शहरापेक्षा खेडे बरे! मराठी निबंध | my village in my dream essay in marathi
शहरापेक्षा खेडे बरे! मराठी निबंध | my village in my dream essay in marathi : माझा जन्म झाला एका गजबजलेल्या शहरात. माझे बालपण, शैशव आणि कुमारवयही त्याच शहरात गेले. मी दहावीच्या वर्गात असताना खेड्यातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी माझे बाबा खेडेगावात गेले होते. त्यामुळे सुटीत मी खेडेगावात आलो; आणि खेडेगाव जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यावेळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, आज या भारतात आपण या खेडेगावांना योग्य न्याय देत नाही
आमचा भारत हा खेड्यांचा देश आहे, असे आम्ही मोठ्या अभिमानाने म्हणतो. पण आमची कृती मात्र अगदी याच्या उलट आहे. आज आमची सारी धाव शहरांकडे आहे आणि खेडी मात्र ओस पडली आहेत. औदयोगिक क्रांतीनंतर यंत्रांच्या चाकांना गती आली. कारखाने वाढू लागले आणि कारखान्यांतील नोकरीत निश्चित मिळणाऱ्या रुपयांमागे माणसे धावू लागली. शहरात गेले म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न सुटतो हे लक्षात आल्यावर दररोज शेकड्यांनी माणसे शहरात येऊ लागली. शहरे फुगत चालली.
आज शहरांचे स्वरूप कसे आहे? शहरे म्हणजे माणसांची खुराडी बनली आहेत. कुठेही जागा मोकळी नाही. जिकडे तिकडे मजल्यावर मजले चढविलेल्या इमारती उभ्या आहेत. झाडे तोडून उभे केलेले हे सिमेंटचे जंगलच जणू! त्यामुळे निसर्गाचा समतोल हरवतो. त्यांतच भर म्हणजे कारखान्यांमधून निर्माण होणारे दूषित वायू, दूषित पाणी. हे सारे वातावरण दूषित करतात. मग शहरातल्या माणसांना खोकला येऊ लागतो, वरचेवर कावीळ होते; चर्मरोग होतात, क्षयरोग्यांची संख्या वाढते. शहरात जागेची टंचाई असते.
त्यामुळे एका खोलीत अनेक माणसे दाटीवाटीने राहत असतात. त्यांना शुद्ध हवा मिळत नाही. पूरेसे पाणी मिळत नाही, मोकळा वारा मिळत नाही. सारे जीवन कसे खुराड्यातल्या कबूतरांसारख. अशा रागट खुरट वातावरणात मन तरी कशी प्रसन्न राहावयाची. जीवन एवढे घाईगर्दीचे की सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी सुखरूप परत येतो की नाही याबद्दल शंकाच
अशा या शहरांपेक्षा खेडी कितीतरी बरी! खेडयांत मोकळी जागा आहे. खाड्यासारख्या घरात राहावे लागणार नाही. मोकळ्या हवेत काम केल्याने आरोग्यमय वातावरण लाभेल. निसर्गाशी अधिक जवळीक साधता येईल. अशा खुल्या वातावरणात वावरल्याने वृत्तीही अधिक मोकळ्या होतील.
आज खेडी दुर्लक्षित राहिली आहेत. त्यामुळे तेथील जीवनाचा विकास साधलेला नाही. तरुण माणसे शहराकडे धावल्याने खेड्यात उरतात फक्त म्हातारी माणसे. त्यामुळे तेथील घराची जीवनकळा संपल्यासारखी वाटते. पण आता वीज, नळ या सोयी खेडोपाडी जाऊन पोहोचल्या आहेत. त्यामुळे आपण खेड्यातील घरातही शहरातील सर्व सोयी आणू शकतो. परदेशात मोठमोठ्या शेतीवाड्यांवर अशी टुमदार घरे असतात. तेथील शहरातील माणस शहरात या पाच दिवस सपाटून काम करतो. आणि सप्ताहाच्या अखेरचे दिवस आपल्या खेडेगावातील घरातमातीच्या सहवासात-घालवितो.
खेडेगावात आपण वास्तव्य केले तर आपण आपल्या मातीशी म्हणजे पर्यायाने शेतीशी प्रामाणिक राह. त्यामुळे कृषिप्रधान देश ही आपली कीर्ती सार्थ ठरेल. शेतीबाबत नवे शोध लागतील. खऱ्या अर्थाने हरित क्रांती होईल. 'भिक्षादेही' करावी लागणार नाही. खेड्यांपर्यंत विज्ञानाधिष्ठित शिक्षण पोहोचल्यावर अंधश्रद्धा, अविचार पळून जातील. खऱ्या अर्थाने खेड्यांचा विकास होईल. तेथे आजही भरपूर कार्य करण्यासारखे आहे. म्हणून महात्माजींनी दिलेला तो संदेश परत परत आठवू लागतो- 'चला खेड्यांकडे'.
वरील निबंध शहरापेक्षा खेडे बरे! मराठी निबंध | my village in my dream essay in marathi हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद