my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध
नमस्कार मित्रांनो आज आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध बघणार आहोत, मित्र हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच खरा मित्र मिळविणे कठीण काम आहे एक खरा मित्र तो आहे जो तुम्हाला संकटात मदत करतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. आपल्या वागण्याबोलण्यातील उणीवा दाखवतो.
इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते.
मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.
माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.
अशोकची उंची ४.५" आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे.
शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे. तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी होतो.
शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.
मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
मी फार नशीबवान आहे की मला समीरसारखा मित्र मिळाला.समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही हं ! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये रंगणाऱ्या आमच्यापैकी कितीजणांना क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे?
my-best-friend-essay-in-Marathi |
समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.
कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे अंदाज सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे.
खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.
समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद