Democracy And Public Education Essay In Marathi | लोकशाही आणि लोकशिक्षण मराठी निबंध
Democracy And Public Education Essay In Marathi | लोकशाही आणि लोकशिक्षण मराठी निबंध : "काय गोपाळराव! मत दयायला नाही गेलात ते?" एका सुशिक्षिताने मतदानाच्या दिवशी दुसऱ्या सुशिक्षिताला विचारलेला प्रश्न. “नाही गेलो झालं. असा काय फरक पडणार होता माझ्या मतानं? म्हटलं कशाला वेळ घालवावा रांगेत उभं राहून? चक्क ताणून दिली मस्तपैकी!" मित्राच्या प्रश्नाला सुशिक्षित गोपाळरावांचे हे उत्तर.
दुसरे संभाषण चालले होते असेच दोन शेजाऱ्यांत. ते शेजारी झोपडपट्टीत राहणारे आणि कुठल्यातरी कारखान्यात काम करणारे होते. नारायण सखारामला सांगत होता, "अरे, अमक्यानं आम्हांला 'धा धा' रुपये दिले. मग मारला त्याच्या निशाणीवर शिक्का." सखाराम नारायणला त्यावर खास बातमी सांगतो, “अरे, त्या दुसऱ्या उमेदवाराने तर चक्क एक-एक बाटली दिली!"
ही दोन्ही संभाषणे ऐकली आणि मनात आले, लोकशाही यशस्वी करायची असेल तर लोकशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात आमच्या नेत्यांनी लोकजागृती आणि लोकशिक्षणाचे काम केले. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि इतर अनेक नेत्यांनी वृत्तपत्रांतून सतत लेखन करून स्वराज्य, स्वदेशी यांची जाणीव लोकमानसात जागी ठेवली. त्याचेच मूर्त फळ म्हणून आपण स्वतंत्र झालो आणि आपल्या देशात लोकशाही राज्य निर्माण झाले.
लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालविलेले लोकांचे राज्य. भारतासारख्या विशाल देशात आम्ही लोकशाही राज्यपद्धती राबवितो याचा आम्हांला मोठा अभिमान आहे; पण खरोखर आमच्या जनतेला लोकशाही उमगली आहे का? -असा विचार केला तर पुष्कळ वेळा विषादाने म्हणावे लागेल 'नाही' म्हणूनच आजही भारतात लोकशिक्षणाची आवश्यकता आहे हे खरेच.
लोकशाहीत राज्यकारभार चालतो तो लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत. म्हणून मग लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक घ्यावी लागते. निवडणूक म्हटली की मताधिकार आला. या मताचे सामर्थ्य केवढे आहे, हे प्रत्येक मतदाराला समजले पाहिजे. 'मत विकणे' हा जेवढा गुन्हा आहे, तेवढाच मतदानाला न जाणे हाही आहे. मतदारांनी आपल्या मताविषयी जागरूक असले पाहिजे. कोणत्या व्यक्तीला वा पक्षाला निवडावे याचा त्यांनी डोळसपणे विचार केला पाहिजे. लोकशाही राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या हक्काची पूर्ण जाणीव असेल तरच ती आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या वर्तनावर नियंत्रण ठेवू शकेल.
लोकशाहीत स्वतःच्या हक्काबरोबर प्रत्येक व्यक्तीला जाणीव हवी ती तिच्या कर्तव्याची. त्यासाठीही लोकशिक्षणाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. हे राष्ट्र माझे आहे, येथील प्रत्येक गोष्ट माझी आहे, ती मी जपली पाहिजे, तिच्याविषयी मला रास्त अभिमान हवा अशी भावना प्रत्येकाच्या मनात वसली पाहिजे. ती नसल्यामुळेच आम्ही अनेकदा जाळपोळ, मोडतोड करून राष्ट्रीय संपत्तीचा विध्वंस करतो. स्वदेशीचा अभिमान न बाळगता चोरट्या आयातीचे ग्राहक बनतो. देशाची अमोल रहस्ये फोडतो.
हे लोकशिक्षण केवळ अशिक्षितांना दयायला हवे असे नाही, तर ते तथाकथित सुशिक्षितांनाही दयायला हवे. कारण त्यांच्यातही राष्ट्रीयतेचा अभाव आढळतो. ग्रामीण जनतेबरोबर ते शहरांतूनही दयायला हवे, तरच निस्पृह व राष्ट्राभिमानी नागरिक निर्माण होतील आणि तेव्हाच आमच्या लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त होईल.वरील Democracy And Public Education Essay In Marathi | लोकशाही आणि लोकशिक्षण मराठी निबंध हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. धन्यवाद