वृतपत्रा मराठी निबंध | Essay on newspaper in marathi
वृतपत्रा मराठी निबंध | Essay on newspaper in marathi : वा वृतपत्रा, तुला माझे वंदन असो. तुला आमच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. आमची रोजची सकाळ तुझ्यामुळेच उत्साही ठरते. हातात तू असलास की समोरील चहाची लज्जत वाढते वृत्तपत्रा, तू असलास की आम्हांला चहासोबत खारी, गोडी कोणतीही बिस्किटे लागत नाहीत कारण वृत्तपत्रा, तू आम्हांला षड्रसयुक्त खादय पुरवत असल्यामुळे इतर वस्तू तुझ्यापुढे नगण्य ठरतात.
हे वर्तमानपत्रा, तुला अनेक नावे प्राप्त झाली आहेत. तू दररोज प्रसिद्ध होतोस म्हणून तुला 'दैनिक' म्हणतात. आठवड्याने प्रसिद्ध झालास तर तुला 'साप्ताहिक' म्हणतात. पाक्षिके, मासिके ही तुझी भावंडेच आहेत. वृत्तपत्रा, तुझा वारसा फार मोठा आहे. फार पूर्वी सत्ययुगात या भूलोकावरील वार्ता भगवान नारदमुनी परमेश्वरापर्यंत पोहोचवीत. युगामागून युगे गेली तसे तुझे रंग, रूप, आकार बदलत गेले. पण तुझे कार्य तसेच चालू आहे, त्याचा क्षणोक्षणी विकासच साधत आहे. नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या तुझ्या सख्ख्या बहिणी. त्या तुझेच कार्य करतात, थोडीशी पुढची आवृत्ती. एक वार्ता ऐकवते, तर दुसरी वार्ता ऐकवते आणि दाखवते देखील. पण तुझे कार्य अधिक मोलाचे ठरते. कारण आम्ही आमच्या सवडीनुसार तुझा उपभोग घेऊ शकतो.
वृत्तपत्रा, तू कितीही जुना असलास तरी तुझा खरा विकास झाला तो मुद्रणकलेच्या शोधानंतर. यंत्राने छापण्याची कला ज्या क्षणी माणसाला अवगत झाली, त्याच क्षणी त्याच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. आता तर ही कला केवढी प्रगत झाली आहे! वृत्तपत्रा, आता तुझी छपाईच केवळ यंत्रावर होत नाही; तर घड्या घालून ठराविक संख्येचे गठे तयार करून यंत्रातून तूला बाहेर काढले जाते आणि मग तू ज्ञानदानाच्या कामाला लागतोस.
वत्तपत्रा, खरं पाहता तुझं आयुष्य किती तोकडं! केवळ एका दिवसाचं, म्हणजे अवघं चोवीस तासांचं. पण तुझी कामगिरी मात्र केवढी महान ! 'खरोखरीच तु अल्पजीवी असूनही अमर आहेस. ज्ञानदान तू करतोसच; पण त्याबरोबर मनोरंजनही करतोस. चित्रपटांची परीक्षणे, क्रीडावृत्तांत व काही चटकदार वार्ता देऊन तू लोकांचे, म्हणजे वाचकांचे कष्टाचे जीवन सुसहय करतोस. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात तुझ्या सहवासात लोकलचा प्रवास केव्हा संपतो ते कळत नाही.
त्याचबरोबर तू नोकरीच्या बातम्या देतोस, राहण्याच्या जागा दाखवितोस, वधूला वर सुचवितोस, वराला योग्य वधू गाठून देतोस, हरवलेल्याची बातमी देतोस, सापडलेल्यांची सुखद वार्ता सांगतोस, पंचांग वर्तवतोस, भविष्य सांगतोस, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि गावात होणारे कार्यक्रम कथन करतोस. तुझे रूप पाहून म्हणावेसे वाटते की, तू काय करतोस, हे पाहण्याऐवजी तू काय करीत नाहीस हेच शोधावे लागेल. तुझा विस्तार मर्यादित पानांचा, पण तुझ्या अंगी नाना कळा आहेत, खरोखरच तू आजच्या युगाचा परमेशच आहेस.
वा वृत्तपत्रा, तुझे सामर्थ्य किती प्रचंड आहे पाहा. निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी मोठमोठ्या विचारवंतांनी तुझीच कास धरली. लोकमान्यांची गर्जना हिंदुस्थानाला ऐकविण्यासाठी तू 'केसरी' झालास, तर शिवरामपंतांचे परखड बोल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तू 'काळ' बनलास, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मराठी माणसाची अस्मिता फूलविण्यासाठी आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून तू 'मराठा' झालास. समाजातील दोषांची जाणीव जी आगरकरांना झाली ती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तू 'सुधारक' झालास.
कोल्हटकरांचा तू 'संदेश' बनलास, तर हरिभाऊनी तुला 'करमणूक' म्हणून संबोधिले. विविध नावे, विविध रूपे घेणारा तू परमेश्वरी अवतारच आहेस. तुझ्या सामर्थ्याच्या भयानेच आणीबाणीत तुझ्यावर बंदी आली. पण तू नामशेष झाला नाहीस, होणार नाहीस. उलट तुझं तेज अधिकच वाढलं आणि ते वाढतच जाणार, म्हणून तर तुला त्रिवार वंदन!
वरील निबंध वृतपत्रा मराठी निबंध | Essay on newspaper in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद