वाचाल तर वाचाल निबंध मराठी | marathi essay on vachal tar vachal
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचाल तर वाचाल मराठी निबंध बघणार आहोत.
"वाचाल तर वाचाल अन्यथा आयुष्य खचवाल"
आज जीवन गतिमान झाले. कामे खूप झाली आणि वेळ कमी पडतो या सबबीखाली बरेच लोक साहित्याला पारखे झाले. वाचायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्यांच्या कडे वेळ आहे असे लोक सुध्दा वाचत नाहीत. वाचनाचा कंटाळा येतो म्हणून बरेच लोक वाचत नाहीत. पुस्तके ज्ञानरंजक असतात. परंतु ज्ञान व मनोरंजन करण्यासाठी पुस्तकाला पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे टि.व्ही., मोबाईल, इंटरनेटसह संगणक, चित्रपट गृह, पंच तारांकित होटल, पब्स, विविध क्लब्स इत्यादी. पुस्तकांची जागा वरील माध्यमांनी घेतली. त्यामुळे 'हल्ली वाचन संस्कृती उरली नाही' असे सर्वत्र ऐकायला येते.
वाचनालयापेक्षा थियेटर किंवा इंटरनेट कॅफे वर गर्दी असते. विद्यार्थ्यांना अभ्यासापेक्षा टी.व्ही. वरील कार्टून शो किंवा रियालिटी शो चे आकर्षण वाटते. ऐन परिक्षेच्या काळात टी.व्ही. वर क्रिकेटच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण असते. अशा वेळेस विद्यार्थी तासनतास टी.व्ही. समोर बसून असतो. असे करुन तो स्वत:चेच नुकसान करीत असतो परंतु त्याला हे कळत नाही.
खरे तर परीक्षेच्या काळात टी.व्ही.वरील क्रिकेट सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी असायला हवी. तसे संसदेत विधेयक पारित करायला हवे. परंतु आमच्या देशाचं दुर्दैव की आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी संसदेत विधेयकावर चर्चा करण्याऐवजी सभागृहाला दांडी मारतात व टी.व्ही. समोर बसून क्रिकेटचे सामने बघतात. हे प्रतिनिधी आपापल्या कामात एवढे व्यस्त असतात की संसदेत पारित झालेल्या विधेयकात काय लिहलेले आहे हे त्यांना क्वचितच माहित असते. विधेयक जनतेच्या हिताचे आहे किंवा नाही हे वाचायची त्यांची तयारी नसते, लोकशाहीची किती क्रूर थट्टा! अशा वृत्तीमुळे बरेचदा सामान्य जनतेचा विचार न झालेली विधेयके पास होतात. हा दुष्परिणाम आहे न वाचण्याचा.
वाचनाची आवड असेल तर लिहलेल्या मजकुराचा अर्थ समजतो अन्यथा पोपटपंची' होते. कारण वाचणे व अर्थ समजून वाचणे यात फार मोठा फरक आहे. अर्थ समजून न वाचल्याने अनेक अनर्थ होतात. हा सुध्दा न वाचनाचाच दुष्परिणाम आहे. बरेचदा आम्ही महत्त्वाची दस्तऐवज न वाचता त्यावर सही करत असतो. त्यामुळे बरेच धूर्त लोक याचा गैरफायदा घेतात व वेळप्रसंगी आमची फसगत होते.
वाचनाची आवड कमी झाल्यामुळे लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत अनुत्तीर्ण होतात. पर्यायाने त्यांना वैफल्य येते आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा फार कठीण असतात असा त्यांचा समज होतो. परंतु जर का आमचे ‘वाचन' हे अर्थ समजून असेल तर स्पर्धा परीक्षा कठीण वाटणार नाहीत.
वाचनाने विचार समृद्ध होतात, विचारशक्ती, कल्पनाशक्ती वाढते. मनुष्य चिंतनशील बनतो. पुढे तो स्वत:चे विचार मांडायला लागतो. त्याचे विचार तर्कसंगत असल्यास इतरांना त्याचा फायदा होतो. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होत. त्यांनी प्रचंड वाचन केले, चिंतन केले, मनन केले आज त्यांच्या तर्कसंगत विचारांचा संपूर्ण जगाला फायदा होत आहे.
वाचनाने मनुष्य ज्ञानी होतो. ते ज्ञान म्हणजे मूल्यवान संपत्तीच होय. संत तुकाराम महाराज म्हणतात, “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने”. अर्थात ग्रंथरुपी ज्ञानाला ते संपत्ती समजतात. ह्या संपत्तीची बरोबरी सोने, रुपे, किंवा हिऱ्यांनी होत नाही. म्हणून आम्ही वाचन केले पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद (हिंदी निबंध येथे वाचा )
निबंध 2
अध्ययन-अध्यापनामध्ये वाचनाला फार महत्त्व आहे. पाठ्य-पुस्तकांव्यतिरिक्त अनेक पुस्तके मुलांनी वाचली पाहिजेत. अगदी लहान वयापासूनच वाचनाची गोडी लागली पाहिजे. वाचनाची गोडी लागली, तर लहान वयातच उत्तम साहित्याची ओळख होऊन विविध विषयांचे ज्ञान समृद्ध होईल आणि आकलनशक्तीचा विकास होईल. मन व बुद्धी यांची मशागत करण्याचे सामर्थ्य वाचनाइतके कशातच नाही.
२१ व्या शतकाची आव्हाने पेलत असताना वाचन-संस्कृतीची पीछेहाट घातक ठरते. आपल्या देशात साहित्य विपुल आहे. विषयांची विविधता आहे. एवढे ज्ञानभांडार खुले असताना उदासीनता का? विद्यार्थी सध्या पाठ्यपुस्तके वाचण्याचाही कंटाळा करतात. त्यामुळे आकलनशक्ती वाढत नाही; तर शब्दसंपत्तीचा अभाव, कल्पनाशक्तीचा अभाव, विचारशक्तीचा अभाव जाणवतो. पुस्तके का वाचायची, हे समजून घेण्याची गरज आहे.
पुस्तके नव्या जगाचे, नव्या विचारांचे दरवाजे उघडतात. पुस्तके वाचल्याने सभोवतालच्या संकुचित जगापलीकडचे जग, संस्कृती समजते. त्यामुळे ज्ञानसमृद्धीच होते. प्रसंग, कथा वाचल्याने कल्पनेला व बुद्धीला खाद्य मिळते. पुन्हा-पुन्हा वाचताना त्याच घटनांकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येते. प्रत्येक वेळी त्यात नवा अर्थ सापडू शकतो. त्यातून मिळणारा आनंद सृजनशील असतो.
आपल्या भोवतीचे जग बघा कसे विविधतेने नटलेले आहे ! राष्ट्राचा उज्ज्वल इतिहास आहे, परंपरा आहेत, थोरा-मोठ्यांची चरित्रे आहेत. विज्ञानाची नवनवीन माहिती, विविध शोध, नवनवीन तंत्रे व उपकरणे या सगळ्याची माहिती देणारी पुस्तके आहेत. त्यातून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील ना? मग अशी पुस्तके वाचलीच पाहिजेत.
आपल्याला चांगला माणूस व्हायचे असेल, तर सभोवतालच्या जगाचे भान असणे गरजेचे आहे. स्वत:ला व इतरांना जाणून घेण्यासाठी विविध विषयांचे वाचन आवश्यकच आहे. आज संगणकापासून पाककलेपर्यंत सर्वच विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत. ही पुस्तके तुमची गुरू बनतील. ऐतिहासिक पुस्तके तुम्हाला भूतकाळात घेऊन जातील. आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व, पराक्रम समजेल. जगाशी ओळख होईल. कथा-कादंबऱ्यांतून समाजदर्शन होईल. व्यवसाय मार्गदर्शन होण्यासाठीही पुस्तके आहेत.
वर्तमानपत्रे वाचल्याने जगातील घडामोडी समजतील आणि समाज, देश, जग कोठे चालले आहे, याची माहिती मिळेल. अग्रलेख वाचा, ते विचारांना खाद्य पुरवतील. दिवाळी अंकांमधूनही विविध विषयांची ओळख होईल. काही पुस्तके संग्रही ठेवा. सारस्वत-सागर उसळलेला आहे. निदान त्यातून एखादी तरी घागर भरून घ्या. आज काळाबरोबर प्रगति पथावर जायचे असेल, तर वाचनाला पर्याय नाही. वाचाल, तरच वाचाल!