सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi

सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi

निबंध 1

सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi : आमच्या एका विज्ञाननिष्ठ आजींनी त्यांच्या अंगणात सूर्यचूल केली होती. ती पाहण्यासाठी आम्ही आजींकडे गेलो होतो. आजींनी आम्हांला चुलीचे प्रात्यक्षिक दाखविले आणि मग आजी म्हणाल्या, “आता गॅसवाल्यांनी संप केला तरी मला चिंता नाही." 

आजीचं वाक्य संपलं नाही, तोच चिमुरडी अस्मिता म्हणाली, “आणि आजी, सूर्यानेच संप केला तर ग-?" सूर्याने संप केला तर आजींची सूर्यचूल पेटणार नाही हे तर खरेच! पण सूर्याने संप केला तर

मात्र आळशी माणसाला काही काळ बरं वाटेल. कारण सूर्य आकाशात येणार नाही म्हणजे दिवसच उगवणार नाही. रात्रीचे राज्य संपणारच नाही. मनसोक्त लोळत पडावे. पण अहो लोळणार तरी किती! आणि लोळत पडलो तरी भूक लागायची ती लागणारच. म्हणजे उठायला हे हवेच. दिवे लावून कामाला सुरुवात केली, तरी असे किती वेळ दिवे लावणार? 

शाळा, महाविदयालये, कचेऱ्या, घरीदारी सगळीकडे सतत विजेचा वापर केल्याने लवकरच विजेचा तुटवडा भासू लागेल. मग सरकारपूढे मोठा प्रश्न पडेल.

असा हा एकच प्रश्न नव्हे. सूर्याच्या संपामुळे अनंत प्रश्न निर्माण होतील. सूर्याचा संप बेमुदत सुरू राहिला तर भूलोकावरील मानवी जीवन दुःसह होईल. अहो, सूर्याला प्रकाश नाही म्हणजे चंद्रालाही प्रकाश नाही. कारण चंद्र पडला परप्रकाशी. सूर्याने सांडलेले तेजोकण वेचून हे रावजी रुबाब दाखविणार. पण सूर्याचीच जर पूर्णपणे अनुपस्थिती राहिली तर सर्वांचेच कार्य स्थगित होईल. 

चंद्र नाही, चांदण्या नाहीत, चंद्रप्रकाशही नाही. मग सागराला भरती कशी येणार? कवींच्या काव्याला स्फूर्ती कोठून येणार? बागेतील फुले, तळयातील कुमुदिनी कशा फुलणार? प्रेमिकांना सुंदर स्थळे कोठे गवसणार? हो, एक मात्र खरे की, यामुळे फावेल फक्त चोरांचे. कारण त्यांना हव्या असणाऱ्या अंधाराचेच सर्वत्र साम्राज्य असेल.

चंद्र, चांदण्या, कवी आणि त्यांच्या कविता या झाल्या साऱ्या रम्य गोष्टी! त्यांच्याविना फार मोठे अडणार नाही. पण जर का मुंबईच्या गिरणी कामगारांसारखा सूर्य जर बेमुदत संपावर गेला तर... हळुहळु या भूलोकावर थंडी वाढू लागेल आणि मग दिवसेदिवस तिचे प्रमाण वाढतच जाईल. त्यामुळे सारी सजीव सृष्टी धोक्यात येईल. कृत्रिमरीत्या आवश्यक तापमान, ऊब निर्माण करण्यासाठी संशोधन सुरू होईल. पण संकटे कधी एकटी येत नसतात. तापमानपाठोपाठ प्रश्नचिन्ह उभे राहील ते प्राणवायूचे. 

सूर्यप्रकाश नाही म्हणजे प्राणवायू नाही. मग श्वासोच्छ्वास कसा करणार? प्रत्येक माणसाला आपल्याजवळ आवश्यक तापमानसाठी सिलिंडर, कृत्रिम प्राणवायूचा सिलिंडर बाळगावा लागेल. त्यामुळे हे सिलिंडर तयार करणाऱ्या कंपन्या वाढू लागतील. मग त्यांचाही काळाबाजार-चक्क काळोखात सुरू होईल.

सूर्यप्रकाश आणि प्राणवायू यांचा अभाव याचा परिणाम सर्व प्राणिजीवनावर होईल. वनस्पती खुरटतील; पाने, फुले, फळे गळू लागतील. वनस्पतींचे जीवन धोक्यात येईल. निसर्गाचा समतोल धोक्यात येईल. सूर्याचे ऊन नाही म्हणजे बाष्पीभवन होणार नाही. त्यामुळे पाऊसही पडणार नाही. मग या भूलोकावर उरेल फक्त संहार. त्यामुळे सृजनतेचा अवशेषही राहणार नाही. पुन्हा ही वसुधा एक निर्जन, ओसाड असा एक गोळा होऊन राहील.

हे सारे टाळायचे म्हणजे सूर्याचा संप संपायला हवा. त्यासाठी कोणाशी बोलणी करायची? विचारवंत विचार करू लागले. त्यासाठी अंतराळाचा वेध घेतला जाऊ लागला. नवीन एखादा सूर्य सापडतो का? नाहीतर आपणच एखादा सूर्य तयार करावा का?

इतका वेळ गप्प राहिलेली वसुधाताई उठली. आपल्या पोरांचा उद्दामपणा तिला असह्य झाला. ती भावनांनी कंपित झाली व पदर पसरून तिने सूर्यदादाला विनविले. तेव्हाच सूर्य परत उगवला आणि माणसाचा दिवस परत सुरू झाला.

वरील निबंध सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 
धन्‍यवाद


निबंध 2 


 सूर्य संपावर गेला तर 


सूर्य....ज्याच्याबरोबर जीवनाचीही पहाट होते,जीवनाची रंगत वाढते , जीवनात चैतन्य बहरते, वेळेची मर्यादा कळते ...... असा सूर्य ..... आपला 'मित्र', सखा, सोबती..... हा सूर्यच संपावर गेला तर ..... नाचतबागडत दफ्तराचे ओझे घेऊन घरी आलो होतो.शेजारची सुमी आली. मला म्हणाली, "ए, तुला एक प्रश्न विचारू का?'' मी उत्तरलो "विचार'' ती म्हणाली, "सूर्य संपावर गेला तर काय होईल?'' 


मित्रहो, तिच्या या एका प्रश्नानेच जणू अख्खं आभाळ त्या सूर्याविना काळोखाचं रूप घेऊन माझ्यावर कोसळलं, इतका मी जोराचा दचकलो. मोठे डोळे करून सुमीला म्हणालो, "बावळट कुठली! काहीही विचारतेस.'' माझ्या धपाट्याच्या धाकानं सुमी पळून गेली . पण मी मात्र विचारात गुंग झालो. खरचं , सूर्य संपावर गेला तर .... तर....?
पृथ्वीवर रात्र-दिवस होतात. सूर्य उगवतो प्रकाशाच्या साक्षीने अन् मावळतो अंधाराचे बोट धरूनच. हा निसर्गनियम आहे. 


सूर्य हा निसर्गाने बहाल केलेला गोळा आहे. तो सोनेरी आहे. जीवनाला सोनेरी मुलामा देण्यासाठी जणू तो रोज येतो. सूर्य मावळला की दिवसभराची त्याच्याबरोबर चाललेली आमची कामेही थांबतात आणि आम्ही सूर्य परत उगवेपर्यंत निद्राधीन होतो, हे सत्य आहे. असा हा सूर्य संपावर गेला तर पृथ्वीवर काळोखाचे साम्राज्य येईल. 


सृष्टीचक्राची गती बंद पडेल. निसर्गाचा समतोल बिघडेल. सूर्याची उष्णता न मिळाल्याने पाण्याची वाफ होणार नाही , बाष्पीभवन नाही तर पाऊसही नाही. पाऊस नाही तर झाडे नाहीत, अन्न नाही, पाणी नाही. सर्जनता लोप पावेल. सर्वत्र उजाड माळरान दिसेल. वसुंधरेचं हिरवंगार मोहक रूप दिसणारच नाही. झाडांना अन्न बनविण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. तो न मिळाल्याने झाडे जगणार नाहीत . हळूहळू सजीव सृष्टी नष्ट होत जातील.


सूर्य संपावर गेला तर उद्योगधंदे, शेती, औद्योगिक प्रगती या शब्दाला अर्थच उरणार नाही. अंधाराचे राज्य आल्याने विजेचा वापर सातत्याने होऊन तीही संपेल कृत्रिमता किती दिवस साथ देईल? काळ्याकुट्ट अंधारात चोऱ्या वाढतील.

 'दिवस उगवला की काम सुरू करणारी बायामाणसे आळशी बनतील. काम न करता झोपाच घेतील. रस्ते ,कचेऱ्या , कार्यालये हळूहळू अस्तित्वहीन होतील. आहे ते अन्नधान्य मिळविण्यासाठी प्रत्येक जण अधाशी होईल , एकमेंकांच्या नरडीचा घोट घेईल.


सूर्य, चंद्र, आकाश , आकाशातील रंगाची जादू, पक्ष्यांच्या माळा हे सारे सौंदर्य लुप्त होऊन जाईल. सूर्यकिरणांच्या स्पर्शाने उमलणारी कमळे उमलणार नाहीत. फुले , झाडे, नाहीत तर पृथ्वीच्या जीवनात रसच उरणार नाही . उष्णतेच्या अभावामुळे थंडी वाढेल . तुम्ही कृत्रिम उपाय काय काय करणार व किती दिवस करणार?


'कुठे उडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा?'
असा प्रश्न मनात घेऊन त्या सूर्याविना मातिमोल झालेल्या या जीवनाचे सोने करणेच अशक्य. त्या सूर्याला संप मागे घ्यायला लावण्यासाठी त्याची प्रार्थना करून परत त्याला येण्यास भाग पाडणे यापेक्षा शहाणपणाचा दुसरा मार्ग खचितच उरणार नाही. हे शंभर टक्के खरे!


वर्षानुवर्षे सूर्याला देव मानून मानव त्याला नमस्कार करीत आला आहे. चैतन्याचे सडे, मंगलमय आरती , पक्ष्यांचे कुजन , सिंदूरी गगन , उमलते जीवन हे सारं परत घेऊन हा 'मित्र' येइलच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 3


सूर्य संपावर गेला तर मराठी निबंध | Surya Sampavar Gela Tar Essay In Marathi

सूर्य संपावर गेला तर.... माझे मलाच हसू आले...सूर्य संपावर जाणार ? कशासाठी ? सूर्य काय मागण्या मागेल ?...रोज प्रत्येकाने बारा सूर्य नमस्कार घातले पाहिजेत ! सूर्यफूल हे आंतरराष्ट्रीय फूल मानले पाहिजे ! 'सूर्यशक्ती'चा जास्त प्रमाणाबाहेर वापर केल्यास ओव्हर टाइम मंजूर केला पाहिजे. 

पृथ्वीवर कुठेतरी दिवस लहान व रात्र मोठी असते ना ! त्याप्रमाणे दिवस सर्वत्र लहान ठेवला पाहिजे. मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, पृथ्वी वगैरे ग्रहांनी रविकरांच्या वापराबद्दल दरमहा कर भरला पाहिजे?
सूर्य संपावर गेला तर...तो कामावर आलाच नाही तर...आकाशात संचार करण्याऐवजी तो आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी पूर्व दिशेच्या क्षितिजापाशीच धरणे धरून बसला तर..

.
खरंच ! मोठा प्रश्नच आहे ! सूर्य जर दडून फुरंगटून बसला तर-सर्वत्र अंधकार.... काळोख...रात्रीचे साम्राज्य पसरेल, चराचर विश्वाचे सर्व व्यवहारच थंडावतील. पण तो पूर्वेच्या, डोंगरावरच धरणे धरून बसला तर...? संपावर गेलेले कामगार व पुढारी नाही का मंत्रालयापाशी धरणे धरून बसतात ! तसाच प्रकार होईल. 


रोजच्या रोज चोवीस तास आपला प्रभातकाळ ! सकाळचे सात वाजोत, दहा वाजोत किंवा दुपारचे बारा वाजोत ! सूर्य आपला उगवतीच्या डोंगरावर ! दुपार होवो, संध्याकाळ होवो....रात्र होवो !....होवो काय ? दुपार, संध्याकाळ रात्र होणार कशी ? सूर्य कायम तिथेच ! उगवतीच्या डोंगरावर !


 मग दुपार, बंद ! संध्याकाळ बंद !! रात्र बंद !!! हा ! आता आलो बरोबर ताळ्यावर ! अहो संप म्हटल्यावर काम बंदच. सूर्य संपावर म्हटल्यावर काय ? दिवस, रात्र, महिनोन् महिने सर्व काही बंद, बंद, बंद ! अरे हो, पण एक प्रश्न आहे ! सूर्य मोर्चा कुठे काढणार ? युनियन कोणती पत्करणार ? 


आकाशात दत्ता सामंतांचं साम्राज्य यायला अजून अवकाश आहे ! आणि युनियन नाही, मोर्चा नाही, मूक हरताळ नाही, तर संप कसला ? सूर्य कोणाच्या युनियनमध्ये सामील कसा होणार ? तोच नेता ! मंगळ, बुध, गुरू शुक्र, शनी, यांना उलट तो आपल्या युनियनचे सभासद करून घेईल ! 


चंद्र सूर्याचा कार्यवाह बनेल ! आणि ते राहू केतू ! ते हरामखोर फुटीर गटाचे का ? काळतोंडे लेकाचे ! आपले तोंड काळे तर काळेच ! शिवाय सूर्यचंद्रांच्या तोंडालाही काळोखी फासणारे ! फूटपाडे सूर्याजी पिसाळ ! छे! छे ! सूर्याजी हे नाव नाही उपयोगाचे ! नाव बदलायलाच हवे !


पण सूर्य जर युनियन लीडर म्हटले
तर मालक कोण ? या विश्वाचा चालक कोण ! या जगताचा कार्यकारी संचालक (Managing Director) कोण ? सूर्याच्या प्रकाशावर त्याच्या उदयास्तावर, त्याच्या कर्क, मकर संक्रमणावर एवढेच काय त्याच्या ग्रहणावरसुद्धा हे विश्वकमळ आजवर जिवंत आहे, वाढत आहे...


व विकसित होत आहे, फुलत आहे ! मग सूर्य कामगार नेता कसा ? तो तर विश्वाचा चालक, मालक व पालक आहे. कमाल आहे ! अहो मालक कधी संपावर गेलाय का आजपर्यत ? काय कल्पना पण ? म्हणे सूर्य संपावर गेला तर....? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद