bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध
bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh |
रोज ठरावीक वेळी 'दादा, भाजी' अशी आरोळी कानावर येते. विनायक एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आमच्या वसाहतीत रोज भाजीची गाडी घेऊन येतो. विनायकचे वागणे आदबशीर व नम्र असते. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला आहे. एकदा या विनायकला मी बोलते केले. मुद्दाम त्याला संध्याकाळी बोलावून घेतले आणि त्याची माहिती विचारली.
"दादा, मी आठवी नापास आहे,' विनायक सांगत होता. "आठवी नापास झालो आणि शाळा सोडली, तेव्हाच माझा बाबा वारला आणि घरासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली. पूर्वी हीच गाडी माझा बाबा फिरवत असे, तेव्हा गमतीने मी त्याच्याबरोबर फिरत असे, म्हणून या कामाची मला माहिती होती.
“भाजी आणण्यासाठी मला भल्यापहाटे मोठ्या मंडईत, घाऊक बाजारात जावे लागते. भाजी खरेदी झाली की माझी गाडी लावतो. काही गिहाईकांनी काही खास भाज्या आणायला सांगितलेल्या असतात. त्या मी अगदी आठवणीने आणतो आणि मग आमचा शहराकडे प्रवास सुरू होतो. मोठी मंडई तशी गावापासून खूप दूर आहे. त्यामुळे चालायचे खूप श्रम होतात. त्याच वेळी मन साशंकही असते. 'एवढी भाजी आज विकली जाईल ना?' कारण भाजी हा नाशिवंत माल आहे. पण बहुधा सगळा माल संपतो.
"या व्यवसायात खूप पायपीट करावी लागते. पण अनेक ग्राहकांशी माझे एवढे प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे की, त्या पायपिटीचे मला काही वाटत नाही. कित्येक आजींना मी त्यांच्या घरात भाजी पोचवतो. मग त्या प्रेमाने मला चहापाणी देतात. संक्रांतीला आठवणीने तिळगूळ देणाऱ्या अनेक ताई-माई आहेत. कुणाकडे काही कार्य असले की, ते भाजीची भलीमोठी यादी देतात.
"काही त्रासदायक, कटकटी ग्राहकही भेटतात. पण मी कोणाशी वाद घालत नाही. त्यामुळे खटके उडत नाहीत. संध्याकाळचा वेळ मला मोकळा असतो. त्यावेळी मी वाचन करतो. रोजची वृत्तपत्रे वाचतो. साने गुरुजींची पुस्तके मला खूप आवडतात. माझे घर व्यवस्थित चालेल एवढे पैसे सध्या मला मिळतात. पण मी यात समाधानी नाही.
"एक छोटासा गाळा घेणार आहे. त्यामुळे दुपारनंतर मी तेथे भाजी विकू शकेन. पण काही झाले तरी मी माझी सकाळची फेरी सोडणार नाही; कारण त्यामुळे मला खूप स्नेहीसोबती मिळतात.'' विनायकच्या विचारांनी मला मनोमन आनंद झाला. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
मराठी 2