Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचन एक उत्तम छंद मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण वाचन एक उत्तम छंदशीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत प्रत्येकाला कोणतातरी छंद असतोच आणि यांच छंदामुळे आपण उत्साहाने भरून जात असतो व त्याच बरोबर त्यामुळे आपण आनंद, मनोरंजन , ज्ञान पण मिळवु शकतो. आज आपण वाचन या छंदाविषयी माहीती या निबंधात बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
मुद्दे :
- उत्तम छंद
- भरपूर वाचन असलेला माणूस संकुचित विचार विसरतो
- वाचनामुळे अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती मिळते
- आपल्यातील उणिवा कळतात
- आनंद मिळतो
- इतिहासातील माहिती मिळते
- कुठेही वाचन करता येते
- वृद्ध, लहान मुले यांना तर खूपच मदत.
असा धरी छंद, जाई तुटोनिया भावबंध।
मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मांतील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते.
आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते.
आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकांतून खूप आनंद मिळतो. खरोखर, सर्वांना उपयोगी पडणारा वाचन हा छंद सर्वोत्कृष्ट छंद आहे.
मित्रांनो तुम्हाला वाचन एक उत्तम छंद हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता छंद कोणता आहे हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi |
नुकतेच माझ्या वाचनात आले...डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या एका भाषणात मागासलेल्या बांधवांना कळवळून सांगितले होते - “वाचाल तर वाचाल !" ऐकायला आणि वाचायलाही जरा विचित्र वाक्य वाटते हे, पण ते अर्थपूर्ण आहे हे विचारांती पटते.
'वाचाल' म्हणजे वाचन कराल, 'तर वाचाल' म्हणजेच टिकाल ! 'वाचाल तर वाचाल' याचा अर्थ वाचन कराल तर टिकून राहाल ! चांगले जीवन जगाल इंग्रजीत म्हण आहे - Survival of the Fittest. जे देशकाल परिस्थितीला अनुसरून अगदी योग्य असेल ते टिकते.
इतर प्राणिमात्र आणि माणूस यात मुख्य फरक हाच आहे की माणूस विचार करू शकतो. तो बोलतो, वाचतो, लिहितो. विचार करण्याची ही शक्ती वाचनातून अधिक विकसित होते. डॉ. आंबेडकरांनी हा विचार ज्या समाजासमोर मांडला त्यापैकी ९९% लोक निरक्षर होते. त्यांना लिहिता, वाचता येत नव्हते.
पुस्तके किंवा वर्तमानपत्रे सोडा साधे पत्रदेखील त्यांना दुसऱ्याकडून वाचून घ्यायला लागे आणि उत्तरसुद्धा दुसरा लिहिणार तेव्हा लिहिले जायचे ! वाचता येईना ! हिशेब समजेना ! काय विचारांवी त्यांची दैना ? सरकार व सावकार दोघेही त्यांना फसवत, लुबाडत असत. म्हणूनच त्यानी वाचायला शिकले पाहिजे (लिहायला व हिशेब करायला शिकले पाहिजे) असे डॉ. आंबेडकर म्हणत.
गेल्या चाळीस पन्नास वर्षात ह्या समाजात खूपच सुधारणा झाली आहे. बरेच लोक केवळ साक्षर नव्हे तर सुशिक्षित झाले आहेत. आपल्या व्यथा वेदना ते बोलून दाखविताहेत. दया पवार यांचे 'बलुतं', लक्ष्मण माने यांचे 'उपरा', शरणकुमार लिंबाळे यांचे 'अक्करमाशी' अशा कित्येक आत्मकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. मागासलेल्या समाजातून अशी आशेची प्रकाशकिरणे फाकत आहेत.
पण केवळ एका विशिष्ट समाजापुरताच हा संदेश आहे का ? तसेच वाचाल म्हणजे केवळ वाचायला शिकाल, साक्षर व्हाल तर वाचाल एवढेच का डॉक्टरांना सांगायचे असावे ? 'वाचाल' याचा अर्थ इतका मर्यादित असेल का ? तसे नक्कीच नाही. वाचाल म्हणजे काय वाचाल ? दुसरी चौथीची पुस्तके ? वर्तमानपत्रे ? दरमहा प्रसिद्ध होणारी मासिके ? रस्त्यावर दिसणाऱ्या लहान मोठ्या जाहिराती ?
निरक्षराने साक्षर होणे आणि साक्षराने सुशिक्षित बनणे, हे जसे क्रमप्राप्त ठरते, तसे वाचता येऊ लागल्यावर वर वाचनात सहजता, सफाई येणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजात आवश्यक तेथे योग्य तो चढउतार करून वाचता येणे, आवाज न करता मनात वाचता येणे हे जमले पाहिजे.
त्याचप्रमाणे पुढे पुढे वाचनात निवड हवी. रोज कोणते तरी एक पुस्तक वाचून ज्ञान वाढत नाही व मन समृद्ध होत नाही. मनोरंजनासाठी कथाकादंबऱ्यासारखे हलके फुलके साहित्य वाचणे आवश्यक तसे विचार प्रवर्तक निबंध, माहितीपूर्ण लेखन, उत्तमोत्तम प्रवास वर्णन, थोरा मोठ्यांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचेही वेचक वाचन हवे.
नुसते भराभर व भाराभर वाचन करणारा माणूस म्हणजे टनावारी ओझी वाहणारा हमालच ! त्याच्या डोक्यावरून तो जे नेतो त्यातले त्याच्या डोक्यात काय उतरते? म्हणूनच वाचनाला शिस्त हवी, वळण हवे, वाचलेले नीट पचले पाहिजे, आकलन झाले पाहिजे. त्यातूनच बौद्धिक समंजसपणा येतो. It is not what you eat but what you digest, that makes you strong; it is not what you read but what you understand, that makes you learned.
त्याचप्रमाणे वाचन चौफेर हवे. आपल्या आवडत्या एकाच विषयाचे वाचन नको. विविध विषय विविध प्रकार वाचनात असावेत. जाता जाता अखेरची एक शंका मांडावीशी वाटते. सध्याचे जग इलेक्ट्रॉनिक्सचे व संगणकाचे आहे. टी. व्ही., व्हिडिओ, टेपरेकॉर्डर, कॅसेटस् यांच्या जमान्यात वाचनाचे महत्त्व पुढे राहील का ? काळच याचे खरे उत्तर देईल ! पण चित्रपट आले म्हणून नाटके संपली नाहीत.
टी. व्ही, व्हिडिओ आले म्हणून चित्रपटगृहे ओस पडली नाहीत. तसेच वाचनाचे ! वाचन कशासाठी ? ज्ञानासाठी ! ते एवढ्या पुरतेच नसते तर एका वेगळ्या प्रकारच्या आत्मिक समाधानासाठी असते. वाचनाचे वेड लागलेला माणूस पहा. वाचन त्याचे काम नसते. वाचन हा त्याचा स्वभाव बनतो. अनेक उत्तमोत्तम ग्रंथांशी त्याची जवळची दोस्ती बनते. त्याच्या सुखदुःखाच्या क्षणी हे ग्रंथच त्याला सोबत करतात. दिलासा देतात. प्रोत्साहन देतात. प्रेरणा मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद