SAVING ESSAY IN MARATHI | बचत लहान, फायदा महान चिंतनात्मक मराठी निबंध
SAVING ESSAY IN MARATHI | बचत लहान, फायदा महान चिंतनात्मक मराठी निबंध : आम्ही ठरविलेले बचतीचे उद्दिष्ट गाठल्यामुळे आज शाळेत माझा व माझ्या काही मित्रांचा सत्कार करण्यात आला. एका मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकेचे व्यवस्थापक या समारंभाला अध्यक्ष म्हणून हजर होते. आमचा गौरव करताना ते म्हणाले, “देशातील सर्व मुलांना लहानपणीच संचयाचे महत्त्व समजल्यास आपल्या राष्ट्राला भविष्यकाळात कोणतीच उणीव भासणार नाही." खरोखर वेळीच केलेली बचत ही अडचणीच्या काळात केवढी मोठी कामगिरी करीत असते!
आमच्या वर्गातील बहुसंख्य मुलांची बचतखाती आहेत. दर महिन्याला आम्ही काही ना काही तरी शिल्लक टाकीत असतो. त्यामुळेच, परवा आमच्या एका वर्गमित्राला परीक्षेच्या अर्जाची फी भरणे शक्य झाले नाही तेव्हा आम्ही आमच्या बचतखात्यांतून रक्कम काढून त्याचा अर्ज वेळेवर पाठवून देऊ शकलो. त्याच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू उभे राहिले व गहिवरल्या आवाजात तो आम्हांला म्हणाला, “दोस्तांनो, सुट्टीत कष्ट करून प्रथम तुमचे पैसे परत करीन आणि मग माझेही अल्पबचत खाते मी सुरू करीन.” ज्योतीने ज्योत प्रज्वलित होते तसेच आहे हे कार्य!
संसारात 'कर्ज' हे कर्करोगासारखे आहे. ते कधीच फिटत नाही, कर्ज हे सतत वाढतच राहते आणि शेवटी ते माणसालाच गिळून टाकते. हे टाळण्यासाठी अल्पबचतीची सवय हवी. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. कितीही कमी उत्पन्न असले तरी आपण बचत केलीच पाहिजे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस उपवास केला, चहा कमी घेतला, चित्रपट कमी पाहिले, थोडी छानछोकी कमी केली तर आपण अल्पबचत करू शकतो. ती आपल्याला अडीअडचणीला उपयोगी पडते, म्हातारपण सुसहय करते. अशा या अल्पबचतीतून स्वार्थ साधता येतो, त्याचप्रमाणे परमार्थही साधला जातो.
आपली बचत लहान असली, तरी ती देशाचे महान कार्य साधते. या अल्पबचतीचा जन्मही अशाच अडचणीतून निर्माण झाला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या विकासासाठी सरकारने पंचवार्षिक योजना आखल्या. पण त्यासाठी पैसा कोठून आणणार? सरकारला कर्ज हवे होते. सरकारने प्रजेला साद घातली. प्रत्येकाला आपल्या मिळकतीतील पै-पैसा बचत करण्यास आवाहन केले आणि पाहता पाहता मोठ्या रकमा उभ्या राहिल्या. मुंगीच्या कणाकणाने कोठार भरते, तसा सरकारी खजिना भरला. सरकारची नड भागली आणि लोकांना बचतीची सवय लागली.
ही बचतीची सवय जीवनात फार उपयोगी पडते. बचत काही फक्त पैशाचीच करता येते असे नाही. आपण अन्नाची बचत केली तर अवर्षण, अतिवर्षण यांमुळे येणाऱ्या दुष्काळाशी आपण मुकाबला करू शकतो. वेळेचा अपव्यय टाळला तर मोठमोठी कामे योग्य कालावधीतच पार पाडू शकतो. गळणारा नळ बंद करून आपण पाण्याची बचत केली पाहिजे, विनाकारण जळणारा दिवा मालवून आपण विजेची बचत केली पाहिजे.
कुमारांना मार्गदर्शन करताना एकदा प्रसिद्ध साहित्यिक ना. सी. फडके म्हणाले होते, “कुमारवय हे बचतीचे वय आहे. या वयात तुम्ही जी ज्ञानाची बचत कराल ती तुम्हांला पुढील जीवनात फार उपयोगी पडेल. म्हणून कणाकणाने धन साठवावे. तसेच क्षणाक्षणाला ज्ञान संपादावे.” सुखी, यशस्वी जीवनासाठी सर्व त-हेची बचत आवश्यकच आहे.
वरील निबंध SAVING ESSAY IN MARATHI | बचत लहान, फायदा महान चिंतनात्मक मराठी निबंध हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
SAVING ESSAY IN MARATHI | बचत लहान, फायदा महान चिंतनात्मक मराठी निबंध
रस्त्यावरून जाताना जरा आजूबाजूला नजर टाकली तर जाहिरातींचे प्रदर्शन बघायला मिळत असते. काही जाहिराती तर फारच लक्षवेधी असतात. अशा या जाहिरातींत 'एका छोट्याशा हंडीत रुपयांचे नाणे टाकणाऱ्या ललनेचा हात' अशी जाहिरात नेहमीच दृष्टीस पडते. मला तर वाटते, या जाहिरातीतून त्यांना हेच सुचवायचे असेल
की, बचत लहान अन् फायदे महान!
क्षणश: कणश्चैव विद्यामर्थं च जायते।
क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम्।।
असे एक सुभाषित आहे. क्षणाक्षणाची बचत केल्याने विद्या प्राप्त होते. त्याचप्रमाणे कणाकणाने धनाची बचत केली असता मोठा धनसंचय होतो, असाच या सुभाषिताचा मथितार्थ आहे. थोडक्यात, कोणतीही वस्तू काटकसरीने, बचतीने वापरली असता, तिचा नक्कीच फार मोठा फायदा होतो.
परंतु आज हेच विचार जनमानसात ठसविण्याची नितांत गरज आहे. आजच्या या आधुनिक युगात सर्वच गोष्टींचा अपव्यय चाललेला दिसून येतो. प्रत्येक माणूस पैसा मन मानेल त्याप्रमाणे खर्च करीत असतो. त्याऐवजी हा पैसा भावी काळासाठी साठवून ठेवला पाहिजे.
संकटसमयी त्याचा केव्हाही उपयोग होऊ शकतो. कोणाकडे हात पसरायची वेळ येत नाही. आपल्या जीवनातीलं अंधाराची खंत न करता प्रकाशगीत गात गात उज्ज्वलतेच्या वाटेवर पाऊल ठेवता येते. पैशाच्या बचतीप्रमाणे वेळेची बचत करणेही जरुरीचे आहे.
कित्येकजण आपल्याला मिळणाऱ्या वेळेचा इकडे-तिकडे चकाट्या पिटण्यात आणि कुचकामी मनोरंजनात अपव्यय करीत असतात. या वेळेचा सदुपयोग करायला आपण शिकले पाहिजे. या वेळेत आपण आपल्या निरक्षर बांधवांना साक्षरतेचा नवा किरण दाखवू शकतो.
समाजोपयोगी कामे हाती घेऊ शकतो. अशा रीतीने आपण आपल्या वेळेची बचत करून एक मोठे देशकार्य करीत असतो. 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे जर आपण कोणत्याही गोष्टीचा संग्रह केला अगर त्या आचरणात आणल्या तर नक्कीच आपलीही उन्नतीच होत राहील.
'न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वन्हिना गृहे'। घर आगीने पेटले असता विहीर खोदणे योग्य नसते. त्यासाठी आधीच तयारी असावी लागते. त्याचप्रमाणे संकट येण्यापूर्वीच त्याच्याशी मुकाबला करण्याची तजवीज आपण केली पाहिजे. थोडक्यात, कोणत्याही बाबतीत 'बचत' ही अनिवार्य आहे.
नव्या अभूतपूर्व वैज्ञानिक दृष्टीने २१ व्या शतकाकडे वाटचाल करणाऱ्या या जगात लोकसंख्यावाढीचा भस्मासुर अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. यावर उपाय म्हणून लोकसंख्येची बचत करण्याची वेळ आली आहे. 'हम दो हमारे दो', 'दोनच रे' अशी वाक्ये ठिकठिकाणी लिहिलेली आढळतात.
परंतु याची लोकांकडून अंमलबजावणी मात्र होत नाही. लेकरे उदंड जाहली आहेत म्हणूनच आज लोकसंख्या-शिक्षणाची नितांत गरज आहे. . रस्तोरस्ती स्वयंचलित वाहने धावत असतात. या वाहनांसाठी लागणारे इंधन हे अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
त्याचा साठा काही वर्षे पुरेल इतकाच आहे. म्हणूनच भावी पिढीच्या कल्याणासाठी या इंधनाचा थेंबन् थेंब जपून वापरला पाहिजे. एवढेच नव्हे, तर प्रमुख जंगलसंपत्ती असलेल्या लाकडाचाही आता तुटवडा भासत आहे.
पर्यायाने त्याचीही 'बचत' करण्याची वेळ आली आहे. 'बचत' हा विषय जीवनातील अनेक अंगांना स्पर्श करणारा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद