गोपाळ गणेश आगरकर मराठी निबंध | gopal ganesh agarkar marathi nibandh
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गोपाळ गणेश आगरकर मराठी निबंध बघणार आहोत. गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म १८५६ मध्ये सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला, त्यांचे आजोळ क-हाड येथे होते. पांचवीस पूजलेल्या गरिबीशी टक्कर देत देत त्यांनी क-हाड येथे इंग्रजी तिसरीपर्यंत शिक्षण पूर्ण केले व तेराव्या वर्षी त्यांना नोकरी धरावी लागली. परंतु विद्याप्रेमी गोपाळ नोकरीत रमू शकला नाही. रत्नागिरी, पुणे, अकोला येथे वणवण करत हालअपेष्टा सोसत त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
पुढील महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पूर्ण केले. शिष्यवृत्ती, स्वावलंबन यांच्या साहाय्याने ते पदवीधर झाले. तरीही विद्येच्या जोरावर पैसा मिळविण्याची इच्छा त्यांना झाली नाही. 'विशेष संपत्तीची हाव न धरता, मी फक्त पोटापुरत्या पैशावर संतोष मानून, सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार,' असा आपला निश्चय गरीबीत आकंठ रुतून बसलेल्या, व मुलाकडे आशेने डोळे लावून बसलेल्या आईला त्यांनी कळवून टाकला.
त्यांच्यासारख्याच प्रवृत्तीचे लो. टिळक, चिपळूणकर हे सहकारी त्यांना भेटले व १ जानेवारी १८८० साली 'न्यू इंग्लिश स्कूल'सारख्या राष्ट्रीय शिक्षणसंस्थेची स्थापना झाली. १८८५ साली फर्ग्युसन कॉलेज निघाले व आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य झाले. या प्राचार्यांच्या जवळ मृत्युसमयी २० रु. पुडी करून उशीखाली ठेवलेले मिळाले. सर्व आयुष्यभराची मिळकत होती ती! मृत्यूनंतरचे संस्कार करण्यासाठी ठेवलेली !
आगरकर सुरुवातीला केसरीचे संपादक होते. नंतर त्यांनी स्वत:चे 'सुधारक' वर्तमानपत्र काढले. टिळकांना राजकीय स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटले, तर आपल्या समाजातील दुष्ट रुढी व वेडगळ कल्पना नष्ट करण्याकरता आगरकरांनी सामाजिक सुधारणेचा प्रश्न हातात घेतला.
लोकमतातील दोष-स्थळे दाखविण्याचे, अप्रिय परंतु पथ्यकारक विचार मांडण्याचे कठीण व्रत आगरकरांनी स्वीकारले. स्त्री-शिक्षण, प्रौढविवाह, अस्पृश्यता निवारण वगैरे सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. आगरकरांचे सर्व जीवन म्हणजे एक उदात्त संघर्ष होता.
लहानपणी गरिबीशी, तरुणपणी सहकाऱ्यांशी, समाजातील अनिष्ट रुढींशी ते झगडत होते व शरीर दम्याशी झगडत होते. शेवटी शरीर थकले व १७ जून १८९५ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज स्त्रिया सर्व क्षेत्रात मुक्तपणे संचार करत आहेत. परंतु त्यांच्या मुक्तीसाठी आयुष्यभर सरळ व कोमल हृदयाचा महात्मा झुंजला होता, याची त्यांना जाणीव आहे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता .पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2