maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध
समाजाच्या दु:खांशी नातं सांगणाऱ्यांना, शतकांची कुंपणं अडवत नाहीत. ते शब्द कुरवाळीत नाहीत अन् खाजगी व्यथाही गोंजारत नाहीत! सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत येतात. या समाजातल्या दु:खभरल्या रात्री अन् अंधारलेली मने उजळून लख्ख करतात. अशी ही परमेश्वराप्रमाणे पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले समाजसुधारक होत. असाच एक वंदनीय समाजसुधारक मराठी मातीत जन्मलेला आहे, जो आज महाराष्ट्राचंच नव्हे तर जगाचं भूषण ठरला आहे आणि तो म्हणजे बाबा आमटे! मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं खरं नाव.
maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi |
२६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे एका कर्मठ जमीनदाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४९ मध्ये ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीझेस्' इथे त्यांनी महारोग्यांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९५० मध्ये त्यांनी 'महारोगी सेवा समिती' स्थापन केली. बाबांना ज्या क्षणी 'क्षितीज नसलेले पंख' लाभले असल्याची जाणीव झाली, त्याच क्षणी नियतीने त्यांच्या पुढ्यात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेसारखा, तो गटारात रूतलेला महारोगी आणून टाकला, त्याचक्षणी महारोग्याच्या शरीराच्या जखमा आधुनिक उपचारांनी बऱ्या करणे सोपे असले तरी त्याच्या मनाला झालेल्या जखमा पूर्णपणे भरून यायला त्याचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून आणि झालेल्या चिंतनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 'आनंदवना'चा जन्म झाला.
उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पाहून परदेशातील जाणती मंडळी त्यांना मोठ्या आपुलकीने मदत करीत आहेत. आनंदवनासाठी सर्वप्रथम परदेशातून आलेली मदत नॉर्मा शिअर या अभिनेत्रीकडून होती! गांधीजींनी त्यांना अभय साधक' ही पदवी दिली. फक्त आनंदवनापाशीच ते थांबले नाहीत, तो त्यांचा मार्गावरचा एक टप्पा आहे. आज खलिस्तनवादी लोक 'भारत तोडो' म्हणत असतानाच त्यांनी देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी 'भारत जोडो' ही पदयात्रा काढली. समाजसुधारणेचा त्यांचा आणखी एक सुंदर प्रयत्न म्हणजे 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' ह्या त्यांच्या कविता! त्यांच्या एकांतसाधनेचं ते फलित आहे.
आजच्या युवापिढीला मारलेली ती अमूर्त हाक आहे. आळस, दैववाद, असामाजिकता, अल्पसंतुष्टता व संवेदनहीनता यांनी ग्रासलेल्या मनांना उद्देशून सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा म्हणाले, 'मन का कुष्ठ शरीर के कुष्ठसे अधिक भयंकर होता है।' हे जग व जीवन, फुलवण्याकरिता, उपभोग घेण्याकरिता आपल्याला दिले आहे, निसर्ग अनंत हस्तांनी आपणाला देऊ शकतो, पण त्याला संतुष्ट करण्याचे आव्हान भारतीयाने स्वीकारले पाहिजे, असा बाबांचा आग्रह आहे. यश यावे आणि या माझ्या आवडत्या समाजसुधारकाचे स्वप्न साकार व्हावे हीच माझ्यासारख्या त्यांच्या चाहतीची इच्छा ! म्हणून मला बाबांविषयी म्हणावंसं वाटतं 'जे का रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि
निबंध 2
तुकाराम महाराज म्हणतात,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुलेतोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा'
देवाची अशी सुंदर परिभाषा तुकाराम महाराजांनी केली. खरे म्हणजे देव ह्या पेक्षा वेगळा असूच शकत नाही. देव हा माणसात आहे मूर्तीत नाही हे तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार मला अशा प्रकारचे गुण असलेला महापुरुष आढळून आला ते म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
बी.ए.,बी.एससी.,डीएससी.,एम.ए.,पी.एच.डी. अशा अनेक पदव्या प्राप्त करुन ते उच्चविद्याविभुषीत झाले.
भरपुर संपत्ती कमावून आपल्या कुटूंबाचा फायदा करु शकले असते.परंतु समाजसेवेचे व्रत घेणा-या या महापुरुषाला संपत्ती कमविण्याचे ध्येय नव्हते.त्यांना वेड होत ते भारतीय समाजाला अंधारातुन प्रकाशाकडे नेण्याचे, अज्ञानातुन ज्ञानाकडे नेण्याचे,अधोगतीतुन प्रगतीकडे नेण्याचे. बुद्ध,कबीर व महात्मा फुले या महापुरुषांना त्यांनी आपले गुरु मानले.या तीनपैकी कुणाचाही त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही किंवा ते समकालीन सुद्धा नव्हते परंतु त्यांचे विचार व कार्य डॉ.आंबेडकरांना अतिशय महत्वाचे वाटले.त्यामुळे वरिल तिन्ही महापुरुषांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले.
त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा प्रचंड आहे. प्रत्येक ग्रंथात अमूल्य विचार आहेत. २) ग्रंथ निर्मिती : शूद्रांना शतकानुशतके विद्या ग्रहण करण्यावर परंपरेने बंदी घातली होती त्यामुळे भारतीय बांधव आपला इतिहास विसरला. त्याला आपली ओळख राहिली नाही. तेंव्हा त्याला आपली ओळख व्हावी या उद्देशाने बाबासाहेबांनी त्यांच्या करिता “शुद्र पूर्वी कोण होत?' हा ग्रंथ लिहिला. 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अधोगती', 'रीडल्स इन हिंदूइझम'इ. प्रत्येक भारतीयाने वाचावेत अशी ग्रंथसंपदा आहे.
बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी सर्वच बहुजनासाठी लिहला. तो केवळ बौद्ध अनुयायांसाठीच लिहिला असे अजिबात नाही. हा ग्रंथ म्हणजे बुद्धाने केलेल्या क्रांतीचा इतिहास आहे. हा कुण्या एका जातीसाठी लिहिला नाही. कुण्या एका धर्मासाठी लिहिला नाही. ३) हिंदू कोड बिल : हिंदू स्त्रियांना आपले हक्क व अधिकार मिळावेत या करिता हिंदू कोड बिल तयार केले होते. परंतु त्या बिलात कोणत्या तरतुदी आहेत ह्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या हिंदू स्त्रियांनी त्याचा प्रखर विरोध केला.
४) घटना निर्मिती : आज जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून महत्व आहे. जगातील एक महान घटनाकार म्हणून जग बाबासाहेबांना घटनेवरच आज भारतीय लोकशाही सुरु आहे.परंपरेने नाकारलेले मुलभूत अधिकार घटनेमुळे '. मिळाले.
स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर अधारीत राष्ट्राच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला व त्या प्रकारची कलमे संविधानात अंतर्भुत केली.शिका,संघटीत व्हा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ही त्यांची त्रिसुत्री आहे.
म्हणूनच कवी म्हणतो, “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे”. बहुजनांचे हित साधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम!
निबंध 3
माझा आवडता समाजसुधारक महात्मा ज्योतिबांं फुले
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- माझा आवडता समाजसुधारक एकोणिसाव्या शतकातील महात्मा जोतीराव फुले
- विदयेचे महत्त्व जाणणारा
- बालपणापासून आईचा वियोग
- वडिलांचे प्रेम मिळाले
- समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव
- कार्याची आखणी
- पत्नीचे बहुमोल साहाय्य
- ज्ञानदान
- स्त्रियांसाठी शाळा
- दलितांसाठी हौद
- शेतकऱ्याचा असूड
- सत्यशोधक समाज
"विदयेविना मति गेली।मतीविना नीति गेली।नीतीविना गति गेली।गतीविना वित्त गेले।।इतके अनर्थ एका अविदयेने केले."
किती मोजक्या शब्दांत जोतीरावांनी येथे विदयेचे महत्त्व सांगितले आहे ! कारण स्वतः त्यांना विदया मिळवायला खुप कष्ट घ्यावे लागले होते. १८२७ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. बालवयातच त्यांची आई देवाघरी गेली आणि आईचे प्रेम त्यांना त्यांच्या वडलांनी, गोविंदरावांनीच दिले. शिकत असतानाच विविध अनुभवांतून जोतीरावांना भोवतालच्या समाजातील अनिष्ट प्रथा लक्षात आल्या.
मोठ्या कष्टाने त्यांनी इंग्रजी विदया संपादन केली आणि भरपूर वाचन करून ते बहुश्रुत झाले. शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या जोतीरावांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला-सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. सावित्रीबाईंची त्यांना जन्मभर साथ मिळाली.
स्त्रियांच्या शिक्षणाला त्या काळात प्रखर विरोध होता. जोतीरावांना व सावित्रीबाईंना दगडगोटे, शेणमाती यांचा मारा सहन करावा लागला. पण १८४८ साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले. जोतीराव फुले यांना जे वाटले, ते त्यांनी बोलून दाखवले, त्याप्रमाणे कृती केली म्हणून आचार्य अत्रे त्यांचा उल्लेख 'कर्ते सुधारक' असा करतात.
जोतीरावांच्या काळात म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक दिली जात असे. त्यांचे केशवपन केले जाई. ही अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीरावांनी न्हाव्यांचाच संप घडवून आणला. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी केली. तसेच, त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृहाची देखील स्थापना केली.
जोतीरावांनी दलित वर्गाचीही दुःखे हलकी करण्याचा यत्न केला. त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून त्यांची स्थिती सुधारावी म्हणून जोतीरावांनी शेतकऱ्याचा असूड' हे पुस्तक लिहून सरकारला अनेक उपाय सुचवले.
१८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती. आपले विचार मांडताना जोतीरावांनी 'अखंड रचले. त्यांत ते आपल्या देशबांधवांना मौलिक संदेश देतात -
जगाच्या कल्याणा। देह कष्टवावा। कारणी लावावा। सत्यासाठी।। असा हा कर्ता सुधारक माझा आवडता आणि आदर्श समाजसुधारक आहे.