यंत्रयुगाचे परिणाम किंवा यंत्र हे माणसास वरदान आहे | ESSAY ON MACHIN ERA IN MARATHI
यंत्रयुगाचे परिणाम किंवा यंत्र हे माणसास वरदान आहे | ESSAY ON MACHIN ERA IN MARATHI : यंत्रयुगातील मानव दसरा-दिवाळीची खरेदी करण्यात लोक मश्गुल होते. मी बाजारात फेरफटका मारीत असता दोन स्त्रियांचा संवाद सहज कानांवर आला. “काय ग! दिवाळीची काय खरेदी केलीस?"
"मी ना, 'ओव्हन' घेतला.' “अय्या, हो!" दुसरीने आश्चर्यमिश्रित आनंद व्यक्त करताना म्हटले, “मी मिक्सर घेतला.' माझ्या मनात आले, पूर्वी लोक दसरा-दिवाळीला सोने-चांदी घेत; पण आताच्या या आधुनिक ललनांनी त्याऐवजी आपल्या स्वयंपाकघरातील यंत्रे घेतली. यंत्रयुगातील या महिला खरोखरच यंत्रमय झाल्या आहेत.
आज या यंत्रयुगात पावलापावलाला माणसाला यंत्राची आवश्यकता भासते. हा माणूस सकाळी जागा होतो तो कोंबड्याच्या आरवण्याने नाही; तर घड्याळाच्या गजराने. घड्याळ बंद पडले, गजर झाला नाही तर त्याला उठण्यास उशीर होतो, कामावर जाण्यासही त्याला कुठल्या ना कुठल्यातरी यंत्राची मदत घ्यावी लागते. रेल्वेगाडी, बस, स्कूटर वा मोटार. ही साधने तर माणसाच्या जीवनाची अविभाज्य भाग बनून राहिली आहेत. यंत्रे रुसली तर तो ऑफिसात जाऊ शकत नाही.
आकाशाला भिडणाऱ्या इमारतीत वर जाण्यासाठी त्याला लिफ्टची मदत घ्यावी लागते. कचेरीत काम करताना त्याला टाइपरायटर लागतो. दूरध्वनीवर तो आपले निरोप पाठवितो. संध्याकाळी परत आल्यावर त्याला करमणूक हवी असते, ती त्याला नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट यांद्वारे प्राप्त होते. त्याचा उन्हाळा दूर करतो 'एअर-कंडिशनर', तर त्याची थंडी अडवितो 'रूमहिटर.'
शेतीतील अमाप पीक, हरितक्रांती, श्वेतक्रांती या सर्वांचे रहस्य यंत्रांतच आहे. कारखान्यांतील अचाट उत्पादन यंत्रांद्वारेच पार पडत असते. एकूण काय, माणसाची घोडदौड यंत्रांमुळेच चालू आहे. माणसाला अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी शक्य झाल्या त्या यंत्रांमुळेच. मग यंत्र हे माणसास वरदानच नाही का? यंत्रांमुळे आज सारे जग जवळ आले आहे.
जगात कोठेही खुट्ट वाजले की दुसरीकडे कळते. भारतातील आपत्तीच्या वेळी साऱ्या जगातून मदत येऊ शकते. चंद्रावर पोहोचलेला माणूस भूलोकावरील माणसाशी बोलू शकतो. आज वैदयकीय क्षेत्रात जी प्रगती झाली आहे त्यामध्येही यंत्राचीच मदत आहे. अंतराळात व समुद्राच्या अंतर्भागात माणूस जाऊन पोहोचला ते यंत्र हे वरदान लाभल्यानेच. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, “सर्व प्राण्यांत माणूस हा दुबळा प्राणी, पण यंत्रांनी त्याची शक्ती वाढविली आणि तो सर्व प्राण्यांत प्रबळ झाला."
आज आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा असे आढळते की, माणस आता पूर्णपणे यंत्रावरच अवलंबून आहे. मग कोणी म्हणतात की, 'आजचा हा माणूस यंत्राचा गुलाम झाला आहे'. 'माणसाने स्वतःच्या सूखासाठी यंत्रे तयार केली; पण आज ही यंत्रेच माणसावर आधिपत्य गाजवीत आहेत. असे हे टीकाकार म्हणतात. कॉम्प्यूटरसारख्या यंत्रामुळे आणि यंत्रमानवामुळे सर्व जगातच बेकारीचा भस्मासूर थैमान घालणार की काय, असा आज प्रश्न पडला आहे. हा यंत्रमानव घरे स्वच्छ करतो, रस्त्यावरच्या रहदारीवर नियंत्रण ठेवतो, हॉटेलमध्ये वेटरचे काम देखील करतो.
मानव यंत्राचा गुलाम झाला आहे, असा आक्षेप घेणाऱ्यांना आठवण दयावीशी वाटते की या अवाढव्य यंत्रांची छोटीशी कळही नियंत्रणाखाली असते ती माणसांच्याच. अंतराळात जाऊन चंद्राचे फोटो काढणाऱ्या अंतराळयानावरही नियंत्रण असते ते पृथ्वीवरच्या माणसाचेच. फक्त यंत्राचाच सतत विचार करणाऱ्या या माणसाच्या बाबतीत एकच भीती वाटते की, हा माणूस यंत्राच्या आहारी जाऊन आपल्यातील माणूसपण हरवून बसणार नाही ना! प्रेम, करुणा, भक्ती, श्रद्धा, निष्ठा या सगळ्या मानवी भावना यंत्रांच्या खडबडाटात हरवून तर जाणार नाहीत ना?
वरील निबंध यंत्रयुगाचे परिणाम किंवा यंत्र हे माणसास वरदान आहे | ESSAY ON MACHIN ERA IN MARATHI हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद