माझी शाळा मराठी निबंध | My School Essay In Marathi
कोणत्याही राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील मुले ही असते आणि ही संपत्ती शाळेत ठेवलेली असते. जिथे मुले शिकून सवरून सुसंस्कृत आणि सभ्य नागरिक बनतात. देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलतात.
माझी शाळा घराजवळच आहे. मी चालतच शाळेत जाते. माझी शाळा तीन मजली आहे. शाळेच्या बाहेरच्या भिंती दगड़ी असल्यामुळे इमारत सुंदर दिसते. शाळेत ४० हवेशीर वर्गखोल्या आहेत. शाळेत स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. प्रत्येक वर्गात कचरा टाकण्यासाठी कचऱ्याचा डबा ठेवलेला असल्यामुळे मुले त्यातच कचरा टाकतात. त्यामुळे वर्ग स्वच्छ राहतो. सर्व वर्गांची रोज साफ सफाई केली जाते.
आमच्या शाळेत एकूण ३००० विद्यार्थी-विद्यार्थिनी व पाचवी ते बारावीपर्यंत वन आहेत. शिक्षक शिक्षिकांना बसण्यासाठी वेगळी स्टाफ रुम आहे. प्रवेशद्वारापासून थोड्या अंतरावर मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकाचे कार्यालय आहे. शाळेच्या चहूबाजूस झाडे आहेत. मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेल्या बागेत रंगीबेरंगी फुले असतात. सकाळी शाळेत येताच हिरवीगार हिरवळ आणि रंगी-बेरंगी फुले पाहून मन प्रसन्न होते.
शाळेत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे मैदान आहे. तिथे कबड्डीपासून, क्रिकेटपर्यंत सगळे खेळ मुले खेळतात. विद्यार्थ्यांना खेळांचे विशेष प्रशिक्षणही दिले जाते. खेळांच्या आंतरशालेय स्पर्धांत आमच्या शाळेने अनेक कप, बक्षिसे मिळविली आहेत. सर्व प्रकाराच्या खेळांचे सर्व साहित्य शाळेत आहे. शाळेत एक मोठे सभागृह आहे. तिथे निरनिराळ्या प्रकारचे बुद्धिप्रद व मनोरंजक कार्यक्रम विद्यार्थी सादर करतात.
आमची शाळा सकाळी ८ ते दुपारी 2 वाजेपर्यंत असते. गायत्री मंत्राने प्रार्थनेची सुरवात होते. त्यानंतर मुख्याध्यापक वा अन्य शिक्षक सुविचार व त्याच्याशी संबंधित गोष्ट सांगतात. नंतर वर्ग सुरू होतात. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा केली जाते. शाळेच्या सुरक्षिततेसाठी मुख्य दरवाजावर चौकीदार असतो. जवळच असलेल्या फळ्यावर रोज सुविचार लिहिले जातात. जे विद्यार्थ्यांनी अमलात आणावेत अशी अपेक्षा असते.
आमच्या शाळेत एक ग्रंथालय आहे. ग्रंथालयात वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके येतात. याखेरीज अन्य विषयांवरील पुस्तकेदेखील उपलब्ध आहेत. शाळेतील विद्यार्थी ग्रंथालयाचा भरपूर उपयोग करून घेतात.
आमच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टर येतात. ते आजारी विद्यार्थ्यावर योग्य उपचार करतात. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके दिली जातात. हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिस्तीच्या बाबतीत आमची शाळा खूप कडक आहे.
रोज विद्यार्थ्यांचे गणवेश, नखे केस आदी पाहिले जाते. विद्यार्थ्यांच्या घरी मासिक अहवाल पाठविला जातो. शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. त्यावेळी एखाद्या मान्यवर व्यक्तीला बोलावण्यात येते. खेळांच्या स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. परीक्षेत, खेळात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्यास बक्षिसे दिली जातात. या सर्व वैशिष्ट्यांमुळेच आमची शाळा आदर्श आहे. तिथे आम्ही शिकतो म्हणून आम्हाला तिचा अभिमान आहे.