साने गुरुजी मराठी निबंध | Essay On Sane Guruji In Marathi
सर्व बाजूंनी जडवाद व भोगवाद यांच्या लाटा उसळत असताना, डोळस बुद्धिवादाचा आणि भौतिक शास्त्रांचा प्रकाश झगमगत असताना, २० व्या शतकात भक्ती, श्रद्धा, परोपकार, आत्मसमर्पण, या दैवी गुणांनी संपन्न असा एक आधुनिक संत जन्मास आला- तो म्हणजे सानेगुरुजी!
आजकालची पिढी या गोष्टीवर कदाचित विश्वास ठेवणार नाही. पण निगर्वी स्वभाव, प्रेमळ वाणी आणि अखंड सेवा हे अलौकिक गुण असलेलं ते अद्भुत रसायन होते. यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे झाला. प्राथमिक शिक्षण पालगडला पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी दापोलीला गेले. त्यापुढचे शिक्षण घेण्यासाठी 'औंध' संस्थानात गेले.
शिक्षणासाठी त्यांनी हाल-अपेष्टा सोसल्या. खाच-खळग्यातून, काट्याकुट्यातून, अनवाणी पायाने, धावत-धावत ते विद्याभ्यासाचा मार्ग हसतमुखाने, आनंदाने आक्रमत होते. बी. ए. उत्तम रीतीने पास झाल्यावर फेलोशिप मिळवून त्यांनी एम्. ए. केलं. नंतर प्रताप हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. रात्रंदिवस ते तन, मन, धन ओतून शिकवीत, विद्यार्थ्यांना सांभाळीत, वाढवीत होते. तासाच्या घंटेचे व महिन्याच्या पगाराचे त्यांना भान नसे. गुरुजी विद्यार्थ्यांची 'आई' बनून आजारपणात सेवा करीत. धन्य ते विद्यार्थी, ज्यांना असे गुरुजी लाभले.
१९३० साली नोकरी सोडून ते राष्ट्रीय आंदोलनात सामील झाले. ३२, ३४, ४०, ४३ साली तुरुंगवास पत्करला, पण या तुरुंगवासातच त्यांच्या अनेक पुस्तकांचा जन्म झाला. 'श्यामची आई' नाशिकच्या तुरुंगात जन्मली. सानेगुरुजी नुसते लेखक नव्हते तर शीघ्र लेखक होते. अवघ्या तीन दिवसात त्यांनी तीनशे पानांची कादंबरी निर्माण केली. मातृप्रेमाच्या अमृतधारांनी ती कादंबरी तुडुंब भरली. 'भारतीय संस्कृती', 'कला म्हणजे काय?', 'क्रांतीच्या मार्गावर' ही सर्व पुस्तके त्यांनी तुरुंगातच लिहिली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे कार्य हाती घेतले. ज्या ज्या ठिकाणी अन्याय व्हायचा तेथे ते उपवासाचे आध्यात्मिक शस्त्र उगारीत.
हुतात्म्यांचे पोवाडे गात ते महाराष्ट्रभर हिंडले. १९४३ साली ते भूमिगत झाले. मातृभक्त श्याम क्रांतिदेव झाला! श्रोत्यांच्या डोळ्यातून भावपूर्ण अणूंचा पाझर काढण्यासारखे भावनापूर्ण व प्रभावी वक्तृत्व सानेगुरुजींजवळ होते. त्यांचे भाषण 'रडवे' होते तसे 'कडवे' होते. त्यांच्या साधेपणात सत्याचा आविष्कार होत असे. त्यांनी सुमारे ८० पुस्तके लिहिली. त्यांच्या 'गोड गोष्टी' म्हणजे कुमारांवर उधळलेली सुंदर गुणांची, भावनात्मक रंगाची व संस्कृतीच्या सुवासाची कोमल पुष्पेच. त्यांच्या कवितेतील भावना अंत:करणाला स्पर्श करीत ‘खरा तो एकचि धर्म', 'बलसागर भारत होवो' या गीतात तर शाश्वत मूल्ये भरून राहिली आहेत. हरिजनांना पांडुरंगाचे मंदिर खुले व्हावे म्हणून त्यांनी प्राणांतिक उपोषण केले.
लोकशाही समाजवादाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी 'साधना' हे साप्ताहिक काढले. भारतातील विविध संस्कृतीमध्ये दळण-वळण व्हावे म्हणून आंतरभारतीची स्थापना केली. या हळव्या, संवेदनशील महात्म्याला समाजातील, देशातील कोणत्या गोष्टीने असहय वेदना दिल्या, की ज्यामुळे आयुष्याचा अमृतघट त्यांना स्वत:च्या हाताने फोडावा लागला हे समजत नाही. समाजातील दारिद्रय, अज्ञान, जाचक रुढी यांच्यावर त्यांना रामबाण उपाय सापडत नव्हता का? नक्की असेच काहीतरी असावे.
Nibandh 2
लोकांना खोटं वाटेल असं कितीतरी खरं सानेगुरुजींच्या आयुष्यात आहे. त्यांनी मातीतून माणसं निर्माण केली. माणसातून हुतात्मे निर्माण केले. ते चंदनासारखे झिजले. म्हणूनच त्यांना श्री. मधुकरराव चौधरींनी संस्कारांचा अमृतकुंभ' म्हटले.
करुणा, प्रेम, मांगल्य, सद्भाव, मातृभाव यांची साकार मूर्ती म्हणजे सानेगुरुजी !
एरव्ही संकोची, मृदुभाष, सात्त्विक वाटणारे गुरुजी जेव्हा व्यासपीठावर भाषणे करीत, तेव्हा त्यांचा आवेश वेगळाच असे. येथून तेथून सारा पेटू दे देश' हे त्यांचेच काव्य त्यांच्या बोलण्यात प्रत्ययाला येई.
पंढरपूरच्या देवळात हरिजनांना प्रवेश मिळावा, यास्तव त्यांनी उपोषण केले; तेव्हा त्यांना पूज्य असणारी मंडळी उपोषणाच्या विरोधात होती; पण गुरुजींनी ते मानले नाही. झोकून देण्याची त्यांची वृत्ती होती. आचार्य अत्र्यांनी गुरुजींना 'मृत्युचे चुंबन घेणारा महाकवी' म्हटलं होतं. तुलसीदास, मीरा, कबीर व तुकारामांच्या रक्तात जे काव्य होते, तेच गुरुजींच्या पिंडात होते. मानवतेवर त्यांनी मातेप्रमाणे प्रेम केलं.
समाजातील सुशिक्षित, सुसंस्कृत आणि प्रौढ माणसापेक्षा निरक्षर, उपेक्षित नि बहिष्कृत लोकांबद्दल त्यांना अधिक प्रेम व आस्था होती. अनाथ, अपंग, दरिद्री व भुकेल्यांना मदत करावी, असे त्यांना नेहमी वाटे.
प्रतिकूल काळात शहाणे करणाऱ्यांपेक्षा स्वप्नांची जादू करून तरुणांना वेड लावणाऱ्यांची गरज अधिक असते. गुरुजींनी आपल्या वाणीने, लेखणीने तरुण मनांवर अशी जादू केली होती. त्यामुळे आदर्श स्वप्नांनी झपाटलेली पिढी निर्माण झाली; जे त्या काळात गरजेचं होतं.
‘पत्री'मधील त्यांची कविता तत्कालीन स्वातंत्र्याचा अर्थ उलगडणारी धगधगती कविता होती. म्हणून यदुनाथ थत्ते यांच्या मते, गुरुजी हे 'खरा धर्म' (जगाला प्रेम अर्पण्याचा) सांगणारे अजरामर कवी होते. ते सामान्यांच्या सुख-दु:खांशी समरस होत. कारण दारिद्याचे दशावतार सानेगुरुजींनी केवळ पाहिले- ऐकले नव्हते, तर भोगलेही होते.
भारतीय संस्कृती' या पुस्तकात गुरुजींनी आदर्श आणि वास्तवातला फरक परिणामकारीत्या मांडला आहे. गुरुजी गेल्यावर पू. विनोबांनी म्हटलं होतं. 'माझ्याहून ते शरीराने मजबूत आणि वयाने लहान होते; पण त्यांनी केवढी प्रचंड कामगिरी केली ! महाराष्ट्रातली सबंध तरुण पिढी आपल्या विचारांनी त्यांनी भारून टाकली.
त्यांचा पिंड राजकारणी नसूनही गरिबांच्या तळमळीने त्यांना राजकारणात पडावे, बोलावे, लिहावे लागले. म्हणूनच ते समाजवादी बनले. खरेतर ते 'समाजसेवी' होते. त्यांनी 'पत्री', 'श्यामची आई', 'भारतीय संकृती', 'धडपडणारी मुले', 'गोडगोष्टी', 'सुंदर पत्रे', 'विश्राम'... अशी शंभरावर पुस्तकं लिहून आमच्यावर अनंत उपकारच केले आहेत.
आजही त्यामुळे ‘धडपडणारी मुले' देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झटत आहेत. आज संस्काराचा सर्वत्र अभाव प्रकर्षाने जाणवतोय. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक संस्कारक्षम मनाच्या घडवणुकीत 'श्यामची आई'सारखं त्याग नि प्रेमाची शिकवण देणारं साहित्य आघाडीवर आहे. आज शाळांमधून 'मूल्यशिक्षणा'ची सुरुवात नव्यानं झाली आहे. त्याला पूरक - पुरवणी वाचनास या पुस्तकाचं मूल्य थोर आहे. संयम, सदाचार, सुविचार यांचं बाळकडू, कर्मकुशलता, त्यातील आनंद, मुलाला जाणीवपूर्वक वळण देण्याचा प्रयत्न, कर्तव्यपरायणता, निर्भयता, गरिबी, अन्याय, अत्याचार, अमंगलाशी झुंजण्याचं सामर्थ्य यांचा पुरस्कार गुरुजींनी आजन्म केला. त्याचं प्रतिबिंब हे साहित्य. गुरुजींनी प्रेमधर्माला विश्वकल्याणाचा धर्म मानलं.
गुरुजींच्या भव्य कार्याला कितीतरी आयाम लाभले होते. साहित्यिक, कार्यकर्ता, शिक्षक, कुटुंबघटक, समाजवादी राजकारणी तसेच आंतरभारती'चा ध्यास घेणारा एक विश्वमानव अशा कितीतरी गोष्टींमुळे गुरुजी केवळ जन्मशताब्दि वर्षातच नव्हे, तर पुढेही वर्षानुवर्षे लोकांच्या स्मरणात अमर राहतील. त्यांचे केवळ 'स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई, सुखवू प्रियतम भारतमाई' असा प्रभातफेरीतला घोष देण्यापुरते कार्य नव्हते, तर स्वातंत्र्यलढ्यात अनेकदा सहभागी होऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.
मुंबईच्या शिवाजी पार्कवर सेवादलाची जी पहिली जाहीर सभा झाली होती, त्यातील गुरुजींच्या ओजस्वी भाषणानं अनेकांना प्रेरणा मिळाली. परळच्या कामगार मैदानावरील गुरुजींच्या तेजस्वी भाषणाने कितीतरी कामगारांना जागृत केलं. गुरुजी कोकणातल्या पालगडला जन्मले, खानदेशवर भाळले. असे हे विचित्र, अजबच रसायन आहे ! 'दुरितांचे तिमिर जावो!' असं ज्ञानेश्वरानंतर मनापासून इच्छिणारा महामानव म्हणजे सानेगुरुजीच! ‘बलसागर भारत होवो' असं चिंतणारा द्रष्टाही तेच. स्वातंत्र्याबरोबर समतेचा, उच्चार आणि पुरस्कार गुरुजींनी केला. जीवनाचा सर्वांगांनी सम्यक् विचार केला.
“मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान-विज्ञानसंपन्न नि कलामय व्हावा, सामर्थ्यसंपन्न नि प्रेममय व्हावा, हीच एक मला तळमळ आहे," असं स्वत:च गुरुजींनी म्हटलं आहे. ज्ञानदेवांच्या 'पसायदानात तरी काय वेगळं आहे. म्हणून ज्ञानदेव, तुकारामादि संत, सत्य, शिव, सुंदरता यांची आठवण करून देणारं हे व्यक्तिमत्त्व, सच्चा गांधीवादी बनून जे महान कार्य करून गेलं, त्याची थोरवी मोजायला सारीच मापे थिटी ! गुरुजींचं थोरपण असं थोर आहे.
केवळ दुसऱ्याचाच विचार करणारं... स्वत:ला विसरून सेवाभाव करणारं... अमळनेरच्या प्रताप विद्यालयात शिक्षक असताना गुरुजी छात्रालयात राहत. तेथेच 'छात्रालय' हे हस्तलिखित त्यांनी सुरू केलं. मराठी भाषा संपन्न व्हावी, ही त्यांची मनोमन इच्छा ! तसेच मुक्या प्राण्याला मारू नये, ही शिकवण तडवी नावाच्या विद्यार्थ्याने गुरुजींना बसण्यास मृगाजिन दिले, त्यावेळी दिली.
शिक्षकाने केवळ ‘पुस्तके शिकवणे' एवढेच काम न करता, विद्यार्थ्यांना जीवनदृष्टीही द्यावी, ही शिकवण खादीचे कपडे आणि मामलेदार' या प्रकरणात त्यांनी दिल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. 'तुरुंगातून सुटल्यावर काय करणार?' या नानासाहेबच्या प्रश्नाला त्यांनी जे उत्तर दिलं, त्यातही बोध आहेच. गुरुजी उत्तरले, “मी प्रेमधर्माचा प्रचार करेन. सर्वांना प्रेम द्यावे, सर्वांना सुख मिळावे, श्रमणाऱ्यांची मान उंच व्हावी, असे मला सदैव वाटते.”
१ मे १९४७ रोजी पंढरपूरचे विट्ठलमंदिर दलितांना खुले व्हावे, म्हणून गुरुजींनी उपोषण आरंभले. काही दिवसांनी मंदिरप्रवेशाचा कायदा होणार आहे, उपोषण मागे घ्या' असे महात्मा गांधींनी सांगितल्यावरही गुरुजींचं उपोषण सुरू होतं. त्यांनी गांधीजींना कळवलं, “काही क्षण हे असे असतात की, सारे जग जरी विरुद्ध झाले, तरी आपण अचल रहावे (ही तुमचीच शिकवण). 'माणूस म्हणून प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि त्यासाठी पक्का निर्धार हवा' ही शिकवण यात अभिप्रेत नाही का?"
'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' अशी क्रांतीची समानतेची शिकवणूक देणारे गुरुजी एक 'संत'पुरुष होते. या संदेशाबरोबरच भारतात सदैव शांतता नांदावी, म्हणून 'आंतरभारती'ची संकल्पना मांडली. त्यातील शिकवण पुढीलप्रमाणे आहे.
"प्रांतांचा परस्परांशी आणि भारताशी प्राणमय संबंध म्हणजे आंतरभारती. भारतीय माणसाने जात, धर्म, पंथ, प्रांत यासारख्या संकुचित भावनांत गुंतून पडू नये. आपले कुटुंब हे कोट्यवधींचे कुटुंब आहे. प्रांतांच्या सीमांचे भाग हे नद्यांच्या संगमाप्रमाणे तीर्थक्षेत्रे मानली जावीत. प्रत्येकाने तीन-चार भाषा शिकाव्यात. भाषाभगिनी आणि संस्कृतीचा सुरेख संगम व्हावा, भारतीय माणूस अंतर्बाह्य भारतीय असावा."
'केवळ तत्त्वज्ञान सांगून भागणार नाही, तर त्याप्रमाणे स्वत: कृती केली पाहिजे,' ही शिकवण गुरुजींनी स्ववर्तनानेच सिद्ध केली. शिवाय, त्याचवेळी विद्यार्थ्यांमध्ये 'देशाचा संसार आहे शिरावर, असे थोडे तरी वाटू द्या हो' हेही बिंबवलं.
'सोन्या मारुती' या पुस्तकात 'खरा देव तेथे आहे की, जेथे शेतकरी जमीन नांगरीत आहे व पाथरवट दगड फोडीत आहे,' असे विश्वरूप दर्शन गुरुजींनी श्रमनिष्ठेबद्दल घडविले आहे.
आपल्या कवितांमधून "गांजलेल्यांना- विकलांगांना हसवून त्यांच्या जीवनात प्रेमाचा आनंद द्या, देशप्रेम आणि देशासाठी सर्वस्व अर्पण करा, देशभक्तीचा दिव्य सोम पिऊन प्राणांचा होम करा, समानेची आणि स्वातंत्र्याची दिव्य पताका फडकत ठेवा, परकीय वा स्वकीय जुलमाला चूड लावा, सर्वांभूति प्रेम, करुणा
आणि वात्सल्याने वागा..."या आणि अशा अनेकविध मानवतावादी, राष्ट्रवादी शिकवणीचा स्रोत वाहतच राहतो.
पत्रावळीच्या घटनेवरून जे जे करीन, ते उत्कृष्ट करीन; असे माणसाचे ध्येय असावे, पत्रावळ लावणे असो वा ग्रंथ लावणे असो, शेला लावणे असो वा शेला विणणे असो !' अशी गुरुजींची धारणा होती.
प्रेमपूर्वक त्यागात अवर्णनीय आनंद असतो, या शिकवणीबरोबरच सानेगुरुजी सांगत, “प्रेम, ज्ञान, बळ या तीनही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत, त्याला जगात कृतार्थ होता येईल. प्रेमहीन ज्ञान व्यर्थ, ज्ञानहीन प्रेम फुकट, प्रेमज्ञानहीन शक्ती वाया, तर शक्तिहीन प्रेमज्ञानही फुकट आहे."
प्रेम, समानता, स्वातंत्र्य या शिकवणुकीवर उभारलेल्या आपल्या भारतीय घटनेचीच ‘सानेगुरुजी' जशीच्या तशी स्वदेशी प्रतिकृती नाही का? गुरुजींच्या शिकवणुकीत त्यांची थोरवी लपलेली आहे, असं तुम्हाला नाही का वाटत?
पूज्य सानेगुरुजींची थोरवी गायला एवढे समर्थ शब्द कोठून आणायचे? सूर्याचं गुणगान काजव्यानं कसं करावं? त्यांच्याबद्दलच्या आदरापोटी कृतार्थ वाटून डोळे भरून येतात.