Maza Avadta San Essay In Marathi | माझा आवडता सण मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता सण मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये दसरा या सणाविषयी माहीती व महत्व देण्यात आले आहे. दसरा या सणाचे नाते महाभारत व रामायणा सोबत कसे आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
सण ! भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक ! भारतीयांच्या आध्यात्मिक अन् भाविक भावनांतून जन्मले - सण!! प्रत्येक सणाला एक खास व्यक्तिमत्त्व असते. गुढीपाडवा एखाद्या धीरललित राजासारखा !...वस्त्राभरणांनी नटलेली, सौम्य पण प्रसन्न, रसिक नार दीपावली !!...तारुण्याचं वारं प्यालेल्या पंचमी अन् होळी या हरिणी...
याउलट प्रतापशाली वीरोत्तम-दसरा ! माझा सर्वांत आवडता सण. तो येतोच तो उच्चैःश्रवावर आरूढ होऊन. त्याच्या आगमनाच्या तुताऱ्या, वाऱ्यावर डोलणारी झेंडूची फुले, वाजवत आकाश दणाणून सोडतात. गुढीपाडव्याच्या शिरावर राजासारखा राजमुकुट असेल तर दसऱ्याच्या मस्तकी 'शिरस्त्राण' असते. अंगात चिलखत असते. माणसांच्या औक्षणाची मानवंदना स्वीकारत, शरद ऋतच्या आरंभी, वरुणराज जेव्हा पांढरे निशाण दाखवून अंतराळाच्या मैदानातून पळ काढतो, तेव्हा प्रकट होतो, -दसरा!
हा दसरा आहे मोठा दिमाखदार ! याच वेळी पूर्वी सैन्ये दिग्विजयासाठी बाहेर पडत आणि शत्रूला धूळ चारून खरे सोने लुटून आणीत. प्रभू श्रीरामाने सोन्याच्या लंकेवर चाल केली ती याच मुहूर्तावर. 'रामलीला' महोत्सव रूपानं ती स्मृती अजून जपली जाते. अज्ञातवास संपल्यावर पांडवांनी शमी वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे काढली तीही-- याच दिवशी. अन् पुढे महाभारत घडलं. शमी वृक्षाची पूजा आजही करून आपण त्याचा आदर करतो. 'रामायण' व 'महाभारत' दोन्हीची आठवण करून देणारा एकमेव-दसराच.रघुराजानं वरतंतुशिष्य कौत्स याला गुरुदक्षिणा देण्यासाठी स्वर्गातून सोन्याचा पाऊस पाडायला लावला तो दसऱ्याला ! म्हणूनच दसरा हा सोनियाचा सण ! महाशक्तिमान दुर्गादेवीनं 'महिषासुर ' मर्दन केले तेही दसऱ्यालाच.
हिंदू पंचांगातील साडेतीन शुभ मुहुर्तापैकी एक आहे-हा दसरा ! पावसाळा संपल्याने सैन्याला कूच करणे, पिके तरारून आल्याने ' हातपाय पसरायला' किसानांना मोकळीक मिळणे हे दसऱ्यामुळे मिळते. म्हणून घराघरांतून गोडधोड होते. शस्त्रास्त्रे, वाहने, विद्या, आयुधे यांची पूजा होते. हल्ली आपट्यांच्या पानांवर 'सोने लुटीचा' अन् 'सीमोल्लंघना'चा आनंद मानावा लागतो. 'कालाय तस्मै नमः !'
दसरा म्हणजे माहेश्वरी ( ऐश्वर्य), महाकाली (शक्ती), महालक्ष्मी (संपत्ती आणि सौंदर्य), महासरस्वती (ज्ञान ) या आदिशक्तींचे पूजन – म्हणजेच दसरा ! तुम्हा आम्हा सामान्यांना दसरा हा अनोखा शुभ दिवस वाटतो. पण तुकाराम म्हणतात,
'तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ अवघ्या दिशा॥' गोडधोड खाऊन लोळत पडणे हा या सणाचा अपमान आहे. सज्जन, थोर, योगी मंडळींना घरी बोलावून त्यांच्या सहवासापासून विचारांचे सोने लुटणे, काव्यशास्त्रविनोदाची पक्वान्ने आस्वादणे हाच या युगातला दसरा.“ साधुसंत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ॥" शौर्य, त्याग, वाईट वृत्तींचा शेवट ही त्रिसूत्री सांगून, 'त्येन त्यक्तेन भुंजीथाः ' असा मंत्र कानात सांगून, आपल्या घोड्याला टाच मारून, इंद्रधनुष्याच्या 'फ्लायओव्हर 'वरून हा दसरा निघून जातो. पुन्हा वर्षाचा प्रवास संपवून, ऋतुचक्राचा एक फेरा पूर्ण करून शरद ऋतूच्या प्रारंभी तो पुन्हा दिमाखाने येईल आणि आमच्या जीवनातील रोजची दुःखे विसरून आम्ही सदैव म्हणत राहू,
'दसरा सण मोठा । नाही आनंदा तोटा ।'
मित्रांनो तुम्हाला maza avadta san marathi nibandh हा निबंध कसा वाटला व दसरा हा सण तुम्ही कसा साजरा करता हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
मित्रांनो तुम्हाला maza avadta san marathi nibandh हा निबंध कसा वाटला व दसरा हा सण तुम्ही कसा साजरा करता हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद