karmaveer bhaurao patil essay in marathi | कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कर्मवीर भाऊराव पाटील मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात त्यांनी शैक्षणीक क्षेत्रात केलेल्या कामगीरी सोबतच त्यांच्या बद्दल माहीती दिली आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला.
स्वावलंबी शिक्षणाचे उद्गाते : कर्मवीर भाऊराव पाटील 'स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय आणि स्वातंत्र्य' हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतु:सूत्री मानणारे 'कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षणतज्ज्ञच म्हटले पाहिजे. 'कमवा आणि शिका' असा अतिशय सोप्या भाषेत शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे कर्मवीर एक श्रेष्ठ समाजसुधारकही आहेत.
karmaveer-bhaurao-patil-essay-in-marathi |
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावी २२ सप्टेंबर १८८७ ला जन्मलेले हे बालक बालपणापासून हट्टी स्वभावाचे होते. वडील सरकारी नोकरीत, त्यामुळे वडिलांसोबत भाऊरावांच्या पायालाही भिंगरी लागलेली. परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान, त्याचा मित्र सत्याप्पा हा तर शूर साहसी अन् त्याबरोबर दयाळू अन् गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे. त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या चांगुलपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होत होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच सत्याप्याकडून मिळाले होते.
भाऊरावांचे शिक्षण बेताचेच. वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी वसतिगृह सोडले. आणि आयुष्याला एक वेगळेच वळण लागले. कुस्ती-मल्लखांब यासारख्या खेळात ते नेहमीआघाडावर असल्यामुळे त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला, शाहू महाराज्याकडून समाजसेवेचा वारसा घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले तेव्हा त्यांचा 'शिक्षणाचा पिंड गप्प बसू देईना,' "विचार, आचार, उच्चार' यांचे उगमस्थान म्हणजे खरे शिक्षण, सत्य सामाजिक समता या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला, इतकेच नव्हे तर जनजागृती-समाजक्रांतीसाठीही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.
म. फुल्यांचा पाईक बनून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील वाले या गावी 'रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्याच्या मुलांसाठी अतोनात कष्ट भाऊरावांनी घेतले. या त्यांच्या शैक्षणिक कार्यात त्यांची पत्नी लक्ष्मीबाईंचा हातभार फार मोठा हाता, कमवा आणि शिका' हा कर्मवीरांचा शिक्षणापाठीमागचा मूलमंत्र तर रयतेला पटवून देण्यासाठी ती स्वावलंबी शिक्षणाची कल्पना प्रत्यक्षात ते जगले. बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानगंगा पोहोचण्याचे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले.
'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।' गीतेतील या महान संदेशानुसार कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता, कोणतेही काम किंवा श्रम हे हलके नसते. काम म्हणजे ईश्वर त्याच श्रमाला प्रतिष्ठा देण्याचे कार्य, पावित्र्य देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.
रयतेच्या शिक्षणाबरोबरच समाजपरिवर्तनही घडवून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी म. फुले, शाहू महाराज विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेमहाराज यांच्यापासून घेतला होता.
शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्रय, अंधश्रद्धा, लोकभ्रम, अज्ञान अशा अनेक महासंकटातून सुटण्यासाठी अनेक समाजोद्धारक उपक्रम राबविले. एक कर्तव्यनिष्ठ शिक्षक हाच संपूर्ण समाज बदलू शकतो. लहान मुले हीच देशाचे भविष्य घडविणारे असतात. तेव्हा शिक्षणातून देशप्रेम, स्वावलंबन, अन्यायाची चीड, श्रमाची प्रतिष्ठा अशा सद्गुणांते बाळकडू जर त्यांना पाजले गेले तर निश्चित देशाचा विकास हा घडेल. शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे, हीच त्यांची पक्की विचारसरणी होती.
कर्मवीरांच्या कार्याचा प्रसार, त्यांच्या कार्याची पाऊले,खुणा, त्यांच्या स्मृती आठवणी म्हणून सांगलीतील 'दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ' नावाची मोठी संस्था, साताऱ्यातील 'छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस' तर बोधचिन्ह वटवृक्षा' सह आजही दिमाखात उभे आहे. वसतिगृहातून भेदभाव नष्ट करणे, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, सर्व जाती-धर्माचे सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणार... त्यांचा समन्वय घडवून आणणार. या त्यांच्या असामान्य कार्याची सर्वांनी मुक्तकंठाने स्तुती केली.
या महापुरुषाचे महानिर्वाण १९५९ झाले. परंतु मित्रहो, संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक, प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक, अध्यापन विद्यालये, महाविद्यालये, वसतिगृह, कार्यालये आणि इतर अनेक शिक्षण संस्था आज कर्मवीरांच्या त्या विशाल वटवृक्षाखाली गुण्यागोविंदाने नांदत आहेत, त्या अमर आहेत.
आपण सामान्यांनी या महापुरुषाचे किती सन्मान करायचे ? अनेक सामाजिक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन सर्वोच्च सन्मान केला आहे.
महाराष्ट्राचा 'बुकर टी. वॉशिंग्टन' या नावाने त्यांना ओळखतात. यशवंतराव चव्हाण त्यांच्याविषयी म्हणतात, 'कर्मवीर' हीच महान संस्था, बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश, रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद