प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध | Republic day 26 January essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये दरवषी प्रजासत्ताक दिन कश्याप्रकारे साजरा केल्या जातो याचे वर्णन केले जाते. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
प्रजासत्ताकदिन आणि स्वातंत्र्यादिन हे दोन मोठे राष्ट्रीय समारंभ आहेत. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला तर स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टला साजरा केला जातो. संपूर्ण राष्ट्र मोठ्या उत्साहाने हे दिवस साजरे करते. आपल्या इतिहासाची आणि हौतात्म्य स्वीकारलेल्या वीरांची आठवण देश करतो. आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी यादिवशी नवे संकल्प केले जातात.
Republic-day-26-January-essay-in-Marathi |
२६ जानेवारी १९५० ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि घटना लागू करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाची कहाणी मोठी आहे. याचा इतिहास १९२९ साली झालेल्या लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनापासून सुरू होतो. या अधिवेशनाचे पं. नेहरू अध्यक्ष होते. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव यात पास करण्यात आला. याच दिवशी रात्री बारा वाजता रावी नदीच्या किनाऱ्यावर नेहरूंनी स्वातंत्र्याचा ध्वज फडकविला. देशाला उद्देशुन संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषण केली. हा दिवस २६ जानेवारी होता. त्यादिवशी सर्व प्रतिनिधींनी एका स्वरात भारतमातेला गुलामगिरीच्या साखळ्यांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे हा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय बनला.
त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारीला भारतीय जनता या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करीत राहिली. ज्यामुळे स्वातंत्र्य चळवळीला उत्तेजन व गती मिळाली, देशप्रेम आणि देशभक्तीने झंझावाताचे रूप घेतले. १९४२ मध्ये 'भारत छोडो' चळवळीचा श्रीगणेशा करण्यात आला. शेवटी इंग्रजांना इथून जावेच लागले व देश स्वतंत्र झाला.
देशाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती २६ जानेवारी १९५० ला पूर्ण झाली. त्यानंतर भारत प्रजासत्ताक घटक राज्य बनले. त्याला सार्वभौमत्व मिळाले. त्याने लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला. संपूर्ण भारतात प्रसन्नता व संपूर्ण स्वातंत्र्याची एक लाट आली. लोकांनी २६ जानेवारीला त्याचे समारंभ साजरे केले.
२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात. २५ जानेवारीला संध्याकाळी राष्ट्रपती इंटरनेट व दूरदर्शनच्या माध्यमातून संपूर्ण देशाला उद्देशून संदेश देतात. तो हिंदी व इंग्रजीत असतो. या प्रसंगी वृत्तपत्रे, मासिकांचे विशेष अंक प्रकाशित होतात. ठिकठिकाणी ध्वजारोहण व विशेष कार्यक्रम सादर केले जातात. संपूर्ण राष्ट्रात एक उत्साहाचे वातावरण असते.
२६ जानेवारीला सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर राजपथावर शानदार कार्यक्रमाला प्रारंभ होतो. राष्ट्रपती जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचे स्वागत उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सेनेच्या तिन्ही विभागांचे प्रमुख करतात. ध्वजारोहण होते आणि नंतर सेनेच्या तिन्ही विभागांच्या तुकड्यांची परेड होते. राष्ट्रपती त्यांची सलामी घेतात. बँडवर राष्ट्रीय धून वाजविली जाते त्यानंतर भारतात तयार झालेल्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रांचे प्रदर्शन होते.
आपल्या सैन्याच्या तयारीची आपणास एक झलक पाहावयास मिळते. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मनोरंजनाचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. नंतर वेगवेगळ्या राज्यांच्या आकर्षक शोभायात्रा निघतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर केली जातात. हा सर्व कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा असतो. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात.
इंटरनेट व दूरदर्शनवर त्याचे थेट प्रसारण केले जाते. रात्री सरकारी इमारतींवर विद्युत रोषणाई केली जाते. असे वाटते जणू दिवाळीच आहे. राजधानी दिल्लीखेरीज इतर राज्यांच्या राजधान्या, शहरे, गावे सर्वत्र प्रजासत्ताकदिन धूमधडाक्याने साजरा केला जातो. प्रांतांच्या राजधान्यांत राज्यपाल परेडची सलामी घेतात. शाळा, कॉलेज, संस्था इ. ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केलेले असतात. सर्व सरकारी इमारतींवर तिरंगा फडकविण्यात येतो.
या उत्साह व उत्सवाबरोबर हा दिवस आमच्या चिंतनाचा पण आहे. तो आपणास ही प्रेरणा देतो की आपण आपल्या भारताला अधिक सुदृढ, सुखी, समृद्ध आणि उन्नत बनविले पाहिजे. आपल्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागला पाहिजे. आपली त्याग आणि बलिदानाची परंपरा नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. खरोखरच हा एक अविस्मरणीय दिवस असतो. राष्ट्रीय उत्सव, मेळा असतो. ज्यात सर्व वर्ग जाती, धर्माचे लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे उत्साहाने भाग घेतात. त्यामुळे आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते.
भारतात इतरही अनेक उत्सव होतात पण २६ जानेवारी एकमेवच. परदेशांत भारतीयांखेरीज इतर परदेशी लोक पण हा कार्यक्रम आवडीने पाहतात. या प्रसंगी इतर राष्ट्रांचे प्रतिनिधी विशेष पाहुणे पण हजर असतात. ते आपल्याबरोबर या दिवसाच्या आठवणी घेऊन जातात.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
गणतंत्र दिवस मराठी निबंध | Best Essay On Republic Day In Marathi
भारतात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक सण व उत्सव साजरे केले जातात. पण काही सण असे असतात की ज्यांचा संबंध राष्ट्र आणि त्यातील निवासी यांच्याशी असतो. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५० पासून भारताने आपली नवी घटना लागू केली. स्वत:चे स्वतंत्र सरकार, राष्ट्रपती, ध्वज यांची निर्मिती झाली.
भारत जगातील सर्वात मोठे सार्वभौम प्रजासत्ताक बनले. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सूत्रे सोपाविण्यात आली. या दिवशी सकाळी सर्वप्रथम पंतप्रधान इंडिया गेटवर जाऊन अनाम हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात. सकाळी ७ वाजता राष्ट्रपती विजय चौकात येतात. तेव्हा पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि भारतीय सेनेच्या तिन्ही दलांचे सेनाप्रमुख राष्ट्रपतींचे स्वागत करतात.
तिरंगी झेंडा फडकविल्यानंतर तिन्ही सेनेच्या तुकड्या सलामी मंचाकडे जातात. बँडवर सैनिक राष्ट्रीय संगीत वाजवितात. घोडे व उंटावर स्वार झालेल्या सैनिकांच्या तुकड्या येतात. भारतात तयार करण्यात आलेले रणगाडे, तोफा, रॉकेट आदींचे प्रदर्शन केले जाते. भारताच्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले जाते. शालेय विद्यार्थी हे नृत्ये, व्यायाम, आणि कसरतींचे प्रदर्शन करतात. विविधतेत एकता दाखविणारे देखावे निघतात. या देखाव्यांत त्या त्या राज्यांची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक झलक असते.
शौर्य गाजविणाऱ्या मुला-मुलींचा सन्मान केला जातो. साडेअकरा वाजता लाल किल्ल्यावर परेडचे विसर्जन होते. आकाशातून विमाने पुष्पवृष्टी करतात. सर्व राज्यांत प्रजासत्ताकदिन उत्साहाने साजरा केला जातो. त्याठिकाणी राज्यपाल सलामी घेतात आणि प्रादेशिक वेशभूषेत नृत्यगायन होते. शाळेतील मुलेही सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. सरकारी कार्यालयांवर रोषणाई केली जाते. राष्ट्रपती भवन, संसद, सचिवालय विजेच्या रोषणाईत न्हाऊन निघतात. हे दृश्य पाहण्यासारखे असते.
राष्ट्रपती रात्री देशी-विदेशी अतिथींना मेजवानी देतात. या दिवशी शासकीय व अशासकीय कार्यालयांना सुट्टी असते. शाळा-महाविद्यालयांत सांस्कृतिक कार्यक्रम, खेळांच्या स्पर्धा होतात.
प्रजासत्ताक दिन आपणास आपल्या कर्तव्यांची जाणीव करुन देतो. आपल्या देशातील अमर हुतात्म्यांचे स्मरण करून आपण विचार केला पाहिजे की आपण काय गमावले आणि काय मिळविले! आपण राष्ट्राच्या सेवेत सहभागी झाले पाहिजे. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता, आणि रक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद