मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध
मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध : 'मोकळा तास' म्हणजे शालेय जीवनातील एक आनंदाची पर्वणीच! “मी उदया येणार नाही हं!" असे सूतोवाच कधी एखादे गुरुजी करतात; तर-“अरे, आज अत्रे सर येणार नाहीत. त्यांच्या मेहुणीचे लग्न आहे.” अशी बित्तंबातमी एखादा वर्गमित्र आणतो तेव्हा या 'मोकळ्या तासा'ची पूर्वसूचना मिळते. पण एखादे दिवशी अनपेक्षितपणे असा 'मोकळा तास' मिळतो आणि मग आश्चर्य, आनंद अशा संमिश्र भावनेने 'ऑफ पीरियड' असा वर्गात एकच जल्लोष उठतो. मोकळ्या तासाला वर्गावर येणारे शिक्षक खिलाडू वृत्तीचे असले तर ते हे स्वागत हसत स्वीकारतात; पण असा अनुभव क्वचितच येतो. बहुतेक शिक्षक काही ना काही अभ्यासच घेत असतात.
खरे पाहता, मोकळ्या तासाला अभ्यास म्हणजे आमच्या हक्कावर आक्रमणच नाही का? मोकळा तास म्हणजे गप्पांचा तास असे आमचे गणित असते. अशा गप्पांतून आमचे जनरल नॉलेज'-सामान्य ज्ञान कितीतरी वाढते. माझ्या वर्गातील 'राजीव जोगळेकर' याला अशा मोकळ्या तासाला फार भाव असतो. कारण राजीवचे वडील शिकारी आहेत; त्यामुळे राजीवजवळ शिकारकथा, साहसकथा यांचा भरपूर साठा आहे. वर्गात आलेले शिक्षकही राजीवला एखादी चित्तथरारक शिकारकथा सांगण्याचा आग्रह करतात. मग राजीव कथा सुरू करतो.
कथानिवेदनाची उत्कृष्ट कला राजूला लाभली आहे. राजूची कथा रंगू लागते तशी मुले तास विसरतात, वर्ग विसरतात, शाळाही विसरतात. राजूची कथा सुरू झालेली असते आणि आता सर्वजण जंगलात जाऊन पोहोचलेले असतात. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे असतात. श्वास रोखून धरलेले असतात. बिबट्या वाघ व शिकारी, परस्परांवर नेम धरून बसलेले असतात आणि तेवढ्यात घंटेचा टोला पडतो. गुरुजींसह सर्वांना तो तास संपू नये असे वाटत असते; पण नाइलाजाने राजूला कथा थांबवावी लागते. आणि मग कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्हांला दुसऱ्या मोकळ्या तासाची वाट पाहावी लागते.
एखादा मोकळा तास म्हणजे विनोदाची मेजवानीच ठरते. आमच्या शाळेतील ‘भागवत सर' अशा मोकळ्या तासाला वर्गावर आले की ते स्वतःच काही विनोद सांगतात. मग एकापाठोपाठ एक विनोदांची, चुटक्यांची मुलांकडून मैफल झडते. प्रत्येक विनोद-श्रवणानंतर वर्गात हास्याचा कल्लोळ उठतो. काही काही विनोद तर इतके अफलातून असतात की हशाबरोबर बाकेही बडविली जातात. आपण शाळेत आहोत याचा विसर पडतो. अशा वेळी शेजारच्या वर्गातील शिक्षक आमच्या वर्गात डोकावतात; पण आम्हांला त्याची तमा नसते. असा हा मोकळा तास संपला की वाईट वाटते. पुन्हा मोकळा तास मिळावा आणि भागवत सरच वर्गावर यावेत अशी आम्ही मनोमन प्रार्थना करीत असतो.
एखादया मोकळ्या तासाला कोणीही सर वर्गावर येत नाहीत. मग काय विचारता, आमचेच राज्य चालू होते. वर्गप्रतिनिधी वर्गाची सूत्रे हाती घेतो तेव्हा वर वर वर्ग शांत दिसत असतो; पण आमच्या काही ना काही खोड्या चालूच असतात. बाकाखालची वया, पुस्तके, दप्तरे, खाण्याचा डबा, चपला इकडून तिकडे सरकविल्या जातात. कुणाच्या पाठीवर 'विकाऊ गाढवा'ची चिठ्ठी लावली जाते,
तर कधी कुठूनतरी एखादा बाण येतो आणि मग कागदाच्या बाणांचा पाऊस पडतो. त्यातच कधीतरी नकलांचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग सर्व शिक्षकांच्या नकला घडू लागतात. वर्ग अक्षरशः डोक्यावर घेतला जातो. कधी याचे पर्यवसान शिक्षेतही होते; पण त्याचेही आम्हांला काही वाटत नाही. कारण मोकळया तासाची मजा पोटभर उपभोगलेली असते. 'मोकळा तास' हा शालेय जीवनातील 'ओयासिस', रम्य हिरवळ आहे हे खरेच!
- shaletil aathvani essay in marathi
- shaletil gamti jamti essay in marathi