अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण विज्ञानयुगात राहुन सुध्दा मानवी समाजात अंधश्रद्धा दिसुन येते याची कारणे काय असु शकतात व यावर कशी मात करता येईल हे सांगीतले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
माणसे अपूर्ण असतात आणि मानवी मनातल्या श्रद्धा, प्रेम यांचीदेखील पूर्तता कधीच होत नाही. आईवडिलांचे जरी मुलावर उत्कट प्रेम असले तरी त्या प्रेमाला अज्ञानाच्या, अविचाराच्या मर्यादा पडलेल्या असतात. असेच आपल्या सर्वाचे आहे. एखादी वास्तव गोष्ट ! मानवी ज्ञानशक्ती पलीकडे असलेले असे सत्य भासते तेव्हा ती भासू लागते - अंधश्रद्धा .
andhashraddha-marathi-nibandh |
मुळात अंधश्रद्धा निर्माण होण्याचं कारण, त्याच्या पराधीनपणात लपलेल आहे. यश संपूर्ण स्वत:च नसून त्याला काही कारण म्हणुन, तसंच अपयशाची कारणमीमांसा म्हणूनही अंधश्रद्धा निर्माण झाल्या.
आजच्या यंत्रयुगातसुद्धा अंधश्रद्धेचा मानवी मनावर जबरदस्त पगडा आहे. आपण म्हणतो की मांजर आडवे जाण्याने काम होत नाही!
पण सगळ्यांना काही तोच अनुभव आजपर्यंत आला आहे का? खर तर कार्याचे स्वरूप, साधनांची उपलब्धता इ.वर यशापयश अवलंबून असते. त्यात बिचाऱ्या मांजराचा काहीही संबंध नसतो. 'तीन तिगडा काम बिघडा' व 'साप चावलेल्या मनुष्यास खांद्यावर बसवून मारूतीला प्रदक्षिणा मारणे' हाही त्यातलाच एक खुळा प्रकार ! पण ही झाली अंधश्रद्धेची प्रथम पायरी ! पण हीच अंधश्रद्धा पुढे फार भयानक वळण घेते.
कुठल्याही सुजाण माणसाच्या अंगावर शहारे आणेल असं मानवत' प्रकरण या विज्ञानयुगात घडू शकतंय ही गोष्ट काय दर्शविते ? अमावास्येच्या दिवशी स्त्रियांनी केस सोडून फिरू नये इथपासून ते भूतबाधा झालेल्यांचे भूत उतरविणे इथपर्यंत! दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, तिकडे यमाचे राज्य असते, मृत्यू येतो, असे आपले पूर्वज प्राचीन वेदात सांगतात. परंतु यासारख्या अंधश्रद्धा या विज्ञानाच्या अढळ बुरूजावर उभ्या आहेत हा शोध आज नवीन लागला आहे.
हवेतून हात फिरवून घड्याळे, कुंकू, मंगळसूत्रे काढणाऱ्यांवर, ३०-३० दिवस समाधीस्थ होणार अशी प्रतिज्ञा करण्यावर विश्वास ठेवला की या जगात बुवाबाजीचा सुळसुळाट झालाच म्हणून समजा. पण काही अंधश्रद्धांना दुसरा पर्यायच नाही. 'दृष्ट काढणे' ! पण खरंच अशी नजर लागते का ? दृष्ट काढल्यावर ती जाते का? पण आपल्याला दृष्ट काढल्यावर मोकळं, हलकं वाटू लागतं; मग हे कसं काय ? खरंच देव असं काही करतो का?... या प्रश्नांना उत्तर नाहीत. अंगात येणं' हा दुसरा प्रकार. पण याबाबतीत बहुतांशी असत्य अनुभवच येतात. मग खरंच परमेश्वर मानवी शरीरात अवतरतो का? या गोष्टींवर अविश्वास ठेवावाच लागतो.
पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर मानवाचे पाऊल पडणार आहे... छे! छे! तो ओलांडणारही आहे. मग या खुळ्या, अविचारी, पुरातन समजुतींवर आपण किती विश्वास ठेवायचा? कधी कधी तर हे अज्ञान निरपराधांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतं- जसा गुप्तधनासाठी कुमारिकेचा बळी! म्हणूनच ‘लोकशिक्षण' व 'जनजागृती' या दोन विकासाच्या साधनांची कास धरूनच व विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतलेले, मनाला पटतील तेच विचार अनुसरले तर एकविसाव्या शतकाची रम्य, निरभ्र पहाट उगवू शकेल अन् मानवतेने पांघरलेला हा अंधश्रद्धांचा बुरखा आपोआप गळून पडेल !
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद