पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध | essay on jawaharlal nehru in marathi

पंडित जवाहरलाल नेहरू मराठी निबंध | essay on jawaharlal nehru in marathi

 'राजकारणाच्या मंचावर अनेक पात्रे येतात आणि आपले ऐतिहासिक कार्य पार पाडून निवृत्त होतात. आपल्या गुण-कर्तृत्वाच्या योगाने ह्या व्यक्ती जनतेच्या मनात कायमचे घर करून राहतात, असे एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे 'पंडित जवाहरलाल नेहरू' अशा शब्दात आचार्य अत्र्यांनी पंडितजींचे वर्णन केले आहे. 



१४ नोव्हेंबर १९८९ मध्ये अतिशय संपन्न अशा नेहरू कुटुंबात अलाहाबाद येथे हा जवाहरलाल जन्म झाला. त्यांचे शिक्षण घरी, हॅलो विद्यालयात व केंब्रिजच्या 'ट्रिनिटी' कॉलेजमध्ये झाले. नंतर ते बॅरिस्टर होऊन भारतात परत आले.



गांधीजींच्या सहवासामुळे त्यांच्या जीवनाचा प्रवाहच बदलला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले. पत्नीचा सहवास सोडून तुरुंगवास पत्करला. स्वातंत्र्ययुद्धाचे सेनानी बनले, महात्‍मा गांधींचे मित्र बनले. देशासाठी आपल्या ऐश्वर्याचा व संसारसुखाचा त्याग केला.



लाहोर काँग्रेसचे ते पहिले अध्यक्ष बनले. पारतंत्र्याच्या काळात त्यांनी नऊ वेळा तुरुंगवास भोगला. प्रिय पत्नी रुग्णालयात व नेहरू तुरुंगात, अशी अवस्था होती. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते.

नेहरूंनी जरी भारताच्या स्वातंत्र्यासाठी व स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपला देह झिजविला तरी त्यांचे स्वदेशप्रेम संकुचित राष्ट्रीय भावनेचे द्योतक नसून मानवताप्रेमाचा एक भाग होते. 


चाचा नेहरू हे केवळ भारताचे नव्हे तर संपूर्ण जगाला मानवतावाद व शांतीचा संदेश देणारे 'शांतिदूत' होते.

आधुनिक भारताच्या इतिहासात नेहरूंच्या इतकी लोकप्रियता कोणत्याच राजकीय नेत्याला मिळाली नाही. नेहरूंविषयी भारतीय जनतेच्या सर्व थरात आपुलकी होती. समाजातील वरिष्ठ वर्ग,

व गरीब जनता, बुद्धिजीवी वर्ग, सर्वांना नेहरू आपले' वाटत. 


नेहरूंचा सभेवर जादूसारखा परिणाम होई. नवी दिल्लीत राजकीय कार्यकर्त्यांचा एक मोर्चा संसदेवर निदर्शने करीत होता. नेहरूंच्या निषेधाच्या घोषणा फारच तीव्र स्वरात दिल्या जात होत्या. नेहरू निदर्शकांच्या समोर स्मित हास्य करीत हात जोडून उभे राहिले आणि एका क्षणात निदर्शकात एक मोठा बदल झाला. नेहरूंच्या जादुभऱ्या व्यक्तिमत्वाने सगळेजण भारावून गेले. त्यांच्याविषयीचा राग सारेजण विसरले आणि निदर्शक 'जवाहरलाल नेहरू की जय' अशा घोषणा देऊ लागले.



पुष्कळ मंडळींना नेहरूंचे राजकारण आवडत नसे. पण त्यांचा प्रांजळपणा, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, त्यांची बुद्धिमत्ता यांविषयी लोकांना कमालीचं कौतुक होते. सौंदर्याची ओढ असणारे ते कलावंत होते. प्रत्येक तुरुंगवास त्यांनी नवे पुस्तक सिद्ध करण्यात व्यतीत केला. त्या प्रत्येक पुस्तकात त्यांचे विशाल व्यक्तिमत्व व इंग्रजी भाषेवरील अलौकिक प्रभुत्व दिसून येत असे. ते कामाच्या कितीही घाईगर्दीत असोत त्यांच्यातला कलावंत कधीही झोपलेला नसे.



हळवे, उदार आणि स्नेहपूर्ण मन हा त्यांचा स्थायीभाव होता. तरीही निर्भयता आणि शौर्य हे गुण त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात होते. 'भय व द्वेष या दोन वैगुण्यांवर त्यांनी मात केली आहे,' असे उद्गार विन्स्टन चर्चिल यांनी त्यांच्याबद्दल काढले होते.



आपले प्राण संकटात घालताना त्यांना कधी संकोच वाटला नाही. ते कधी घाबरले नाहीत. पंतप्रधान म्हणून आपल्यावर असणाऱ्या प्रचंड जबाबदारीची त्यांना जाणीव होती. नेहरूंना निसर्गाचे वेड होते. बर्फाच्छादित शिखरांचे, झऱ्यांचे, गिरी-शिखरांचे, धबधब्यांचे त्यांना आकर्षण होते. त्यांना फुलाबद्दल प्रेम वाटे. त्यांच्या शेरवानीत लटकवलेला लाल गुलाब त्यांच्या सौंदर्यदृष्टीचे प्रतीक होता, लहान मुलांचे तर ते 'चाचा' होते. पंतप्रधान असताना लोक-कल्याण' व 'राष्ट्रीय विकास' या दोन गोष्टींकडे त्यांनी मोर्चा वळवला. त्यासाठी त्यांनी विज्ञानाची कास धरली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात त्यांनी मानाचं स्थान पटकावलं.



"जगातून युद्ध नाहीसं व्हावं म्हणून जन्मभर युद्ध करणारा हा योद्धा होता.' १९६२ मध्ये, चीनने ('हिंदी चिनी भाई, भाई' असं तोंडानं म्हणत) भारतावर आक्रमण केलं तेव्हा पंडित नेहरूंचे स्वप्न भंगले. चीनने बेसावध नेहरूंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्या जखमेने घायाळ होऊन ते २७ मे १९६४ मध्ये अनंतात विलीन झाले.

रवींद्रनाथ टागोरांनी नेहरूंविषयी असं म्हटलं आहे की, 'त्यांनी केलेलं कार्य मोठे असले तरी नेहरू हा माणूस आणि त्याचे व्यक्तिमत्व त्याहीपेक्षा मोठे आहे.