महात्मा गांधी निबंध मराठी | Mahatma Gandhi Nibandh In Marathi
निबंध क्रं. १
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महात्मा गांधी मराठी निबंध बघणार आहोत. सत्य आणि अहींसेचा मार्ग वापरून विविध चळवळीच्या माध्यामातुन भारताला गुलामगीरीच्या बेळीतुन मुक्तता मिळवुन देण्याचे कार्य महात्मा गांधीजींनी पुर्ण केले. जन्माने सामान्य असणारे गांधीजी आपल्या कार्यामुळे कश्याप्रकारे महान व्यक्तीमत्व प्राप्त करू शकले याची सखोल माहीती खालील 4 निबंधात प्रस्तुत केली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.मानवतेचा मानदंड महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, 'महामानव', गांधीजी स्वत:ला नेहमी 'एक सामान्य माणूस' मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे 'गांधीजी' होय.
महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.
भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हे अर्धनग्न अवस्थेत जिवन जगतात, अर्धपोटी राहतात हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा छोट्या वस्तीत राहणे त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वत: सदैव पुढे येत असत.
मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजीनी 'दांडी यात्रा' काढली. महात्माजींंनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातीतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची हत्या झाली. आज गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने ते अमर झाले आहेत.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध क्रमांक २
राष्ट्रपिता महात्मा गांधी
महत्वाचे मुद्दे : (टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- सामान्यातून असामान्य
- चुका कबूल करण्याची वृत्ती -
- आत्मवृत्ताला नाव 'सत्याचे प्रयोग '
- बॅरिस्टर झाल्यावर आफ्रिकेला प्रयाण
- विषमतेची वागणूक सशस्त्र सत्तेला अहिंसेने उत्तर
- भारतदर्शन
- राजकारणात प्रवेश
- सत्याग्रह निःशस्त्र प्रतिकार
- सविनय कायदेभंग
- उपोषण
- निरपेक्ष समाजकार्य
- सर्व जनतेचे बापू
- सेवाग्राममधून समाजसेवा
- कुटिर उदयोगांना महत्त्व
- सत्ता पद स्वीकारले नाही
- सत्यासाठी मरणही पत्करले
- राष्ट्राचा पिता.
भारताला स्वतंत्र करण्यासाठी अनेक महान स्त्री व पुरूषांनी आपले सर्वस्व राष्ट्राला अर्पण केले . अश्या महापुरूषापैकी एक होते महात्मा गांधी. महात्मा गांधी युगपुरूष होते. त्यांच्या बद्दल सर्व विश्व आदराची भावना ठेवत होते . अश्या महामानवाला नमन करूया आणि निबंधाला सुरूवात करूया .
महात्माजींच्या कार्याची थोरवी गाताना प्रसिद्ध वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणाले होते, "आणखी काही पिढ्यांनंतर लोकांचा विश्वासही बसणार नाही की, असा कधी कोणी माणूस झाला होता." ध्येयवेडाने प्रेरित झाल्यावर एका सामान्यातून असामान्य व्यक्तिमत्त्व कसे फुलू शकते, त्याचे महात्माजी हे उदाहरण आहेत. २ ऑक्टोबर १८६९ ला काठेवाडमध्ये पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला होता.
त्यांची विदयार्थिदशा ही इतर सर्वसामान्य मुलांसारखीच होती. त्या वयात त्यांच्याही हातून चुका झाल्या. त्यांचा वेगळेपणा एवढाच की, त्यांनी आपल्या चुका कबूल केल्या. पुढेही जीवनात वेगवेगळे प्रयोग करताना जेव्हा जेव्हा चुका झाल्या, तेव्हा तेव्हा त्या त्यांनी सर्वांपुढे मान्य केल्या व त्याचे शासनही स्वत:ला करून घेतले. आपल्या आत्मवृत्तालाही त्यांनी नाव दिले आहे 'सत्याचे प्रयोग.' दुसरा गांधीजींचे विशेष म्हणजे परदेशात जाण्यापूर्वी आपल्या मातेजवळ त्यांनी ज्या प्रतिज्ञा केल्या त्या आयुष्यभर पाळल्या.
वयाच्या अट्ठाविसाव्या वर्षी बॅरिस्टर गांधी कामानिमित्त आफ्रिकेत गेले, पण तेथील हिंदी लोकांना मिळणारी अमानुष वागणूक पाहून त्यांच्या कार्याचे स्वरूपच बदलले. त्यांना स्वत:लाही 'काळा आदमी' म्हणून हा छळ काही काळ सहन करावा लागला आणि तेथेच त्यांच्या कार्याचे स्वरूप ठरले. या अन्यायापुढे मान तुकवणे योग्य नाही, हे त्यांना जाणवले. त्याच वेळी गांधीजींनी सशस्त्र शक्तीपुढे 'अहिंसे'चे हत्यार स्वीकारले. "हे सामर्थ्य आपल्याला आपल्या पत्नीकडून मिळाले" असे महात्माजी सदैव सांगत.
आफ्रिकेतून परत आल्यावर आपल्या गुरूंच्या ना. गोपाळ कृष्ण गोखले यांच्या - सांगण्यानुसार गांधीजींनी संपूर्ण भारताचे - भारतीय समाजाचे दर्शन घेतले आणि १९२० पासून आपल्या लढ्याला सुरुवात करताना सत्याग्रह, नि:शस्त्र प्रतिकार, सविनय कायदेभंग व स्वदेशीचा पुरस्कार या चतु:सूत्रीचा स्वीकार केला. एखादया लढ्यात हिंसेने प्रवेश केला, तर गांधीजी त्या क्षणी तो लढा थांबवत व उपोषणाचा मार्ग स्वीकारून स्वशासन करून घेत.
यानंतर गांधीजी जगले ते देशासाठी, त्यांनी कधीही आपल्या पत्नीचा, आपल्या मुलांचा, कुटुंबाचा वा घराण्याच्या स्वार्थाचा विचार केला नाही, त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांचा मोठा मुलगा हरिलाल त्यांना दुरावला, पण ते संपूर्ण भारतीय जनतेचे 'बापू' झाले होते. ब्रिटिशांशी लढण्यात ते अखंड गुंतलेले असतानाही आपल्या देशातील दलित पीडित समाजाचा त्यांना क्षणभरही विसर पडला नव्हता. हरिजनांच्या उद्धारासाठी त्यांनी 'हरिजन' साप्ताहिक चालवले. साबरमतीच्या सेवाश्रमात त्यांनी हरिजन, आदिवासी, कुष्ठपीडित सर्वांची सेवा केली. मोठ्या कारखान्यांपेक्षा 'कुटिर उदयोगा'ला ते महत्त्व देत.
बापूजी जे जगले ते इतरांसाठीच. म्हणून कवी मनमोहन म्हणतात, 'चंदनाचे खोड लाजे। हा झिजे त्याहूनही कोणतेही पद, कोणतेही स्थान, सत्ता त्यांनी स्वीकारली नाही. असेच कार्यरत असताना ३० जानेवारी १९४८ रोजी या राष्ट्रपित्याचा एका मारेकऱ्याने खून केला. त्यावेळी प्रसिद्ध नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाले होते, “या जगात अतिशय चांगले असणेही तितके चांगले नाही."
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
निबंध क्रमांक ३
Mahatma Gandhi Information In Marathi Essay
महत्वाचे मुद्दे :- महात्मा गांधी
- आवडते पुढारी
- सत्याग्रह व असहकार ही शस्त्रास्त्रे
- बापूजीपासून महात्माजी
- सत्वाचे प्रयोग' आत्मचरित्र
- असामान्य धाडस
- सशस्त्र शक्तीशी निशस्त्र मुकाबला
- असहकार चळवळ
- दांडी यात्रा
- चले जाव आंदोलन
- निकंलक चारित्र्य
- संयम, मनोनिग्रह
- सामान्याकडून असामान्यत्वाकडे वाटचाल
राष्ट्रपिता महात्मा गांधी हे माझे आवडते पुढारी आहेत. सत्याग्रह व असहकार या जगावेगळ्या अहिंसक शस्त्रांनी त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. बापूजी 'महात्मा' कसे झाले, याचा शोध घेतला की त्यांच्या चरित्रातील दिव्यत्व प्रत्ययास येते. आपली जीवन कहाणी सांगताना बापूजी तिचा उल्लेख 'सत्याचे प्रयोग' म्हणून करतात. आपल्या जीवनातील सर्व चुकांची त्यांनी प्रांजळपणे कबुली दिली आहे. गांधीजींनी लोकांना सत्याचे नुसते पाठ दिले नाहीत, तर स्वत:च्या जीवनात सत्याचे प्रयोग प्रत्यक्ष करून दाखवले.
महात्माजीचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी, बापूजींनी आयुष्यभर सत्य, अहिंसा या व्रतांचे कठोरपणे पालन केले: बापूजीजवळ असामान्य धाडस होते. आपल्या देशातील लोकांची गरीबीची अवस्था पाहून बापूजी केवळ पंचा नेसूनच सर्वत्र वावरू लागले. बापूजींंनी आपला देश, भारतीय संस्कृती, भारतातील सर्वसामान्य माणूस यांचा प्रथम विचार केला. म्हणूनच सशस्त्र चळवळीचा हिंसक मार्ग त्यांनी अनुसरला नाही.
सशस्त्र सरकारला त्यांनी आव्हान दिले ते नि:शस्त्र हातांनी. 'सत्याग्रह या नवीन अस्त्राचा उपयोग त्यांनी प्रथम आफ्रिकेत आणि नंतर भारतात केला. १९२० ची बापुजीची असहकार चळवळ, १९३० ची 'दांडी यात्रा' व १९४२ चा 'चले जाव' लढा' हे संपुर्ण विश्वातील स्वातंत्र्य आंदोलनांमधील सोनेरी क्षण होते. बापूजींच्या मोठेपणाचे रहस्य त्यांच्या निष्कलंक चारित्र्यात होते. बापुजींजवळ विलक्षण 'संयम' होता.
आजच्या विदयार्थ्यांत कोणत्याही त-हेचा 'मनोनिग्रह' आढळत नाही. मनोनिग्रहाचे महत्त्व त्यांना बापूजींच्या जीवनचरित्रातून कळून येईल. एकदा डॉक्टरांनी कस्तुरबांना आजारपणात मीठ सोडायला सांगितले होते, परंतु त्या तयार नव्हत्या. तेव्हा बापूजींनी त्यांचे मनोबल तयार करण्यासाठी स्वत:च मीठ सोडले. खजूर व शेळीचे दूध या साध्या पदार्थांवर ते अखेरपर्यंत राहिले.
सत्ता, संपत्ती यांच्या जीवघेण्या स्पर्धेत बापूजी केव्हाच अडकले नाहीत. आफ्रिका सोडताना आपल्याला मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशकार्यासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तेच्या कोणत्याही पदाची हाव न धरता, ते निर्वासितांच्या सेवेला धावून गेले. सामान्याकडून असामान्यत्वाकडे यशस्वी वाटचाल कशी करता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे आमचे राष्ट्रपिता बापूजी !
प्रख्यात तत्त्वज्ञ आईनस्टाईनने महात्माजी र्विषयी असे म्हटले आहे की, “आणखी काही वर्षांनंतर असा एक मनुष्य झाला होता, यावर कोणी विश्वास ठेवणार नाही."सर्वाना सत्य व अहिंसेचा मार्ग दाखवणारे आपले आवडते बापू आता आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांची तत्वे नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत राहतील .
मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला महात्मा गांधी निबंध मराठी आवडला असेल , निबंध पुर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद
निबंध क्रमांक 4
राष्ट्रपिता महात्मा गांधी Essay On Mahatma Gandhi In Marathi
भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर होते. त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शिखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती. आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते.
सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही.
जे असाधारण, असंभव आणि अविश्सनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार, साधेपणा, खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती. वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.
किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले.
तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. 'गीता' त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.
१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले.
त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली. त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला.
परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.
१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी 'यंग इंडिया''हरिजन' ही वत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच 'स्वराज्य' ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली 'भारत छोड़ो' चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.
शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले.
दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, "आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले."
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
निबंध क्रमांक 5
बापूजी - एक थोर आदर्श
"दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती॥ २ ऑक्टोबर महात्मा गांधीजींचा जन्मदिवस. आता, आंतरराष्ट्रीय स्तरावर 'अहिंसा दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. अशी नुकतीच वर्तमानपत्रातून बातमी आली. राष्ट्रपिता महात्माजींची अनमोल कारकीर्द- प्रकर्षाने डोळ्यासमोरून जाऊ लागली.
सध्याचे युग 'कलियुग, आक्रमणाचे युग'. रोज वृत्तपत्रात कोठे ना कोठे तरी बंद - हरताळ, जाळपोळ, बलात्कार, लूटमार, दरोडा, घातपात, बॉम्बस्फोट, मोर्चे अशा बातम्या नित्य-परिचयाच्या झाल्या आहेत. शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र आणि सरळमार्गी असणाऱ्या क्षेत्रातूनही विद्यार्थी - शिक्षण महर्षी संस्थाचालक या सर्वामध्ये अनाचार-भ्रष्टाचार-मारामारीच्या बार्ता आता सरसकट येऊ लागल्या आहेत, मागील शतकार्धात आम्ही स्वातंत्र्यासाठी परकीयांसाठी लढत होतो. आता आपणच आपल्याशी झगडत आहेत आणि आपल्या प्रगती मार्गात मोठे अडथळे निर्माण करीत आहोत. - 'राष्ट्राचे भावी नागरिक' म्हणून आपण युवाशक्तीला, विद्यार्थ्यांना आवाहन करतो, जागरूक करण्याचा प्रयत्न करतो,
परंतु हीच शक्ती, हेच विद्यार्थी आपल्या हक्कांविषयी विशेष जागरूक असताना, पण कर्तव्यांविषयी नाही, त्यांच्या त्या पोरकटपणामुळे, अजाणतेमुळे ते न झालेल्या अन्यायाविरुद्धही चिडून उठताना दिसतात. आणि मग अशात-हेने चुकलेल्या या वासरांना योग्य मार्गाला नेणारा आदर्शच राहिला नाही. अशावेळी आठवण होते ती आपल्या बापूजींची, त्या थोर राष्ट्रपित्याची..
ही कोवळी, अपरिपक्व मुले आणि त्यांच्या सभोवताली हे स्वार्थान-अत्याचाराने-सत्ताप्राप्तीसाठी काहीही करायला निघालेल्या सत्तांधाने बरबटलेले. कसे आणि कोण करणार यांच्यावर संस्कार ? कोण देणार यांना उपदेश ? कोण ठेवणार यांच्यापुढे आदर्श ? अशा या बालकांपुढे गांधीजींच्या थोर जीवनाची अगदी जवळून ओळख करून देणे, आज आवश्यक ठरले आहे.
'२ ऑक्टोबर' महात्माजींचा जन्मदिवस या दिवशी आपण सुट्टी घेतो. परंतु निदान तो दिवस तरी विद्यार्थ्यांसाठी के वळ गांधीजींचा जीवनपरिचय करून देण्यात गेला तरी पुष्कळ गोष्टी साध्य होतील. गांधीजींचे बालपण, जीवनचर्या, शिक्षण, बालपणातील अनुभवातून लिहिलेले 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक, हरिश्चंद्र नाटकाचा त्यांच्या मनावर झालेला परिणाम, एकदा कोठे बोलल्यानंतर त्यांच्या वडिलांकडून मिळालेली शिक्षा, नंतर प्रत्येक गोष्ट सत्यपणे सांगायची त्यांची सवय, जीवनातील अपयशही प्रामाणिकपणे सांगण्याची त्यांची पद्धत... अशा अनेक गोष्टींचा बालजीवनावर निश्चित चांगला परिणाम होईल.
बापूजींच्या जीवनातील तो अतिशय महत्त्वाचा प्रसंग, द. आफ्रिकेमध्ये असताना... काळ्या लोकांना दिली जाणारी वागणूक तो रेल्वेमधील प्रसंग... त्यातून त्यांचे दिसणारे देशप्रेम... धाडस-धडाडी, निश्चितपणे मुलांना देशप्रेमाचा उपदेश करून जाईल. आपण सामान्य माणसे अनेकदा न पटणाऱ्या गोष्टी इतरांसाठी करतो, इतर लोक आपल्याला हसतील म्हणून आपण घाबरतो. परंतु गांधीजी स्वतः धुतलेले कपडेच परदेशात घालत असत.
बापूजींच्या पंचाची तर आपल्या देशात तर चेष्टा झाली, परदेशातही फार चेष्टा झाली. पण त्यांनी पंचा वापरणे सोडले नाही, अशा पद्धतीने "माझ्या देशातील लोकांना जर अंगभर कपडा मिळत नाही तर, मी कसे घालू अंगभर कपडे ?" असा महान हेतू - विचार त्यांच्यामागे होता. म्हणूनच गांधीजींनाच ते शोभले आणि जीवनभर निभावले.
गांधीजींचा ‘संयम' फार मोठा होता. मद्य, मांस आणि परस्त्री या तीन गोष्टींपासून कायम दूर राहण्याचे वचन त्यांनी आपल्या मातेला दिले होते, ते त्यांनी अखेरपर्यंत पाळले. हा संयम - असा मनोनिग्रह आजच्या पिढीत कोठून येणार, कोठे आढळणार?
तो गांधीजींच्या चरित्रातून निश्चितच विद्यार्थ्यांना मिळेल. एकदा त्यांच्या पत्नी-कस्तुरबा यांना 'मीठ' सोडण्यास डॉक्टरांनी सांगितले. त्या तयार नव्हत्या म्हणून बापूजींनीच मीठ सोडले, नंतर त्या कबूल झाल्या. गांधीजी खजूर आणि शेळीचे दूध या साध्या गोष्टींवर अखेरपर्यंत जगले.
सत्ता, संपत्ती यांच्या विनाशक स्पर्धेत बापूजी केव्हाही अडकले नाहीत. द. आफ्रिकेतून परत येताना त्यांना मिळालेल्या सर्व भेटी त्यांनी देशासाठी देऊन टाकल्या. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते कोणत्याच सत्तेच्या पदावर राहिले नाहीत तर निर्वासितांच्या सेवेसाठी रुजू झाले. त्यांचे स्वतःचे अक्षर चांगले नव्हते. पण ते म्हणत वाईट अक्षर हे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.
अशा या केवळ भारतापुरतेच नाही तर साऱ्या जगात महान ठरलेल्या बापूजींना आपल्या देशाचा स्वातंत्र्यदिनाचा हीरक महोत्सव साजरा करताना आमचे शतशः प्रणाम...