मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मानव चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
चंद्राचे मानवी मनाला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीही 'चंद्र हवा' म्हणून कौसल्यामातेकडे हट्ट धरला आणि मग आरशातून चंद्राचे प्रतिबिंब दिसताच तो छोटा राजकुमार हर्षभरित झाला, अशी कथा आहे. चंद्राविषयीच्या मानवाच्या या आकर्षणाची परिणती म्हणजे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून मानवाने चंद्रावर केलेले पदार्पण होय.
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi |
नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन अवकाशयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. मानवाचे चंद्रावरील चिमुकले पाऊल म्हणजे त्याची विज्ञानाच्या आधारे अवकाशातील प्रचंड झेप होती. या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहू लागला. माझ्या मनात आले - अशाच एका मोहिमेतून मला चंद्रावर जायला मिळाले तर !
...तसे झाले तर ! फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना टुणटुण उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वीमाता कशी दिसते. ते मी पाहीन.
चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेशवाहिनी असणारच ! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वीमातेचे धावते समालोचन माझ्या घरच्या माणसांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमले तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरू करीन. त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये मिळू शकतील.
चंद्रावरील तरुण जोडपी कदाचित 'मधुचंद्रा'ऐवजी 'मधुवसुंधरा 'साठी पृथ्वीवर येण्यास आतुर होतील. अशा वेळी शक्य झाले तर त्यांना पृथ्वीवरील प्रवासाची सोयही मी करीन. पण हे सारे केव्हा?- जर मला चंद्रावर जायला मिळाले तर !!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व चंद्रावर जाण्यास तुम्हाला संधी मिळाल्यास तुम्ही काय करू इच्छिता ते तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद.
महत्वाचे मुद्दे :
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- चंद्राचे आकर्षण
- प्रभू रामाला चंद्र हवा
- वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न
- चंद्रमोहिमेत सहभागी व्हावे
- चंद्रावरचा ससा
- चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल
- संदेशवाहिनी
- उपाहारगृह
- पृथ्वी, चंद्र ये-जा उत्सुकता.