीत भांडी होती व त्यांवर जून्या कपड्यांचे बोचके ठेवलेले होते. उन्हाने थकलेली ती, पाण्याचा नळ शोधीत असावी. मी तिला हाक मारली आणि थंडगार पाण्याचा ग्लास पूढे केला. "अग, कशाला हिंडतेस या रणरणत्या दुपारी?" "बाई, दुपार नाही पाहिली तर संध्याकाळ कशी गवसायची!" तिच्या एकाच वाक्याने केवढे विदारक सत्य उघड केले. ही रखरखीत दुपार आपल्याला जीवनातील रखरखीतपणा सहन करण्याचे सामर्थ्य देत असते, असेच जणू ती सांगू पाहत होती.
एखादया शीघ्रकोपी दुर्वासाचा संताप शांत झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील रेषा जशा सुरकुतत जातात, तसा या दुपारचा 'ऐनपणा' संपल्यावर ही सुद्धा सुरकुतू लागते. घड्याळाचे काटे पाचाकडे सरकले की ही चवताळलेली महामाया दोनप्रहरी शांत होऊ लागते आणि सुस्तावलेले वारेही ये-जा करू लागतात. सहस्ररश्मी आपले चाबूक आवरते घेतो. मग घरात लपलेली माणसे बाहेर येतात. तापलेल्या धरतीला थंड करण्यासाठी पाण्याचा मारा करतात.
सुखद संध्याकाळ अवतरते तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी वेलींवर सुवासिक सायली, जाई, जुई हसू लागतात. दुपारनंतर येणारी ही सुसहय संध्याकाळ जणू मानवांना सांगत असते, “अरे, जीवनातही अशी चटके देणारी दुपार संपली ना, की रम्य, शांत संध्याकाळ निश्चित अवतरते!"
वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- मी पाहिलेली दुपार निबंध
- माझी मे महिन्यातील दुपार निबंध मराठी
- mi anubhavleli dupar marathi nibandh 9th
- mazi may mahinyatil dupar varnanatmak
- dupar essay in marathi