मातीचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक
matiche manogat essay in marathi
मातीचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक : "तुमची माझी ओळख फार जुनी आहे. माझ्याशी खेळताना तुमचे शैशव, बालपण केव्हा हरविले हे सुद्धा तुम्हांला उमगले नाही. आताच जरा या कुमारवयात आल्यावर तुम्ही माझ्याशी फटकून वागायला लागला आहात. म्हणून तर मला तुम्हांला आपली जुनी आठवण करून दयावी लागत आहे. हं ओळखलंत ना! माझ्या स्वागताला तो रुमाल काढू नका. हो, हो! मी माती आहे. मी माती, म्हणजेच आज तुम्हांला नकोशी झालेली धूळ आहे.
पण आठवा पाहू बालपणातील ते दिवस! "लहानपणी माझ्याशी खेळताना तुम्हांला किती मजा वाटायची! माझ्या अंगावर पाणी ओतून वाडे बांधणे, चूलबोळकी तयार करणे, छोटे छोटे शिपाई तयार करणे आणि दिवाळीत किल्ला तयार करणे हे तर तुमचे आवडते खेळ. आज तुम्हांला आठवत नसेल, पण तुमच्यापैकी कित्येकजण रांगत असताना माझी चवदेखील घेत होता. त्यामुळे मग तुम्हांला घरातल्या मोठ्या माणसांचा फटका खावा लागे. पण या आठवणीने लाजू नका. अहो, प्रत्यक्ष परमेश्वरही कृष्णावतारात माझ्याशी खेळताना रंगून जात असे. म्हणून तर पंडित कवी मोरोपंत त्याला आठवण देतात
'तुलाचि धरी पोटिशी कशी तदा यशोदा बरे
जरी मळविशी रजोमलिन तू काय अंबरे!!' "मुलांनो, मी फार पुरातन आहे. या पृथ्वीतलावर तुम्ही मानव नव्हता, इतकेच काय कोणीही प्राणिमात्र नव्हते. अशा एकाकी अवस्थेतही मी वावरत होते. मला कुणी ‘रज' म्हणत, कुणी 'मृत्तिका' म्हणून हाक मारीत. त्यातूनच मला ‘माती' हे नाव मिळाले. मुलांनो, मला फार आवडते हे माझे नाव. का ते सांग? या नावाचे 'मातेशी' साम्य आहे, जवळीक आहे. 'माता' किती मंगल शब्द; किती पवित्र नाते. या मातेशी माझेही नाते आहे हं.
“तुमचे प्रसिद्ध लेखक अनंत काणेकर मला मोठी माता' म्हणतात. नाहीतरी मानवाशी, या मनूच्या पूत्राशी माझा घनिष्ठ संबंध आहे. कारण मानवप्राणी माझ्यापासूनच घडतो आणि शेवटी तो मलाच येऊन मिळतो. 'मानवा, तु माती असशी मातित मिसळशी' अशी ही कूणा कवीने जाणीव करून दिली आहे. पण त्या अर्थाने मी म्हणत नाही. मानवाशी मला अभिप्रेत असलेली जवळीक वेगळी आहे. माणूस माझ्या अंगाखांदयावर मोठा होतो, उन्हापावसापासून त्याचे रक्षण करण्यासाठी मी शांतसे घरकुल त्याला देते.
त्याच्या वस्त्रासाठी लागणारा कापूस मी निर्माण करते. त्याची भूक भागविण्यासाठी मी 'सस्यश्यामला' होते. षड्रसांनी युक्त असे भोजनाचे ताट प्रत्यही देण्यासाठी मी झटते. विविध चवींची फळे त्याचे जिव्हालौल्य भागवितात. माझ्या उदरी फुलणारी रंगीबेरंगी फुले त्याला नेत्रानंद देतात. माझ्या अंगावर पाय रोवून जेव्हा तो उभा राहतो तेव्हा तो सुरक्षित असतो. ही सुरक्षितता त्याला सागरात वा गगनात मिळत नाही. एकंदरीत अन्न, वस्त्र, निवारा या साऱ्या गोष्टी मी मानवाला देते.
"हे मी स्वतः सांगते म्हणून तुम्ही मला अहंकारी म्हणाल, ही मातीची दर्पोक्ती आहे म्हणून मला दोष दयाल ; पण हा गर्व नाही. आज हे सर्व काही बोलण्याची वेळ तुम्हीच माझ्यावर आणली आहे. या आजच्या विज्ञानयुगात तुम्ही माझ्यापासून दूर जात आहात. पण एक लक्षात ठेवा; सोन्याचांदीच्या खाणीही माझ्याच उदरात आहेत.
आजच्या या कृत्रिम धाग्याच्या जगात तुम्हांला माझी आवश्यकता वाटणार नाही. 'मातीविना शेती' अशा आकर्षक घोषणा तुम्हांला आकर्षित करतील. पण लक्षात ठेवा, या कृत्रिमतेला मर्यादा आहेत. शेवटी खरी आहे ती मी, मीच माती! कारण माझ्याजवळ आहे सर्जनशीलता, माझ्याजवळ आहे क्षमाशीलता."
वरील मातीचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक मराठी निबंध हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद
वरील मातीचे मनोगत मराठी निबंध आत्मकथनात्मक मराठी निबंध हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद