माझा आवडता खेळ क्रिकेट मराठी निबंध | My Favourite Game Cricket Essay In Marathi
निबंध 1
My-Favorite-Game-Essay-In-Marathi |
- खेळाचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान
- खेळांचे उपयोग नेतृत्वगुण
- सांघिक भावना ,ऐक्य
- जबाबदारीची जाणीव
- निकोप दृष्टिकोन दुसऱ्यांविषयी आपुलकी
- वेळेचे महत्त्व
- शिस्तप्रियता, चपळता, काटकपणा
- सध्या बहुतेकांची आवड क्रिकेट
- खेळाचा तपशील व महत्त्व
माझा आवडता खेळ
खेळ म्हणजे क्रीडा, करमणुकीचे साधन. ज्याच्यामुळे आपल्याला विरंगुळा मिळतो. आनंद मिळतो, तो खेळ. आपण आजच्या धकाधकीच्या जीवनात मनावरील दडपण कमी करण्यासाठी खेळ खेळतो किंवा बघतो. आपले जीवन-देखील एक खेळच आहे.
"दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव,
हासत हासत झेलू, आपण पराजयाचे घाव॥"
खेळ म्हटला, की जय-पराजय, यश-अपयश आलेच. मग यशाने हुरळून जाऊ नका नि पराजयाने खचून जाऊ नका, असा सदेश देणारा खेळ मला आवडतो. खेळ प्राण पणाला लावून खेळला जात नाही; तर कौशल्य पणाला लावून खेळला जातो. कौशल्य प्राप्त होण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. खेळ वैयक्तिक पातळीवर आणि सांघिकपणे खेळला जातो.
लंगडी, कबड्डी, हॉकी, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केट बॉल, टेनिस इ. पण सध्या सर्वात लोकप्रिय खेळ आहे क्रिकेट. क्रिकेट हा खेळ सांघिकपणे खेळला जातो. या खेळात चौदा प्रमुख खेळाडू असतात. त्यातील अकरा खेळाडू खेळतात. म्हणजेच तीन खेळाडू राखीव असतात. या खेळात गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत आपले नैपुण्य दाखवता येते. चौकारषटकार मारणाऱ्या फलंदाजाला, तसेच अवघड झेल पकडणाऱ्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षकांकडून प्रोत्साहन मिळते. क्षणाक्षणाला चुरस वाढविणारा हा खेळ आहे.
क्रिकेटमध्ये वैयक्तिक विक्रमांची नोंद ठेवली जाते. तरीही, या खेळात सांघिक एकता फार महत्त्वाची ठरते. सांघिक एकता, सहकार्य असल्याशिवाय यश मिळत नाही. कधीकधी एखाद्या खेळाडूने भरपूर धावा केल्या, तरीही संघ यशस्वी होईल, असे निश्चित सांगता येत नाही. 'क्रिकेट हा योगायोगाचा' खेळ आहे. प्रत्येक डाव हा उत्सुकता वाढविणारा असतो. प्रत्येक खेळाडूला अतिशय सावधतेने व जबाबदारीने खेळावे लागते.
ह्या खेळाबद्दलचे सामान्य लोकांना वाटणारे आकर्षण वाढत चालले आहे. खेळाडूंचे चारित्र्य निखळ हवे, तरच खेळ निखळ होईल. निखळपणाबद्दल सांगायचे, तर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना होता. गुंडाप्पा विश्वनाथ संघनायक होते. सामना रंगात आला असताना पंचांनी इंग्लंडच्या एका खेळाडूला बाद दिले. तो निर्णय चुकीचा होता, हे कर्णधार गुंडाप्पा विश्वनाथने पंचांच्या लक्षात आणून दिले व त्या खेळाडूला खेळू देण्याची विनंती केली.
पंचांनीही विनंती मान्य करून त्या खेळाडूला खेळू दिले. या निर्णयामुळे सामना फिरला आणि भारताचा पराभव झाला. पण मला वाटते, हा खेळ स्कोअर बुकच्या पलीकडे नोंदवला गेला. कारण या सामन्यातील भारतीय संघाच्या पराभवापेक्षा विश्वानाथने निखळ खेळाडू म्हणून नोंदवलेला विजय जास्त महत्त्वाचा !
म्हणून या खेळात नम्रता, शिस्तपालन, माणुसकी हे गुण खेळातील यशापेक्षा मोठे यश असतात. या खेळामुळे करमणूक होते, ती खेळ पाहणाराची; पण खेळ प्रत्यक्ष मैदानावर खेळणाराचा व्यायाम होतो.
खेळ खेळल्याने शरीर बळकट होते. खेळातील शिस्त जीवनालाही वळण देते. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ असल्याने या खेळात वैयक्तिक विचार करून चालत नाही. संपूर्ण संघाचा विचार करावा लागतो. शिवाय, खेळामुळे मनाची एकाग्रता वाढते. खिलाडूवृत्ती वाढते. हे सगळे फायदे लक्षात घेता मलाच काय, सगळ्यांनाच आवडणारा खेळ म्हणजे क्रिकेट.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद