maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आजोबा या शब्दाबरोबर आठवण येतात, ते आपल्यावर प्रेम करणारे व आपले सर्व लाड व हट्ट पुरवणारे आपले आजोबा. लहानपणीचे ते आनंदीदायी क्षण आजही आनंद देऊन जातात, अश्याच एका प्रसंगाचे वर्णन निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका, आत्या, कुटुंबातील लहानथोर सर्व मंडळी एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त तयारी चालली होती. आम्हांला आजोबांना काही कळू दयायचे नव्हते.
maze-ajoba-marathi-nibandh |
पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.
माझे आजोबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आजोबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती ! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध आहे. काहीही झाले तरी त्यांचे पहाटे फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही वृद्ध मंडळी एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, सहलीला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या दोस्तांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या करायला सांगतात.
आजोबांना आमच्या आजीविषयी विशेष अभिमान आहे. आजोबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या आजीला देतात; कारण त्यांच्या मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच आपले घर 'आदर्श' राहिले, असे ते मानतात.
आजही आजोबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही एखादी शंका विचारली, तर ते त्याचे खुलासेवार निरसन करतात. उत्तम आरोग्य, स्वच्छ विचारसरणी आणि सतत उदयोगात रमलेले आजोबा अगदी ऐंशीव्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. आपल्या वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'युवा' मनाला जपले आहे, म्हणून ते सदा आनंदी राहू शकतात. 'कर्ते व्हा. कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्या आजोंबासोबत असलेल्या गमतीदार आठवणी तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
महत्वाचे मुद्दे :
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- व्यक्तिमत्त्व वर्णन
- वय, पोशाख, काही सवयी
- स्वभाव- एखादा प्रसंग
- घरात असून अलिप्त
- परंतु घरातील एक
- वय मोठे; पण मन तरुण
- कर्तबगारी
- कर्तव्यदक्ष
- शिकवण
टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते
- My (majhe) Grandfather Essay in Marathi language
निबंध 2
maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध
आज मी दोन दिवसांची रजा घेऊन आजोबांना भेटायला आलो आहे. बसमधून उतरल्याबरोबर माझी पावले फारच जलद पडू लागली आहेत. डोळे कौलारू घराचे छप्पर शोधताहेत. गेली पंधरा वर्षे असाच धावत धावत मी माझ्या आजोळी येत आहे.
कधी 'मे' महिन्याची सुटी लागते व कधी कोकणात जातो, असे मला व्हायचे. मुंबईहन कोकणात मला न्यायला पूर्वी आजोबाच यायचे. पुढे मोठी झाल्यावर आम्ही नातवंडे एकटी यायला लागलो. पण कोकणात आल्यावर बसमधून उतरताक्षणीच आजोबांचे शद्र कानावर पडायचे, आलात बाळांनो, या.' या वात्सल्यपूर्ण शब्दांनी आमचं स्वागत व्हायचं व प्रवासाचा सर्व शीण जायचा!
आमचं कोकणातील घर नारळी पोफळींच्या गर्द छायेत झाकून गेलं होतं. परंतु आजोबांचा सहवास जास्त शीतल वाटायचा. आजोबांना कधीच रागावलेलं मी पाहिलं नाही. एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यास ते फक्त 'गोविंद! गोविंद!' म्हणायचे.
नातवंडांशी बोलताना, गोठ्यातल्या जनावरांशी बोलताना किंवा शेतातील गड्यांशी बोलताना त्यांचा स्वर नेहमीच शांत व प्रेमळ असायचा. आजोबा कधीच रिकामे बसायचे नाहीत. त्यांचा निम्मा वेळ शेतात व गोठ्यातच जायचा. शेतात ते गड्यांच्या बरोबरीनं काम करायचे.
गोठा तर इतका स्वच्छ ठेवत की, घरातच जनावरं बांधलीत की काय असे वाटावे! संध्याकाळी घरात आल्यावरही हातानं बारीक-सारीक काम चालूच. त्यांना कोठे एवढासाही केर पडलेला खपत नसे. वर्तमानपत्रं, पुस्तकं, औषधे कशी व्यवस्थित लावून ठेवलेली. त्यांच्या सर्व वस्तू जिथल्या तिथे; अंधारातही अचूक सापडणाऱ्या!
संध्याकाळी त्यांच्या मुखातून देवाची स्तोत्रं एकामागून एक बाहेर पडत असत. आम्हा नातवंडांनाही स्तोत्र शिकवणं हे त्यांचं आवडतं काम. ते आम्हाला गोष्टीही सांगायचे. पण अभ्यास शिकवणं, श्लोक शिकवणं त्यांना जास्त आवडायचं.
आजही जुन्या कवितांचं, स्तोत्रांचं, श्लोकांचं धन माझ्याजवळ आहे ते आजोबांच्यामुळेच. आजीचे व त्यांचे नेहमी भांडण व्हायचे कारण त्यांच्या स्वभावातला दोष म्हणजे दातृत्वाचा अतिरेक. गड्यांना आंबे, सुपाऱ्या, नारळ न मागता मुक्तहस्ताने ते देत.
आला गेला पै-पाहुणा पिशव्या भरभरून माल घेऊन जाई. एखादा मित्र बरोबर घेतल्याशिवाय ते कधी जेवलेच नाहीत. त्यामुळे ते सदैव समाधानी असत. जेवण तरी काय? साधा आमटी-भात असला तरी चालेल पण तो रुचकर असला पाहिजे. पाट-पाणी, वाढप सर्वच त्यांना व्यवस्थित लागायचं.
पण परवा शेतातून परत येताना बांधावरून पाय घसरून ते पडले. पाय दुखावला. त्यांना वाटलं, आपली अखेरच जवळ आली. त्यामुळे कोणताही उपाय न करता त्यांनी शेवटचं भेटायला बोलावलं, म्हणून मी धावत-पळत आलो आहे. आजोबांना मुंबईला नेऊन मला बरं करायचं आहे. आजोबांचा प्रेमळ सहवास मला अजून हवा आहे; अजून हवा आहे ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद