महाराष्ट्र मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi
निबंध 1
महाराष्ट्र मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi : नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महाराष्ट्र मराठी निबंध बघणार आहोत. यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास त्याने संकटातुन केलेली प्रगती याविषयी सविस्तर माहिती दोन निबंधामध्ये सांगितली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- मराठी माणसाला 'मराठी' असण्याचा अभिमान
- हा अभिमान तो जेथे असेल तेथे व्यक्त करतो
- खडकाळ प्रदेश
- कष्टाळू माणसे
- गरजा कमी
- सर्वांना सामावून घेण्याची वृत्ती
- मुंबईचे स्वरूप
- प्रत्येक गोष्टीसाठी झगडावे लागणे
- संकटातून प्रगती
- नररत्नांची खाण
- सर्व क्षेत्रांत प्रगती
- नाव यथार्थ ठरवले.
मी मराठी ! माझा महाराष्ट्र !' ही माझी प्रिय व अभिमानाची स्थाने आहेत आणि त्यामुळे मी कुठेही असलो तरी माझ्या महाराष्ट्राला मी विसरू शकत नाही. हीच प्रत्येक मराठी माणसाची स्थिती असते. म्हणूनच आज जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी - अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलियातही मराठी मंडळींची संमेलने साजरी होतात. मला खात्री आहे की, जेव्हा केव्हा चंद्रावर आणि मंगळावर माणसे वस्ती करू लागतील, तेव्हा तेथेही मराठी माणसे आपली संमेलने साजरी करतील !
माझा महाराष्ट्र भारताच्या मध्यभागी आहे. भारतातील इतर काही राज्ये महाराष्ट्रापेक्षा आकाराने मोठी आहेत. पण महाराष्ट्र मोठा – 'महा' - ठरला तो त्याच्या गुणांमुळेच. महाराष्ट्राला प्रत्येक बाबतीत परंपरा आहे. महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी आहे. तसाच सह्याद्रीचा कणखर कणा आहे. म्हणून तर कवी गोविंदाग्रज माझ्या महाराष्ट्राला 'दगडांचा देश, कणखर देश' असे गौरवतात. भारतातील इतर राज्यांइतकी सुपीक जमीन लाभली नसली, तरी येथील कष्टाळू शेतकऱ्यांनी मराठी माणसाला अन्न कधीही कमी पडू दिले नाही.
सतत कष्ट करत राहणाऱ्या या मराठी माणसांच्या गरजाही फार मर्यादित आहेत. त्यामुळे मिळेल ती चटणी-भाकरी खाऊनही खूश राहणारा हा मराठी माणूस आलेल्या अतिथीला आपल्यातील भाकरी मोडून देतो. त्यामुळे महाराष्ट्रात चारी बाजूंनी इतर राज्यांतील माणसे आली आणि ती महाराष्ट्राचीच झाली. आता महाराष्ट्रात राहणारा आणि मराठी बोलणारा प्रत्येकजण 'महाराष्ट्रीय' मानला जातो. म्हणून तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आज संपूर्ण भारताचे प्रतीक झाली आहे.
महाराष्ट्रात गंगा, ब्रह्मपुत्रेसारख्या प्रचंड नद्या नसल्या तरी गोदा, भीमा, कृष्णा, कोयना आणि इतर अनेक नदयांनी महाराष्ट्र सदैव सुफलित केली. महाराष्ट्राला कोणतीही गोष्ट अगदी सहजगत्या प्राप्त झालेली नाही. १ मे १९६० ला 'महाराष्ट्र राज्य ' साकार झाले, पण त्यासाठी महाराष्ट्राला फार मोठा लढा दयावा लागला. त्यानंतर 'कोयने 'च्या व लातूरच्या भूकंपांनी महाराष्ट्राला मोठे हादरे दिले. पण अशा सर्व संकटांना महाराष्ट्राने खंबीरपणे तोंड दिले. प्रत्येक संकटांवर मात करत महाराष्ट्र अधिकाधिक पुढे गेला.
महाराष्ट्र ही तर नररत्नांची खाण आहे. श्री शिवरायांनी 'स्वराज्याची' कल्पना महाराष्ट्रात रुजवली. पराक्रमात महाराष्ट्र केव्हाही मागे पडला नाही. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपली कामगिरी पार पाडली. सामाजिक क्षेत्रात तर महाराष्ट्रात महात्मा फुले, महर्षी कर्वे, डॉ. आंबेडकर यांनी एवढी महान कामगिरी पार पाडली आहे की, भारतातील इतर राज्यांपेक्षा मराठी समाज सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुरोगामी राहिला आहे. महाराष्ट्राला संतांची व साहित्यिकांची फार मोठी परंपरा लाभली आहे.
कला व इतर क्षेत्रांतही महाराष्ट्र आपली कामगिरी बजावत राहिला. अजिंठा, वेरूळची लेणी आजही सर्वांचे लक्ष वेधून घेतात. एकविसाव्या शतकात आज 'सॉफ्टवेअर'च्या क्षेत्रात मराठी युवक अग्रेसर आहेत. महाराष्ट्राने आपले नाव सदैव सार्थ ठरवले आहे आणि त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही मराठी माणूस असेल तरी तो अभिमानाने मराठी मातीचा टिळा लावतो.
निबंध 2
माझ्या मायदेशा महाराष्ट्रा, मी तुला प्रथमच सांगून टाकतो, मी विश्वबंधुत्व मानणारा मानव आहे, मी एक भारतीय आहे पण मी प्रथम महाराष्ट्रीय आहे. जगाच्या पाठीवर कोठेही वावरताना जेव्हा मराठी शब्द कानांवर पडतात ना, तेव्हा मला आनंदाचे भरते येते. बा महाराष्ट्रा, मी कोठेही असलो तरी माझे चित्त सदैव तुझ्याकडे असते. वृत्तपत्रातील महाराष्ट्राबद्दलची एखादी छोटी वार्ताही मला समाधान देण्यास पुरेशी होते.
महाराष्ट्रा, तुझ्यामाझ्यात हा स्नेहाचा धागा का निर्माण झाला माहीत आहे? कारण मी या खडकाळ भूमीत जन्माला आलो, याच मातीत मी रांगलो, येथेच मी खेळलो आणि येथेच मी मोठा झालो. माझ्या शरीरातील कणकण तूझ्या अणुरेणने बनला आहे. मायदेशा, मघाशी तूझ्या भूमीचा मी 'खडकाळ' असा उल्लेख केला. तुला त्याचा राग आला नाही ना? महाराष्ट्रा, तुझी भूमी अशीच आहे. खडकाळ डोंगराची पाठ तुला लाभली आहे, म्हणून तर तुझा तो लाडका पुत्र तुला 'दगडांचा देश' असे संबोधतो.
गंगेच्या मुखातला गाळ येथे नाही वा गंगौघासारखा जलाशयाचा बारमाही वाहता पाण्याचा लोंढाही नाही. पण तुझी कष्टाळू मुले खूप कष्ट उपसून तांदूळ, ज्वारी पिकवितात. पण आता मात्र तुझ्या या सुपुत्रांनी कमाल केली आहे. धरणांनी अडविलेल्या पाण्यावर आता महाराष्ट्रात ऊस डोलतो आहे, तंबाखू फुलते आहे. महाराष्ट्रा, तुझ्या ठिकाणी उभारलेल्या या कारखान्यांतील साखर आता साऱ्या भारतभर जणू साखरपेरणीच करीत आहे. महाराष्ट्रा, कारखान्यांवरून आठवलं हं!
आता औदयोगिक विकासातही तू मागे नाहीस. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर ही तुझी मोठमोठी शहरे स्वतःच्या औदयोगिक वसाहती मोठ्या दिमाखाने मिरवत आहेत. महाराष्ट्रा, कोकणभूमी ही तुझी डोंगराळ भूमी. एका बाजूला डोंगर व दुसऱ्या बाजूला सागर अशा निसर्गरम्य भूमीतही आता कारखाने उठले आहेत. कोकणातील आंबा, काजू व मासे आता हवाबंद डब्यांत बसून दूरदूरवर परदेशाची सफर करीत आहेत.
माझ्या मायदेशा, तू आपल्या लेकरांना ऊब दिलीस, त्यांना वाढविलेस; पण त्यांनीही आपल्या कर्तृत्वाने तुझ्या नावाचा झेंडा तीनही लोकांत फडकविला. ज्ञानदेवाच्या काव्याचा आनंदपरिमल आज सातशे वर्षे होऊन गेली तरी कमी झालेला नाही. विश्वैक्याचे स्वप्न आज विसाव्या शतकातील माणस जे पाहत आहे ते ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपूर्वी पाहिले होते. 'हे विश्वचि माझे घर' अशी त्यांनी माणसाला विशाल दृष्टी दिली. रयतेच्या रक्षणासाठी शिवबाने स्वराज्य निर्मिले व चारित्र्यवान राजा कसा असू शकतो त्याचे प्रमाणच दाखवून दिले.
'प्राण गेला तरी माझे राज्य देणार नाही' अशी रणभेदी गर्जना करणारी राणी लक्ष्मीबाईही, बा महाराष्ट्रा, तुझीच माहेरवाशीण. 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असे उन्मत्त इंग्रज सरकारला खणखणीत स्वरांत बजावणारा 'बाळ' तुझाच पुत्र. महाराष्ट्रा, तुझी ही सारी लेकरे काटक आहेत. मोडू, पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा सर्वश्रुत आहे.
महाराष्ट्रा, तुझ्या हया लेकरांनी आपली अस्मिता मोठ्या निष्ठेने जपली आहे. पंढरीचा विठोबा हे त्यांचे लाडके दैवत. आपल्या मायदेशाइतकीच आपल्या मायबोलीवर त्यांची भक्ती आहे.
वरील निबंध माझ्या मायदेशा महाराष्ट्रा मराठी निबंध | Maharashtra State Essay In Marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद