श्रमप्रतिष्ठा मराठी निबंध |SHRAM PRATISHTHA ESSAY IN MARATHI
श्रमप्रतिष्ठा मराठी निबंध |SHRAM PRATISHTHA ESSAY IN MARATHI : आज आपण श्रमप्रतिष्ठा शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत
'प्रतिष्ठेच्या कल्पना' हया माणसामाणसांत अंतर निर्माण करतात हा नेहमीचा अनुभव आहे. आपल्याकडे अनेकदा ही प्रतिष्ठा घराणे, धन, समाजातील स्थान यांवर ठरविली जाते. जमीनदार, सावकार यांच्या घराला दारिद्रयाने पोखरलेले असले तरी प्रतिष्ठेच्या जुन्या, चुकीच्या कल्पनांतून त्यांना समाजात श्रेष्ठत्व मिळते. मग त्यांच्या अवगुणांनाही गुणस्वरूप प्राप्त होते. अशी ही दुर्वर्तनी माणसे इतरांना तापदायक ठरतात.
प्रतिष्ठेच्या पोकळ कल्पना उराशी बाळगणारी काही माणसे त्या कल्पनांतून आपलीही दुरवस्था ओढवून घेतात. एकेकाळी वैभवसंपन्न असलेल्या घरातील चंचल लक्ष्मी त्या घरातून बाहेर पडते. मग त्या घरात साम्राज्य सुरू होते. लक्ष्मीच्या सावत्र बहिणीचे-आक्काबाईचे. घरातील माणसांची उपासमार सुरू होते. तरीपण या एकेकाळच्या संपन्न घरातील माणसे हातपाय हलवून घराबाहेर कामासाठी पडत नाहीत. कारण तेथे त्यांची प्रतिष्ठा आड येत असते.
प्रतिष्ठेच्या या कल्पना आपल्या देशात 'चातुर्वर्ण्याच्या कल्पनेवर आधारलेल्या आहेत. श्रमविभागणी करण्यासाठी पूर्वीच्या विशिष्ट समाजरचनेत चातुर्वर्ण्य पद्धती स्वीकारली गेली. पण ब्राह्मण, क्षत्रिय या वर्गांनी स्वतःकडे उच्चत्व घेतले व शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना कुणबी ठरवून कमी लेखले; तेव्हापासून आपल्या देशात राबणारा शेतकरी, यंत्रामागील कामगार, इतर हलकी पण कष्टाची कामे करणारे कनिष्ठ, समाजाच्या खालच्या पातळीवरचे मानले जाऊ लागले आणि त्यांची कामे कमी प्रतिष्ठेची मानली जाऊ लागली.
याच कल्पनेतून आपल्या देशाचे अनहित ओढवले. माणसे करण्याचे टाळू लागली आणि सर्वांना कमी श्रमांची, पांढरपेशी कामे हवीशी वाटू लागली. आळसाला थारा मिळाला आणि देशाची प्रगती खंटली. याउलट श्रमांना योग्य प्रतिष्ठा असलेला जपान देश मात्र आज विश्वात अग्रेसरत्व प्राप्त करू शकला आहे.
नव्या युगात हे सत्य आता आपल्या देशानेही ओळखले आहे. कवी मर्डेकर कारखान्यांत खपणाऱ्या कामगाराला 'नच्या मनचा गिरिधर म्हणतात. तर शेतात कष्टणाऱ्या शेतकऱ्याचा उल्लेख महात्माजी अन्नदाता' असा करतात. मातीत काम करण्यात कोणताही कमीपणा नाही, ही पाश्चात्यांची कल्पना आता सर्वत्र स्वीकारली जात आहे आणि आपल्या देशातही श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.
वरील निबंध SHRAM PRATISHTHA ESSAY IN MARATHI | श्रमप्रतिष्ठा मराठी निबंध : हा निबंध तुम्हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्य कळवावे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
श्रमप्रतिष्ठा मराठी निबंध |SHRAM PRATISHTHA ESSAY IN MARATHI
मानव हा एकच प्राणी असा आहे की, ज्याला पोटाच्या भुकेबरोबर मनाचीही भूक असते. जीवन जगताना काही तत्त्वे व मूल्ये तो पाळतो. संस्कारांचं अधिष्ठान मनी रुजवून आयुष्याची मार्गक्रमणा करतो. श्रमप्रतिष्ठा! मूल्यशिक्षणातील दहा मूल्यांपैकी एक महत्त्वाचं मूल्य.
श्रमप्रतिष्ठेचा अर्थच मुळी श्रमांना मोलाचे स्थान. कुठलेही काम हलक्या दर्जाचे नसते. काहीही काम न करता आयती श्रीखंड पुरी खाण्यापेक्षा कष्टाची भाकरी बरी! आपण भारतवासी तर अथक परिश्रमांनी हिमालयातून गंगानदी भारतात वळवणाऱ्या भगीरथाचे वंशज. हातात अक्षरश: कुदळ घेऊन आनंदवन फुलवणाऱ्या बाबा आमट्यांचे पाइक. हात-पाय गाळून बसलो, तर कार्यसिद्धी होणारच नाही हे समजणारे.
म्हणूनच, शृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधळायास आता आसवांना वेळ नाही. हे तत्त्व सदानकदा लक्षात ठेवायला हवे. एकदा दोन बेडूक मोठ्या दह्याच्या भांड्यात पडतात. पहिला हताश होतो आणि बुडून मरून जातो. दुसरा बेडूक हातपाय हालवित राहतो.
काहीतरी मार्ग निघेल ह्या आशेनं पोहत राहतो आणि काय आश्चर्य दह्याचं ताक होऊन त्यावर लोणी येतं नी बेडूक त्यावर तरंगून अलगद वरती उडी मारून बाहेर पडतो कारण त्याच्या सतत पोहण्याने दही घुसळले जाते. 'थांबला तो संपला' ह्या न्यायाने पहिला बेडूक मात्र मृत्यूमुखी पडतो.
पंत्रतंत्रांतील शेतकऱ्याच्या आळशी मुलांची गोष्टही आपल्याला माहीत आहे. मरताना शेतकरी मुलांना शेतात पुरलेल्या धनाच्या हंड्याबद्दल सांगतो. आळशी मुले धन शोधण्यासाठी पूर्ण शेत खणून काढतात. खणलेच आहे म्हणून शेतकरी त्यांना ज्वारी पेरायला सांगतो. काही दिवसांनी मोत्यांच्या कणसांनी शेत गच्च भरते. 'हेच ते धन' सांगून शेतकरी आळशी मुलांचे डोळे उघडतो!
श्रीराम विश्रामात नाही, तो श्रमात आहे. श्रम हेच खरे श्रीरामधाम आहे. श्रमदानाने शाळा, रस्ते, परिसर झाडून स्वच्छ केला; तर मनाला किती बरे समाधान होते. मदतीचा हात गरजू व्यक्तीला दिला, तर त्याची निकडही भागते. आईला मदत म्हणून, घर आवरले, भाजी निवडून, चिरून दिली तर कोण आनंद होतो सांगू!
आमच्या शाळेतील काही मुले तर शाळा सुटल्यानंतर हॉटेलात, मंडईत काम करतात. स्वकष्टार्जित कमाईमुळे श्रमप्रतिष्ठेचे मूल्य तर त्यांना कळतेच पण त्याबरोबर स्वाभिमान व स्वावलंबनही त्यांच्या नसानसात भिनते. Earn and learn हे त्यांना बालवयातच कळते. कठोर परिश्रम म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती प्रचंड चिकाटी अंगी असलेली हेलन केलर! मुक्या, बहिऱ्या व आंधळ्या हेलनने प्रचंड कार्य केले.
वयाच्या पाचव्या वर्षी तिला पोलिओने घेरले होते. परंतु दुर्दम्य इच्छाशक्ती व कठोर श्रमांच्या जोरावर १९५६ च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून तिने जागतिक विक्रम प्रस्थापित केले.. God helps them, who help themselves! बापूजींसारखा थोर महात्मा हातात झाडू घेऊन अस्पृश्यांची वस्ती, स्वच्छ करायला जाई. ते आले की लोक आनंदाने नाचत, गात..
'आला हो हरी आला हो, भंग्याघरी हरी आला हो' म्हणत त्यांचं स्वागत करीत व पुढील स्वच्छता मोहिमेसाठी हाती झाडू घेत. श्रीसंतगाडगेबाबांनी गावेच्या गावे स्वच्छ करून श्रमांचं महत्त्व लोकांना पटवलं. आजही आपण 'गाडगेमहाराज ग्राम स्वच्छता अभियान' गावोगावी राबवतो.
नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात राळेगण शिंदी नावाचं दुष्काळग्रस्त गाव आहे. जेथे महिला पिण्याचं पाणीदेखील चार मैलांवरून डोक्यावरून आणत. तिथे एक प्रभृती जन्माला आली अण्णा हजारे! गावाचा कायापालट करणारा थोर समाजसेवक.
अण्णांनी गावकऱ्यांच्या श्रमदानातूनच पाझर तलाव खणले. गावात उन्हाळ्यातही पाणीच पाणी केले. गावातील संडास व मुताऱ्यांवर सोनखत व नत्रयुक्त खतनिर्मिती केली, जमिनींना ही जैविक खतं मिळाल्यानं पिके फोफावली. शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं भागून, पाहुण्यांना जेवू घालणारी, गरजूंना धान्य, कर्ज देऊ शकणारी मोठी धान्यबँक गावात सुरू झाली. हा स्वकष्टाचा मूर्तीमंत महिमा!
स्वकष्टे गाव झाला आदर्श, प्रयत्ने सुखी होय स्वदेश प्रयत्ने विश्वशांतीचे सायास, सफल होती ॥ 'श्रमिकांच्या पाठी उभा गिरीधारी' हेच खरे! भारतात हरितक्रांती झाली त्यामागून श्वेतक्रांतीही झाली. पण ह्या गोष्टी एका रात्रीतून होत नाही. त्यामागे अनेक कष्टकऱ्यांचे श्रम, शारीरिक व बौद्धिक असतात.
इस्रायलसारखा चिमुकला, वाळवंटी प्रदेशातला देश श्रमांच्या घामांनी भिजला, फुलला, बहरला व अन्नाच्या बाबतीत स्वयंपूर्णही झाला. 'जेथे राबती हात तेथे हरी.' “धीर धरावा धैर्यधर होऊन, यत्न करावा भगीरथ स्मरून अथांग गगनी करावं उड्डाण, बळ फिनिक्सचे पंखात भरून"
हा मंत्र मनात उच्चारत, कर्मदेवाची पूजा श्रमांच्या फुलांनी करत अक्षरश: राखेतन उभा राहणारा देश म्हणजे जपान! अणबॉम्बच्या संहारक माऱ्यानंतर सावरलेली जपानमधली हिरोशिमा, नागासाकी शहरे. श्रमप्रतिष्ठेवर निष्ठा ठेवून शून्यातून, शंभर टक्के विकासाकडे जाण्याचा प्रवास जपानने केला. अश्रुतून नव्हे घामातून विकासाची बीजं रुजवली. आपल्या देशात तर स्वत: भगवंतानं, श्रीकृष्णाने गुरे चारली, गाई वळल्या, भक्तासाठी जात्यावर दळले, कांडले,
शेतातल्या पिकांना पाणी दिले, धान्याच्या खळ्यांचे रक्षण केले. कुठलेही काम करणे कमी प्रतीचे वा हलक्या दर्जाचे नाही, हेच शिकवण्यासाठी जणू भगवंताने हे श्रम केले. आदरणीय सानेगुरुजींनी अनेक वर्षांपूर्वी सांगितलंय की, एकविसाव्या शतकात पुस्तकी ज्ञानापेक्षा कौशल्य व श्रमालाच महत्त्व आहे. ते म्हणत,
एक हात भू नांगरणे, शत व्याख्यानांहून थोर एक हात खादी विणणे, मंत्र जपाहून थोर एक वस्त्र वा रंगविणे, तव पांडित्याहुन थोर शेतकरी तसे विणकरी, तसे रंगारी बना देशाचे आळशी न कुणी कामाचे या पुढे .... ॥ डॉ. अब्दुल कलाम, पी.टी. उषा, थोर शास्त्रज्ञ कार्व्हर, बरबँक, लुई पाश्चर ह्यांच्या नुसत्या आठवणींनी आमचे बाहू फुरफुरतील श्रमांचे वेद मंत्र मुखातून स्फुरतील.
उच्च महत्त्वाकांक्षेचे बीज अन परिश्रमांचे खतपाणी यातूनच फोफावेल यशाचा कल्पवृक्ष फुलेल बहरेल घामांच्या धारांतून चैतन्यानं सळसळेल, विश्वशांतीचा वृक्ष...! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.