रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रेल्वे स्थानकावरील एक तास मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर सामान्यपणे घडणाऱ्या गोष्टीचे वर्णन केले आहे.पण सामान्य असुनही जिवनाच्या विविध पैलुला स्पर्श करण्याचा प्रयत्न यातुन केला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh |
" दुपारी चार वाजता पोचत आहे " ताईने मोबाईलवर सांगीतले म्हणून स्टेशनवर गेलो. प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला दुसऱ्या वर्गाच्या खिडकीवर ही गर्दी. पहिल्या वर्गावर मात्र २-३ च होते. समाजाच्या वर्गवारीचं सम्यक् दर्शन झालं. तिकीट घेऊन फलाटावर पाय ठेवला तो “ मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन एक्सप्रेस एक घंटा देरीसे आयेगी..." ध्वनिवर्धकानं सांगितलं. झालं ! तासभर थांबणंच आलं. वेळ काढायला उगाच भटकत बसलो.
प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलला होता. गरीब, मध्यम, श्रीमंत सर्व थरांतील लोक होते. त्यांचे कपडेच बोलत होते. रंगहीन, रंगीबेरंगी, मळकट, जीर्ण, लाजेपुरते तसे झकपक सूटबूट टायही होते. लंकेची पार्वती तशी सालंकृत रमाही ! सप्तरंगी तारुण्य सळसळत होतं तसं वार्धक्याच्या जाळ्यात सापडलेले चेहरेही. लहान निरागस बालकं तसे उगाच केसावरून कंगवा फिरवणारे सख्याहरिही ! माणसांचं म्युझियमच. एवढी माणसं...कशाला प्रवास करत असतील?...मामाच्या गावाला तर कुणी कामाला. नविन सासुरवाशीण तर कुणी माहेरवाशीण, नोकरीच्या शोधात, कुणी औषधपाण्याला कुणी हवापाण्याला. एकाच्या डोळ्यात पाणी दुसऱ्याच्या ओठी गाणी .
गर्दीतून चटपटीतपणे " चाय गरमऽ” “ए, वडा, वडा" म्हणत फिरणारे फेरीवाले. हातात, डोक्यावर, खांद्यावर सामान वाहणारे हमाल, 'रस्ता छोडो' म्हणत नसलेल्या जागेतून वाट काढणारे अन् पळत्या गाडीत चढून जागा धरणारे. पांढरी पैंट, निळा ब्लेझरचा कोट, टायवाले टी. सी. हे सारे सराईत आहेत हे न सांगता कळत होतं.
गाडीला अवकाश होता म्हणून काहीजण उपाहारगृहापाशी चहानाष्टा करत होते तर पेपर स्टॉलवर वाचक रेंगाळत होते. कुणी उगीच भिंतीवरचं रेल्वेटाईमटेबल माना वाकडी करून वाचत होते. कुणी वजन काट्यावर 'वजन' करायचा प्रयत्न करीत होते- ' मशीन बंद आहे-' हे न वाचताच ! प्रतीक्षागृहात उच्चभ्रू लोक टाय सावरत India Today वाचत होते. खरं तर ते नुसते बाहेर आले असते तरी India Today ' दिसला असता.
कुठली तरी गाडी शिटी मारत धडाडत येत होती. एक इंजिन कर्कश्य शिटी मारत शंटिंग करत भाव खात होतं. भिंतींवर सिनेमाची भयानक पोस्टर्स होती. ध्वनिवर्धक तीन भाषांतून गाड्यांची माहिती देत होते. पोर्टर उभ्या गाड्यांची चाकं तपासत होते. घड्याळ बंद होते. गाडीची बेल कधीमधी वाजत होती. मनात विचार आला, अठरा पगड जातींना पोटात सामावणारी आगगाडी, ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीकच आहे. खरं तर जीवन हेही या प्लॅटफॉर्मसारखंच आहे. माणसं येतात कुठून, जातात कुठे काहीच माहीत नसतं. योग्य गाडी मिळेपर्यंत थांबतात ती या प्लॅटफॉर्मवर...आणि हा थांबण्याचा थोडा काळ म्हणजेच जीवन !
आपली वेळ झाली, गाडी मिळाली की झटकन् निघून जातो प्रत्येक जण !! “मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन प्लॅटफॉर्म नंबर दो पर आ रही है" म्हणत असताच आरडत ओरडत, दिमाखात स्टेशनमध्ये घुसणाऱ्या गाडीकडे सारे धावले. त्यामध्येच नकळत सामावला जाऊन मी ताईला शोधू लागलो.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व रेल्वे स्थानकावर तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका
निबंध 2
रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh
रेल्वे स्टेशन ही खूप व्यस्त आणि उत्तेजित करणारी जागा आहे. तिथे नेहमी गाड्या येत जात राहतात. तो एक छोटासा संसार असतो. ज्यात सर्व प्रकारचे स्त्री-पुरुष मुले सतत दिसत असतात. मला अनेकदा रेल्वे प्रवासाची संधी मिळाली आहे. परंतु जेव्हा मी माझ्या काकांना घेण्यास लखनौ स्टेशनवर गेलो तेव्हा मला रेल्वे प्लॅटफॉर्मचा खरा अनुभव आला.
काका दिल्लीहून येत होते. मी गाडी येण्यापूर्वी २०-२५ मिनिटे आधीच गेलो. प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आणि स्टेशनात गेलो. गाडी अर्धा तास उशिरा येणार होती. मला वाटले एक तास वाट पाहणे फारच कंटाळवाणे होईल. वेळ कसा जाईल मी काय करू?
पण एक तास १० मिनिटासारखा गेला. अजिबात कंटाळा आला नाही. प्रथमच मला असे वाटले की वेळेलाही पंख असतात. तिथे मी जे जे पाहिले, जो अनुभव आला ते सर्व माझ्यासाठी रोमांचक व अविस्मरणीय ठरेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. कधी मी बेंचवर बसत होतो तर कधी प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे फिरत होतो. गरम चहा पीत होतो.
प्लॅटफॉर्मवर प्रवासी, हमाल, फेरीवाले रेल्वेचे गार्ड तिकिट कलेक्टर, मेकॅनिक्स, भिकारी इत्यादी ची खूप गर्दी होती. हा एक अद्भुत मेळा होता. सगळेच जण घाईत होते. आपापाल्या कामात व्यस्त होते. पण मी मात्र मजेने या सर्वाचा आनंद लुटत होतो.
प्रेक्षक म्हणून, प्लॅटफॉर्मवर तीळ ठेवायलाही जागा नव्हती. ठिकठिकाणी बॅगा, सुटकेस, बेडिंग, टोपले, पाकिटे, खेळणी, पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. काही लहान मुले आपली खेळणी व फुग्यांशी खेळत होती. एक मुलगा मिठाईसाठी हट्ट करीत होता तर दुसरा छोटा मुलगा कशासाठी तरी आपल्या आईच्या मांडीवर बसून रडत होता.
जेव्हा प्लॅटफॉर्मवर एखादी गाडी यायची तेव्हा लोकांची गर्दी तिच्यावर झडप घालायची. धक्का बुक्की करीत एकमेकांना ढकलीत सगळ्यात आधी घुसण्याचा प्रयत्न लोक करीत होते. हमाल चालत्या गाडीत चढून प्रवाशांना चढविण्यात गढले होते. बायका, म्हातारी माणसे आणि मुले यांना गाडीत चढणे मुश्किल झाले होते.
कुठे रेल्वेचा गार्ड हिरवा झेंडा दाखवून तर गाडीचा ड्रायव्हर शिट्टी वाजवून गाडी सुरू झाल्याचा इशारा प्रवाशांना करीत होता. एखादा टी.सी. तिकिट न घेतलेल्या प्रवाशांना पकडून नेत होता. फारच अजब आणि रोमांचक वातावरण होते.
इंजिन आणि गाड्यांच्या येण्या जाण्याचा जोराने सारखा आवाज येत होता. फेरीवाले ओरडून आपल्या वस्तू विकत होते. कुणी हमाल जास्त हमाली मिळावी म्हणून भांडत होता. कुणी प्रवासी खराब चहा दिल्याबद्दल चहावाल्याशी भांडत होता. कुणी वर्तमानपत्रे, मासिके वाचत बसले होते, कुणी पान चघळत होते. कुणी तिथेच जमिनीवर पथारी पसरून आराम करीत होते. सफाई
कामगार घाण साफ करीत होते. नळावर पाण्यासाठी खूप गर्दी झाली होती. जणू काही दुधाचेच मोफत वाटप होत होते. निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घातलेले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक पाहून देशाच्या विशालतेची, विविधतेची, त्यातून प्रतित होणाऱ्या ऐक्याची सहजच ओळख होत होती.
मी प्रवाशांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. त्यांचे मनोभाव समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांच्या हावभावांचे निरीक्षण करीत होतो. हे सर्व करण्यात मला आनंद वाटत होता. वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे, त्यावरील हावभाव, अभिव्यक्ती सारे काही खरोखरच आकर्षक, मनोहर व ज्ञान वाढविणारे होते.
गाड्या जात येत होत्या. लोक एकमेकांशी हस्तांदोलन करून निरोप घेत होते. कुणी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. कुणी माझ्याप्रमाणेच कुणाची तरी वाट पाहत उभे होते. तिथे एक लग्नाचे व हाड गाडीची वाट पाहत होते
नवरा मुलगा खेड्याचा होता आणि त्याने नवरदेवासाठी असलेला पारंपरिक पोषाख घातला होता. आणि त्यामुळे तो फार आकर्षक वाटत होता. पण पान खाऊन तो इकडे तिकडे धुंकत होता ते पाहून मला खूप किळस आली. इतक्यात एका पोलिसाने एका खिसेकापूला रंगेहात पकडले आणि तो त्याला मारू लागला.
त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. चोराची पिटाई होत असलेली पाहून बरेच लोक खुश झाले आणि चोराबद्दल तहेत हेच्या गोष्टी करू लागले. शेवटी त्याला दोरीने बांधून तुरुंगात नेले.
त्याच वेळी मला समजले की माझ्या काकाची गाडी प्लॅटफॉर्मवर येत आहे. मी सावध झालो. गाडी धडधडत येऊन प्लॅटफॉर्मवर थांबली. काका वातानुकूलित कुपेने येत होते म्हणून मला त्यांना शोधावे लागले नाही. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो व त्यांना नमस्कार केला. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला.
त्यांनी मला जवळ घेतले व आशीर्वाद दिला. सामान जास्त नव्हते. फक्त एक सुटकेस होती. काकांनी ती हमालाजवळ दिली आम्ही लगेच स्टेशनच्या बाहेर आलो. एक टॅक्सी केली आणि अर्ध्या तासात घरी पोहोचलो. त्यादिवशी प्लॅटफॉर्मवर घालविलेला एक तास माझ्यासाठी एक आठवण आणि अनुभव बनला. तो मी कधीही विसरू शकणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .