माझा आवडता नेता मराठी निबंध | maza avadta neta nibandh in marathi
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता नेता मराठी निबंध बघणार आहोत. गुणी माणसांचे गुणच दूताचे काम करतात. त्यांची कीर्ती दूरवर पसरवितात. डॉ. राधाकृष्णन् याला अपवाद नव्हते. त्यांच्या अलौकिक गुणांमुळेच त्यांनी त्रिखंडात कीर्ती गाजवली.
राधाकृष्णन् ! या नावातच किती माधुर्य आहे ! उत्कट भक्तीचा आविष्कार म्हणजे राधा, मूर्तिमंत तत्त्वज्ञान म्हणजे कृष्ण ! एक शुद्ध प्रेमरूप तर दुसरे केवळ ज्ञानरूप ! या दोहोंचा मनोज्ञ संगम म्हणजे डॉ. राधाकृष्णन.
थोर कुळात जन्म किंवा लक्ष्मीची कृपा यांचा लाभ त्यांना झाला नाही. पण सरस्वतीचा वरदहस्त मस्तकी होता आणि त्याला दीर्घोद्योगाची जोड मिळाली. थकवा किंवा आळस त्यांना माहीतच नव्हता. अध्ययन, अध्यापन, चिंतन, लेखन यातच त्यांचा दिवस व्यतीत व्हायचा.
ग्रंथांच्या सहवासात ते तहानभूक विसरत. रशियाचा हुकूमशहा स्टॅलिन यानेही 'चोवीस तास अध्ययन करणाऱ्या या भारतीय प्रोफेसरला मला भेटायचं आहे' अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या गुणांची भुरळ इंग्रजांना पडली पण इंग्रजांच्या संस्कृतीची भुरळ डॉ. राधाकृष्णन यांना कधीच पडली नाही. ख्रिश्चन शाळेत शिक्षण घेऊनही त्यांची स्वधर्मावरील श्रद्धा कमी झाली नाही. ज्या काळात परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची टूम होती त्या काळातही त्यांना त्याबद्दल ओढ वाटली नाही. उलट 'मी युरोपात जाईन ते शिकविण्यासाठी, शिकण्यासाठी नव्हे' असा जाज्वल्य स्वदेशाभिमान आणि दुर्दम्य आत्मविश्वास त्यांच्या ठायी होता.
शिक्षक, प्रोफेसर, कुलगुरू, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती इत्यादी बहुमानाची पदे त्यांनी भूषविली. इंग्लंडने मानाची 'सर' पदवी त्यांना दिली. 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताबही मिळाला पण अहंकाराचा वारा त्यांना शिवला नाही. फलभाराने वाकलेल्या वृक्षाप्रमाणे ते अत्यंत नम्र होते. 'आयुष्यात जे यश वाट्याला आले त्याचे श्रेय देवाला आणि दैवाला आहे,' असे ते म्हणत.
बी. ए. ला 'तत्त्वज्ञान' विषय घेतल्यामुळे पाश्चात्य ग्रंथ वाचण्यात आले आणि हिंदुधर्म अपुरा आहे असे वाटून ते खिन्न झाले. त्याच वेळी स्वामी विवेकानंद विश्वभ्रमण करून हिंदू धर्माची थोरवी पाश्चात्य जगाला पटवून देत होते. त्यांची भाषणे, लेख, पुस्तके डॉ. राधाकृष्णन् यांनी वाचली. हिंदुधर्माचे चिकित्सक दृष्टीने अध्ययन केले आणि भारताची सांस्कृतिक वकिली करणे त्यांचे जीवनकार्य बनले. लो. टिळकांनी गीतारहस्यात डॉ. राधाकृष्णन यांच्या लेखनातील अवतरणे दिली आहेत.
स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान या तत्त्वज्ञानाच्या चालत्या बोलत्या विश्वकोषा' ला मिळाला.
अमोघ वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभली होती. केंब्रिज विद्यापीठात 'ब्रडले आणि शंकराचार्य' या व्याख्यानात 'माया' हा अत्यंत गहन विषय त्यांनी सोपा करून सांगितला. आश्चर्य म्हणजे कोणतीही टिपणे न काढता! ते इंग्रजीतून एक तास अस्खलित बोलू शकत.
त्यांच्या व्याख्यानसमयी जागा मिळण्यासाठी इंग्लिश लोक तासन् तास आधी येऊन बसत. वक्तृत्वाचे सुंदर लेणे, ईश्वराघरचे देणे होते. डॉ. राधाकृष्णन् वक्तशीर, कडक शिस्तीचे भोक्ते होते. विषय सोपा करून सांगण्याची हातोटी त्यांच्या ठायी होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या घराचे दार सदैव खुले असे. गरजू विद्यार्थ्याला मदतीचा हात देणे त्यांचा सहजस्वभाव होता. ते म्हैसूर सोडून कलकत्ता विद्यापीठात गेले तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी घोडागाडी स्वतः ओढत स्टेशनवर पोचवली.
प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांची गर्दी आणि डोळ्यात अश्रूनी गर्दी केली होती. 'राधाकृष्णन् की जय' असा जयजयकार सर्व करत होते. अशी अफाट लोकप्रियता एखाद्याच्याच वाट्याला येते. “माणसाने अंतराळात खुशाल जावे अन्य ग्रहांवर हिंडून यावे. परंतु आपल्या पायाने नीट जमिनीवर आधी चालायला शिकावे. त्याशिवाय त्याची बुद्धी, हुशारी व्यर्थ आहे.'' असा बहुमोल संदेश देणाऱ्या त्या थोर द्रष्ट्याला विनम्र अभिवादन.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
माझा आवडता नेता : महात्मा गांधीजी | maza priya neta mahatma gandhiji essay in marathi
माझा आवडता नेता म्हणून महात्मा गांधीजींचे नाव माझ्या हृदयात कोरले गेलेले आहे. मी डोकावतो.क्षणभर मला भास होतो की , वर्षानुवर्षांपूर्वी लावलेली एक दिपकज्योती धडपडते आहे.माहीत आहे , कोणती ती ज्योत? राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जीवनज्योत , जी चिरंजीव आहे , अजरामर आहे. पारतंत्र्याच्या काळोख्या रात्रीतही स्वातंत्र्यस्फूर्तीच्या किरणांनी याच ज्योतीने तरुणांना जागे केले.
आजच्या नेत्यांपेक्षा बापू खूप खूप वेगळे होते. जनसेवेची , त्यागाची जिवंत भावना त्यांच्या नसानसात होती. देशासाठी त्यांनी तन-मन-धन सारं अर्पण केलं होत म्हणूनच दुःखित हृदयानं , करूण स्वरांनी त्यांना 'बापू' म्हणूनच हाक मारली. जगान त्यांना संत म्हणूनही ओळखलं, तर इतिहासकारांनी 'युगपुरुष' मानलं. नेता बनून मग लोकसेवा करण्यापेक्षा लोकसेवा करून ते नेता बनले होते. त्यांच्या कार्यामागे सारा देश धावत होता. स्वतंत्र अन् समृध्द भारत' हे त्यांच सुखद, मधुर स्वप्न होतं. निःस्सीम त्याग , प्रयत्नांची पराकाष्ठा अन् दृढ निष्ठा यांच्या त्रिवेणी संगमाने त्यांच हृदय अथांग भरलं होत .
गुलामीच्या शृंखला तोडण्यासाठी त्यांचे हात शिवशिवत होते. धर्म , अहिंसा, आणि सत्य या त्रिसूत्रीच्या निर्मल पवित्रतेवर त्यांचं प्रत्येक कार्य निर्भर होतं. "माझ्या स्वप्नातल्या भारतात अस्पृश्यतेचा शाप नांदू शकणार नाही' असे बापू म्हणत.
राजकीय व्यक्तीबरोबरच सरळ अन् पवित्र हृदयाची व्यक्ती म्हणून बापूंचा उल्लेख केला जातो. गरीबांना चरख्याचा मंत्र देणारे , देश एकतेसाठी राष्ट्रभाषेचा प्रचार करणारे, जातिभेद नष्टकरून हिंदू-मुस्लिम एकतेसाठी धडपडणारे बापू खरंच आपल्याला शिकण्यासारखे खूप-खूप ठेवून गेले.
शत्रूविषयीसुद्धा आत्मीयता बाळगणारे बापू म्हणत- “क्षमा हेच बलवंताचे खरे लेणे असते.' प्रार्थनेविषयी ते म्हणत-‘शरीराला जशी अन्नाची जरूरी, तशी आत्म्याला प्रार्थनेची!'' 'सत्य हीच प्रभूची पूजा" असा त्यांचा विश्वास होता.सत्य - अहिंसेच्या जोरावरच त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला.त्यांच्या निश्चयी स्वभावाने त्यांना देशकार्यात गुंतवून ठेवले. अन्यायाविरुद्ध ते झटले.
१९२० च्या असहकार चळवळीत उचललेली पावले आणि १९३० च्या दांडी यात्रेतील पावले स्वातंत्र्याच्या मार्गात अशी कोरली गेली की, स्वातंत्र्य आंदोलन आख्खे ढवळून निघाले. १९४२ च्या 'चले जाव' ने सारा भारत दुमदुमला निःस्वार्थ स्वातंत्र्यप्रेम होतं ते ! सत्ता , वैभव यांच्यापासून कोसो दूर! एक पंचा बांधून देशसेवेला अर्पण झालेलं अस व्यक्तीमत्त्व! स्वातंत्र्यप्रेमाच्या नंदादीपाने भारतवासीयांच्या हृदयात सत्कार्याच्या ज्योती पाजळणारे गांधीजी, त्यांचे जीवन आजही डोळ्यासमोर आणा.आपल्याही भावना उफाळून येतील.त्यांच्या विविधरंगी गुणी व्यक्तीमत्त्वाला एक गुण जरी आपण घेतला तरी जीवनाच सार्थक होईल.आपल्याजीवनपुष्पाला अशा प्रेरणेची नितांत गरज आहे.
वस्तुतः आजचा युवक उत्साही व क्रियाशील आहे. पण त्याला उचित मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.स्वातंत्र्याची प्रभात जरी आपल्या देशात झाली असली तरी 'सुराज्याचा प्रकाश' अजून देशातील काना-कोपऱ्यातील झोपडीपर्यंत पोहचलेला नाही. त्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक तरूणाला कार्यतेज व शक्ती देण्याचे सामर्थ्य महात्मा गांधीच्या जीवनकथेत आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी देशाला ग्लानी येईल, त्याचा आत्मविश्वास विचलित होईल, परक्यांच्या प्रभावाने तो स्वसत्वाला पारखा होईल, निराशेने त्रस्त व ग्रस्त होईल , त्या त्या वेळी समाजाने अन् देशाने महात्मा गांधीजीचे स्मरण करावे. त्यांच्या आदर्शाचा स्वीकार करावा निश्चित नवा चांगला मार्ग मिळेल.
आज बापूजी असते तर! स्वार्थ भ्रष्टाचार व सत्ता यातून विनाशाकडे अशी दुष्ट वाटचाल संपली असती. समाजाच्या समस्या ओळखून योग्य प्रयत्न झाले असते. संस्कृती व मानव यांची सांगड घडली गेली असती. सुराज्याची प्रभात झाली असती. भारतीयांचे मनोबल वाढले असते. हिंसेचे भयानक रूप बदलले असते.अहिंसा व सत्य यामुळे सर्वसामान्य माणूसही सुखावला असता.
बापूंची जीवनज्योत निसर्गनियमानं परविश्वात विलीन झाली ती १९४८ मध्ये तरीही सखोल अर्थान अजूनही ती दीपस्तंभाप्रमाणे तेवते आहे. अन् अशीच तेवत राहील. मला म्हणावेसे वाटते
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
निबंध 3
भारतमातेच्या चरणकमलांना ब्रिटिश शृंखलेतून मुक्त करणारे अनेक सुपुत्र होऊन गेले. पण भारतमातेच्या मस्तकावरच्या राजमुकुटात विराजमान होणारी फार मोजकी रत्ने आहेत...असंच एक स्त्रीरत्न ! इंदिरा गांधी !!
कोमल ' कमला 'च्या पाकळ्यांवर १९ नोव्हेंबर १९१७ रोजी दैवानं बहाल केलेला एक दवबिंदू ! जिद्द, राजकीय डावपेच, राष्ट्रापुढचे प्रश्न, त्यांची हाताळणी या सर्वांचं 'प्रियदर्शनी'ला बाळकडू घरीच मिळालं. मातेच्या अकाली निधनानं त्या घायाळ झाल्या , परदेशी शिक्षण घेऊन देशासाठी कर्तृत्व गाजवायला सिद्ध झाल्या.
“वाकड्या नजरेनं पाहाल तर डोळे फोडू' अशा जबरदस्त आत्मविश्वासानं, एक स्त्री असून, 'बांगला देश' युद्ध जिंकून जगाला आपली नोंद घेणे भाग पाडलं. अंतराळशास्त्र वा शेती उद्योग इंदिरेनं सर्वाला गती दिली. बॉम्बे हाय' हे धोरणीपणाचंच सूचक होय. आक्रमक, आकर्षक, धोरणी, सर्वांना योग्य दिशेला नेणारी-नेता ! त्यांच विशेष कर्तृत्व जाणवतं ते 'अलिप्त राष्ट्र संघटना' या चळवळीत. महासत्तांना शरण न जाता तटस्थपणाची शक्ती निर्माण करणाऱ्या त्या एकमेव होत्या.
कोमल ' कमला 'च्या पाकळ्यांवर १९ नोव्हेंबर १९१७ रोजी दैवानं बहाल केलेला एक दवबिंदू ! जिद्द, राजकीय डावपेच, राष्ट्रापुढचे प्रश्न, त्यांची हाताळणी या सर्वांचं 'प्रियदर्शनी'ला बाळकडू घरीच मिळालं. मातेच्या अकाली निधनानं त्या घायाळ झाल्या , परदेशी शिक्षण घेऊन देशासाठी कर्तृत्व गाजवायला सिद्ध झाल्या.
प्रथम केवळ त्या नभोवाणी मंत्री होत्या त्या नंतर त्यांनी असं घवघवीत यश मिळवलं की डोळे दिपून गेले. बंगलोरच्या वादळी अधिवेशनात भल्याभल्यांना चीत करून काँग्रेस पक्षावर आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलं. असं जगाच्या राजकारणात उदाहरण नाही. भारताची पहिली स्त्री पंतप्रधान ! इतकी तेजस्वी की शब्दश: कुणाची हिंमत नव्हती मान वर करून पाहण्याची. इंदिरा एक असामान्य प्रशासक होती. 'एकतेतून विकास' हा मूलमंत्र घेऊन 'गरिबी हटाव' मोहिमेचं वादळ निर्माण केलं. 'वीस सूत्री' कार्यक्रम, अणुस्फोट, बँकांचं राष्ट्रीयीकरण या प्रत्येकातून या राष्ट्राला बलवान बनवण्याचा चंग स्पष्ट होत होता.
“वाकड्या नजरेनं पाहाल तर डोळे फोडू' अशा जबरदस्त आत्मविश्वासानं, एक स्त्री असून, 'बांगला देश' युद्ध जिंकून जगाला आपली नोंद घेणे भाग पाडलं. अंतराळशास्त्र वा शेती उद्योग इंदिरेनं सर्वाला गती दिली. बॉम्बे हाय' हे धोरणीपणाचंच सूचक होय. आक्रमक, आकर्षक, धोरणी, सर्वांना योग्य दिशेला नेणारी-नेता ! त्यांच विशेष कर्तृत्व जाणवतं ते 'अलिप्त राष्ट्र संघटना' या चळवळीत. महासत्तांना शरण न जाता तटस्थपणाची शक्ती निर्माण करणाऱ्या त्या एकमेव होत्या.