bhukamp grastache manogat nibandh | भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपग्रस्ताचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. मानवी जिवन हे संकटानी भरलेले असते त्यात कधी कोणते संकट येईल हे सांगता येत नसते या निबंधामध्ये अश्याच एका संकटाचा म्हणजे भुंकपाचा सामना केलेली व्यक्ती त्याचे मनोगत स्वरूपात त्यांनी अनुभवलेले भुंकपाचे संकट व्यक्त करते त्यावर त्यांनी कशी मात केली हे या 5 निंबधात सविस्तर सांगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
bhukamp-grastache-manogat-nibandh |
निबंध 1 (450 शब्दात)
एके दिवशी वर्गशिक्षिका वर्गात आल्या व म्हणाल्या, “आज आपण निबंध लिहायचा." मुलांनी “विषय कोणता, विषय कोणता," असा एकच कुजबुजाट केला. त्यातच त्यांनी विषय जाहीर केला – भूकंप ! ' भूकंप' हा शब्द उच्चारताच माझ्या बाजूलाच बसलेला माझा मित्र स्वप्निल कावराबावरा झाला. माझ्या नजरेने हे तत्क्षणी हेरले. मधल्या सुट्टीत मी त्याला त्याबद्दल बोलते केले, तेव्हा तो व्याकूळ होऊन सर्व आठवणी सांगू लागला…
“भूकंप हा शब्द ऐकला तरी मला गलबलून येते. कारण मी स्वतः भूकंप अनुभवला आहे. भूकंप झालेल्या गावातूनच मी आलो आहे. आमचं गाव अगदी साधंसुधं खेडेगाव आहे. दिवसभर शेतात राबायचे, दोन वेळचं साधंसं जेवण घ्यायचं आणि रात्री गाढ झोपी जायचं, हाच गावाचा मुख्य दिनक्रम. एके दिवशी आम्ही असेच शांतपणे झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर अचानक जमीन थरथरली... फक्त काही सेकंदच ! आणि काही कळायच्या आत झाडे, घरेदारे धडाधड कोसळली... अनेक गुरेढोरे, माणसे सगळी घरांखाली गाडली गेली.
काही मिनिटांनी सगळीकडे एकच हलकल्लोळ माजला. रडणे, ओरडणे, मदतीसाठी पुकारणारे यांनी अवघा अवकाश व्यापून टाकला. ढिगारे उपसण्याचे असहाय प्रयत्न करण्यात, आपली माणसे शोधण्यात सकाळ उजाडली... आणि सर्वांसमोर उद्ध्वस्त वास्तव लख्ख प्रगटलं. प्रचंड मोठ्या नांगराने कोणीतरी जमीन नांगरावी, त्याप्रमाणे सगळी जमीन खणल्यासारखी दिसत होती.
सर्व घरे, वाडे उद्ध्वस्त झाले होते. मोठमोठी झाडेसुद्धा मुळापासून उपटून आडवी झाली होती. जी घरे माणसांना आजपर्यंत आश्रय देत होती, त्या घरांखालीच अनेकजण गाडले होते. काही जणांचे हात तुटले होते; पाय तुटले होते. कित्येकजण जबर जखमी होऊन विव्हळत पडले होते. कित्येक मृतदेह इतस्ततः पसरले होते. प्रत्येक घरात मृत्यूने थैमान घातले होते. कुणी कुणाला सावरायचं? कुणी कुणाचे अश्रू पुसायचे?
" त्यानंतर झालेल्या हालांना तर पारावारच उरला नाही. भूक लागल्यावर खायला काहीच नव्हते. आमच्या वाडीवरची एकुलती एक विहीर उद्ध्वस्त झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचं संकटच उभं राहिलं.
औषधोपचाराविना अनेकजण तळमळत होते. आम्ही सर्वजण भुकेने व्याकूळ झालो होतो. रस्ते उखडलेले, झाडेझुडपे कोसळून पडलेली... त्यामुळे गावाबाहेरचे लोक आमच्यापर्यंत पोहोचायला संध्याकाळ उजाडली. तेव्हा कुठे आम्हांला खायला पहिला घास व पाण्याचा पहिला घोट मिळाला. हळूहळू सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. आम्हांला दूर मोकळ्या जागेत एकत्र केले. रडून रडून दमल्यावर आम्ही रात्री उघड्या माळरानावरच झोपी गेलो.
" नंतरच्या दिवसापासून मात्र दूरदूरचे अनेकजण आमच्यासाठी मदत घेऊन येऊ लागले. विविध वस्तू, कपडे, अन्नधान्ये यांची मदत सुरू झाली. तात्पुरते तंबू उभारून आमची राहण्याची सोय केली गेली. आम्हांला घरे बांधून देण्याच्या बातम्या येऊ लागल्या. बरीच मदत आली, हे खरे. पण मदतीतला मोठा वाटा गावातल्या मातब्बर लोकांनी व दांडगाई करणाऱ्यांनी बळकावला. पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो. काही गावकरी तर आजही उघड्यावर पडले आहेत.
“भूकंपाच्या आठवणी आल्या की, अजूनही माझं मन गलबलतं. माझी आई या भूकंपामुळे धरणीच्या कुशीत विसावली. माझा धाकटा भाऊ जबर जखमी होऊन काही दिवसांनी देवाघरी गेला. आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. माझी बहीण, आजी आणि बाबा गावी कष्ट करून कसेबसे पोट भरत आहे. माझ्या मामाने मला इकडे बोलावून घेतले, म्हणून तर मी या शाळेत शिकायला येऊ शकलो आहे.
"नको रे बाबा ! त्या भूकंपाच्या आठवणी नकोत ! त्या आठवणींनी आजही माझ्या जीवाचा थरकाप होतोय."
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . खालील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2 (350 शब्दात)
सारा गाव देवीच्या कुशीत विसावला होता. दिवसाभराची कामं झाली होती. जमिनीची, नोकरीची कामं; कुणाचं लग्न, कुणाचा वाढदिवस कुणाचं काय कुणाचं काय... भुकंप आला आणि... होत्याचे नव्हते झाले सूर्य उगवायचा होता; अंधारातच “धडाइ धूडम्” “गडगडगड" आवाज घुमले. घरे हालली; भांड्यांची भांडणे झाली, दरवाजांचे आवाज आले..... अंधाराचा महासागर, गगनाला चिरणाऱ्या किंकाळ्या, उघडण्याआधीच कायमचे मिटलेले डोळे... सूर्योदयापूर्वीच जीवनाचा सूर्यास्त झाला. माझ्या सर्व नातेवाईकांबरोबर ४० हजार आयुष्ये गिळून हा भूकंप दैत्य शांत झाला.
जिवन हे चांगल्या प्रवासासमान असते पण उद्या काय होईल याबद्दल काही सांगता येत नसते .पाप वाढते तेव्हा धरणीकंप होतो असे म्हणतात मग आम्ही काय पाप केलं होतं ? की आम्ही ४० हजारांनीच मिळून फक्त पाप केलं होतं ? मग आम्हाला ही शिक्षा का?
राहिलेल्या उजाड जीवनाचे मी करू काय ? आईवडील, बहीणभाऊ सारे गेले. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली तुटलेल्या कमरेची माझी आई. फुटलेल्या डोक्याने आईला बिलगलेली बाहुलीसारखी बहीण, भींतीखाली दोन्ही पाय गमावुन निजलेले वडील, ढिगाऱ्यात हरवलेला भाऊ.... डोळ्यांसमोरून हलवा हे दृश्य.... नाहीतर मी वेडा होईन.
क्षणात गाव पुसलं गेलं. जगाला जाग आली. सहानुभूतीची लाट उसळली. संकटात सापडलेल्यांच्या मदतीला सरकार, स्वयंसेवी संस्था धावल्या. गावाला युद्ध छावणीचे रूप आले. अन्न, पाणी, दूध, वस्त्रे, औषधे, निवारे तंबू सर्व वाटले गेले. सर्वधर्मी प्रार्थना झाल्या. पुनर्वसनाची चक्रे फिरू लागली. माणुसकीचे दर्शन झाले.
हळूहळू सर्व ठीक होईल. लोक आपल्या विश्वात रमून जातील. हे सारं विसरूनही जातील. विस्मृतीच्या वरदानावरच माणसाचं जीवन सुसह्य होतं. परदुःख शीतल पण ज्याचं जळतं त्याचं काय ?... मदतीच्या खैरातीवर कां आयुष्य काढायचे ? -
उध्वस्त जपानकडून स्फूर्ति घ्यायला हवी. फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी मारायचीय. जखमा विसरून कामाला लागायचे आहे.
"उष:काल होता होता काळरात्र झाली पुन्हा आता आयुष्याच्या पेटवा मशाली"
सारं सुरळीत होईल. पण एक नक्की, जेव्हा केव्हा ३० सप्टेंबर तारीख कलेंडरवर दिसेल तेव्हा मनात वादळं निर्माण होतील; आणि डोळ्यातुन अश्रुंच्या धारा वाहु लागतील.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 3
भूकंपग्रस्ताचे मनोगत मित्रांनो, मी तुम्हाला एका वेगळ्या थरारक अशा अनुभवाची घटना सांगणार आहे. मी जो भूकंप अनुभवला त्याचे सविस्तर वृत्त मी तुम्हाला सांगणार आहे .
काही क्षण थरथर थरथर जमिनीचे असे कंपन झाले. खडखड खडखड घरातील भांडे पडण्याचा आवाज आला आणि लगेच काही क्षणातच धडाम धूम, धाडधाड असा घरे पडण्याचा आवाज. पुढे अनेक आवाज. आई गऽऽऽऽ......मेलो रेऽऽऽऽ.....बाप रेऽऽऽ.....ओंऽऽऽ.... वाचवाऽऽऽऽ..असे अनेक आवाज व त्यात मिसळला जात होता तो रडण्याचा आवाज आणि विव्हळण्याचा आवाज. काय झाले हे समजण्याच्या आधीच एका सुंदर अशा वस्तीचे; विटा,दगड,माती मध्ये रुपांतर झाले होते. भूकंपाने संपूर्ण गाव उध्वस्त करुन टाकले होते. रस्ते कोणते व घरे कोणती यातील फरक समजत नव्हता. अगदी पक्की घर सुध्दा वाचली नव्हती.
काही कळायच्या आत काळाने त्यांच्यावर झडप घातली. काही जनावरे सुध्दा मृत्युमुखी पडली. जे वाचले ते क्षणभर अवाक होऊन नुसते बघत राहिले. परिवारातील सदस्य ढिगाऱ्याखाली दडले हे समजताच काय करावे त्यांना सुचेनासे झाले होते.
भानावर येताच त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी ढिगारा उपसण्याचे प्रयत्न ते करु लागले. ढिगारा उपसणे तेवढे सोपे नव्हते. काय करावे? मदतीला कुणाला बोलवावे? प्रत्येकाचा चेहरा रडवेला,हताश, घाबरलेला दिसत होता. कुणाची अगदी वेड्यासारखी स्थिती. “अरे देवा, हे काय केलस?' वर पाहून कुणा एकाचा प्रश्न. तर “लय पाप वाढलं होतं आपल्या गावात म्हणून असं घडलं' असा दुसऱ्याचा उदास स्वर.
"गावातील पाप्यांना हाकलून दिलं असतं तर असा प्रसंग आला नसता”असा तिसऱ्याचा सूर. अशा प्रकारे विविध क्रिया, प्रतिक्रिया, आश्चर्य, दुःख, वेदना, हताशपणा, गोंधळ सुरु झाला होता. भूकंपाची ही बातमी प्रशासनापर्यंत पोहोचली. प्रशासनाच्या गाड्या पोहोचल्या. वृत्तपत्रे व विविध वाहिन्यांचे प्रतिनिधी,पत्रकार पोहोचले. काही वेळाने मदतीसाठी सेना जवान पोहोचले. मदत कार्य सुरु झाले परंतु निसर्गाचा राग शांत झाला नव्हता. त्याने मदतीत अडथळा निर्माण केला.
पावसाला सुरुवात झाली. पहिल्यांदा धरतीने झिडकारले नंतर पावसाने झोडपायला सुरुवात केली. धो धो पाऊस पडू लागला. पावसाच्या धारा व वाचलेल्या व्यक्तींच्या डोळ्यातील धारा थांबता थांबेनात. तर मदत कार्याला जसा विलंब होत जात होता. तसा लोकांचा धीर खचत होता. ढिगाऱ्याखाली कुणी जिवंत सापडण्याची आशा मावळत गेली.पाऊस थांबला. मदत कार्य सुरु झाले. अंधार पडू लागला होता.
वीज गेली होती. परंतु तरीही बत्तीच्या उजेडात जवान एक एक प्रेत बाहेर काढू लागले. वातावरण भेसूर दिसत होते. मृतदेह बाहेर काढताच आप्त स्वकीयांचा हंबरडा फुटायचा. वातावरणाचा भेसूरपणा आणखीनच वाढायचा. कुणाची पत्नी, कुणाचा मुलगा, कुणाची मुलगी, कुणाची आई, कुणाचे वडील, कुणाचा भाऊ, कुणाची बहिण. काही घरातील पूर्ण सदस्य मृत्युमुखी पडले होते.
काही लोक जखमी झाले होते. कुणाचा हात निकामी तर कुणाचे पाय निकामी झाले होते. अधून मधुन विजांचा कडकडाट तर जखमींचा उपचाराकरिता तडफडाट होत होता. जखमींचा उपचार करावा की मृतकांचा अंत्यसंस्कार ह्या पेचात आप्त स्वकीय पडले होते. पाहणाऱ्यांचे हृदय फाटावे असे विदारक चित्र निर्माण झाले होते. “संकटे कधी एकटी येत नाहीत” ह्या वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला होता.
शासनाने पुनर्वसनाचे आश्वासन दिले. परंतू मला प्रश्न पडला की, शासन कोणाचे पुनर्वसन करणार ? घरांचे की कुटूंबांचे ? भुकंपात कुटूंबची-कुटूंब गाडली गेली. घराला घरपण येतं ते परिवारामुळे. घरात रहायला परिवारच नाही तर घर कुणासाठी?.
मित्रांनो, कुणाला सरस तर कुणाला निरसा असा मदतीचा वाटा शासनाकडून मिळाला. जिवित हानी ही पैशांनी भरुन निघत नसते. निसर्गाने दिलेल्या या सजेमुळे हृदयावर झालेल्या जखमांवर काळाशिवाय कोणीही कुंकर घालु शकत नाही.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 4
किल्लारी येथे प्रचंड भूकंप झाला अन् तेथील सारे समाजजीवनच उद्ध्वस्त होऊन गेले. पेपरमध्ये याच्या बातम्या रोज वाचत होतो. अन् अशातच एक दिवस एक तरूण आमच्या दाराशी आला. त्याने आपली कहाणी सांगितली.
“सारे लोक पहाटेच्या साखरझोपेत होते अन् एकाएकी जमीन गदगदा हालू लागली. झोपलेल्या लोकांना काय झाले ते कळलेच नाही. अन् एकाएकी घरे, वाडे सारे जमीनदोस्त होऊ लागले. अर्धवट जागे झालेले लोक सैरावैरा धावू लागले. त्यांच्या अंगावर मातीचे ढीग पडू लागले. अनेक लोक मातीच्या ढिगाखाली गाडले गेले. कित्येक संसार उद्ध्वस्त झाले.
पाच मिनिटांत सगळे होत्याचे नव्हते झाले. लोक भानावर येईपर्यंत सारा गाव जमीनदोस्त झाला होता. वाडवडिलांपासूनचे चालत आलेले माझे घर कोसळून फक्त एक मोठा मातीचा ढीग उरला. घरातील भांडीकुंडी, चीजवस्तू सारे काही त्या मातीत गेले. माझा छोटासा मुलगा, माझी बायको कोणीच वाचू शकले नाहीत. मी एकटाच या जगात उरलो आहे.
मी तरी कशाला वाचलो ? आता माझा व्यवसाय, आजूबाजूच्या लोकांची शेती सारे काही भूतकाळात जमा झाले आहे. दुसऱ्याच दिवशी मातीचे ढिगारे उपसून त्याखालून मृतांना बाहेर काढण्याचे कार्य चालू झाले. क्वचित एखाद्या ठिकाणी दैवाच्या बळावरच एखादी व्यक्ती जिवंत सापडली. एरवी मातीच्या ढिगाऱ्यांवर बसलेले खिन्न जीव, त्या ढिगाऱ्यातून काही चीजवस्तू मिळते का असे शोधणारे अभागी लोक असेच दृश्य सर्वत्र दिसत होते. असले भयानक दृश्य पाहून जीव गलबलून जात होता. झालेला सर्वनाश अतिशय भयाकारी होता.
एवढी वर्षे काडीकाडी जमवून उभारलेली घरटी उद्ध्वस्त होऊन गेली होती. मृत्यू आलेले लोक तरी सुटले म्हणावे, अशी परिस्थिती जिवंत असणाऱ्यांची होती. जिवंतपणी मरणयातना भोगण्याची पाळी लोकांवर आली होती. दुसऱ्या दिवशी सरकारी पाहाणी चालू झाली. गावात पाणी नव्हते, वीज नव्हती, खाद्यपदार्थ नव्हते. त्यामुळे मदतकार्य अत्यंत अपुरे पडत होते. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची हानी झाली होती, पशुपक्ष्यांचे हाल झाले होते.
मंत्री लोक दौरा करून जात होते. भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करीत होते. पण प्रत्यक्ष आमच्या हातात त्यातील फार थोडी रक्कम पडली. बाकीची कुठे गडप झाली, तो एक परमेश्वरच जाणे! परंतु अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांनी मदतीचा हात पुढे केला. सर्वांना शाब्दिक आधार दिला. ठिकठिकाणच्या लोकांकडून मदतीचा ओघ चालू झाला.
निराधार झालेल्यांच्या पुनर्वसनाचा प्रयत्न चालू झाला. भूकंपाला तोंड देऊ शकतील अशी घरे बांधण्याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. आता माझे घरटे पुन: कधी उभारले जाते, ते पाहायचे. सध्या तरी मी बेकार झालो आहे. कामधंदा मिळेल या आशेने शहरात आलो आहे. मला कुठेतरी नोकरी मिळेल का हो?"
त्याचा तो कारुण्यपूर्ण स्वर माझे अंत:करण कापीत गेला. आणि मी अंतर्मुख होऊन विचार करू लागले.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
स्वप्नांच्या कुशीत झोपी गेलेले लोक मृत्यूच्या मांडीवर निद्राधीन झाले होते.कायमचे विसावले होते.फक्त तीस सेकंद ‘भूकंप' ही तीनच अक्षरे ... आई ऽ ऽ ऽ वाचवा ऽ ऽ मेलोऽ ऽ असा आक्रोश, दगड, माती, विटा यात गाडले गेलेले लोक..... वेदना व दुःख यांचे थैमान ..... निसर्गाचे उग्र रूप..... मुलांनो, काय सांगू तुम्हाला ....आजही अंगावर काटा उभा राहतो....."
धुडूम...ऽ ऽ धडाड..... आवाजाने अचानक मी जागा झालो. समोरची भिंत कोसळली होती.सारे घर थरथरत होते.माझी लाडकी लेक शांती , तान्हुला किसना अन् माझी कारभारणी सखू , सारेच दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.मी उधडला गेलो होतो.मनाचं वस्त्र चिंध्या चिंध्या होऊन समोर नाचत होतं.मी सुन्न झालो होतो. दगड-माती उकरत माझ्या जिवाभावाच्या पोटच्या गोळ्यांचा , बायकोचा शोध घेत होतो. डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते.मनातलं क्रंदन संपता संपत नव्हतं.हाती काही लागत नव्हतं.
निसर्गाचं हे विनाशाचं तांडवनृत्य घेऊन आलेली ती काळरात्र दुसऱ्या दिवशी सकाळ झाली खरी, पण अजूनही निराशेचा दुःखाचा अंधार दाट पसरलेलाच होता. लातूर ,उस्मानाबाद , जिल्ह्यातील सास्तूर, पेठसांगवी इत्यादी ८३ गावांतील घरे धरतीने गिळली होती. अनेक कुटूंबे बेचिराख झाली होती. चिमुरडी मुले, स्त्रिया , माणसे यांच्या प्रेतांनी परिसर शोकाकुल झाला होता.अनेक बालके अनाथ झाली होती.एकेका घरातून पाच - सहा मृतदेह बाहेर काढले जात होते.बघणाऱ्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रू वाहत होते.
रेडिओ, वर्तमानपत्रे,टी व्ही.द्वारे बातम्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या.सहानुभूती व मदत घेऊन अनेक जण तेथे पोहोचले. भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणावर मदत कार्य सुरू केले. पंतप्रधान , मुख्यमंत्री यांनी तेथे तात्काळ भेटी दिल्या. दुःखितांना मदतीची आश्वासने दिली, त्यांचे अश्रू पुसले.चाळीस हजारांपेक्षा आधिक लोक मृत्यूच्या विळख्यात सापडले गेले होते. २० ऑक्टोबर १९९१ मध्ये उत्तर काशीत झालेल्या भूकंपाची वेदना परत ताजी झाली होती.''
"माझा संसार संपला तरी इतर शेकडो निराश्रितांचे अश्रू पुसण्यासाठी मी पुढे सरसावलो. “हे विश्वचि माझे घर' समजून मी समाजकार्याची कास हाती घेतली . भूकंपग्रस्त लोकांचे पुनर्वसन झाले. भूकंपासंबंधी पूर्व अनुमान संभव करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञ पुढे आले. अशा नैसर्गिक संकटातही मनुष्यहानी व वित्तहानी होऊ नये म्हणून सर्वच प्रयत्नशील आहेत.''
लातूर, किल्लारीच्या भूकंपानंतर २-३ वर्षानं अचानक भेटलेल्या भूकंपग्रस्ताचे हे हृदयातल्या दुःखद भावनांच काव्यमय शब्दरूप माझे काळीज चिरून गेले.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद