माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध | maza avadata rutu pavsala nibandh in marathi

 माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध | maza avadata rutu pavsala nibandh in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता ऋतू पावसाळा मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये पावसाळ्यामध्ये होणाऱ्या मनमोहक गोष्टी कशाप्रकारे मनाला प्रसन्न करतात.पावसाळा का आवश्यक आहे हे सांगितले आहे. पावसाळ्याची आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला.   

  


उन्हाळ्याच्या त्रासाने सर्व धरती कंटाळून गेलेली असते. उष्णतेने सर्वांगाची लाही होत असते. अन् अशा वेळी 'पावसाच्या धारा। येती सरासरा। झाकळले नभ। सोसाट्याचा वारा॥' अशा त-हेने वर्षाराणीचे आगमन होते अन् होरपळलेल्या मनावर शीतल, थंडगार झुळूक फुकर घालते.



तप्त निसर्ग पावसाने न्हाऊन निघतो अन टवटवीत होतो. आसुसलेली मने, पक्षी, झाडे माडे साऱ्यांवर आनंदाची बरसात होते. मेघांचे गर्जन, मुसळधार पाऊस सर्व वातावरणास लपेटून राहणारा गारवा या साऱ्याच गोष्टी मला खूप आवडतात. अन् म्हणूनच माझा आवडता ऋतू आहे वर्षाऋतू म्हणजेच पावसाळा !



पावसाळा चालू झाला की सारे वातावरणच बदलून जाते. नद्या दुथडी भरून वाह लागतात. सारीकडे हिरवीगार राने दिसू लागतात. गवताच्या हिरव्या लाटा वाऱ्यावर डोलू लागतात. त्यातील रंगीबेरंगी रानफुले मनाला मोहवून टाकतात. सारी सृष्टी जणू हिरवा शालू नेसून सजते. चराचर चैतन्याने न्हाऊन निघते.


कवी बा. भ. बोरकर लिहितात - 'गडद निळे गडद निळे जलद भरून आले'.

बालकवी फार सुंदर वर्णन करतात - 'हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे'



पावसाळ्याने एक उसळता उत्साह व चैतन्य साऱ्या माणसामध्ये भरून जाते. "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे ॥" असे यर्थाथ वर्णन बालकवींनी आपल्या कवितेत केले आहे. या दिवसांत आकाशात इंद्रधनूचा मनमोहक गोफ विणलेला पाहायला मिळतो.



गावाबाहेरचे डोंगर पाचूचे वैभव मिरवीत असतात. त्यातच मधून मधून धबधबे कोसळताना दिसतात. जणू मोत्यांच्या माळांनी डोंगररांगांनी शृंगार केलेला असतो. या पावसात नखशिखांत भिजणे हा माझा अत्यंत आनंदाचा ठेवा असतो. पावसाच्या धारा अंगावर झेलीत, पावसाच्या हातात हात घालून मुक्तपणे भिजावे, भटकावे म्हणजे खरे पाऊस उपभोगणे होय. पावसाचा आनंद मनसोक्त लुटणे याला पर्याय नाही.माझा आनंद ओसंडून जातो. या आनंदाने पुलकित होण्याची मी साऱ्या वर्षभर वाट पाहत असतो.



हा पावसाळा शेतकऱ्यांना तर अत्यंत आवश्यकच असतो. त्याच्या कृपेनेच शेते पिकणार असतात, धान्य तयार होणार असते. तेव्हा शेतकऱ्यांचा तर वर्षाऋतू अतिशयच प्रिय असतो. या ऋतूत निसर्ग रंग, रूप, गंध यांची आरास मांडतो. निसर्गाच्या अंगप्रत्यांगातून, वृक्षलतांमधून, पानाफुलांतून चैतन्य प्रत्ययास येते. साऱ्या सृष्टीला हा ऋतू वैभवाचे लेणे बहाल करतो.







धरित्रीमाताही पावसाळ्याच्या आगमनाने आनंदाने पुलकित होते. शेतातल्या तुऱ्यांना श्रावणातील सोनेरी ऊन नव्याने तजेला देते. आसमंतात हिरव्या रंगाच्या असंख्य छटा अनुभवायला मिळतात. वर्षाऋतू सर्वांच्या मनात आनंदाची हिरवळ फुलवतो.



माणसाची मरगळलेली उमेद त्याला पुन: प्राप्त करून देतो. सृष्टीत नवे चैतन्य पसरते, पिके बहरतात. अशा त-हेने वर्षाऋतू हा जीवनदायी ऋतू आहे. सदानंद रेगे वर्णन करतात - 'आता मेल्या मरणाला किती पालवी फुटेल.' पावसाळा हा सृजनशीलतेचा संहारावरील विजय असतो. आनंद व सौंदर्य यांचा एक सुंदर मिलाफ या ऋतूत आपल्याला अनुभवायला मिळतो. त्यामुळेच हा ऋतू माझा अत्यंत आवडता आहे, यात नवल ते काय!!


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


मराठी निबंध 2

माझा आवडता ऋतू पावसाळा



वसंत, ग्रीष्म , वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर असे सहा ऋतूंचे चक्र अविरत फिरत असते. ग्रीष्मातलं तापदायक, वैतागलेलं वातावरण वर्षाऋतूच्या शीतल जललहरींनी सुखावतं. म्हणून मला सुखविणारा वर्षाऋतू खूप खूप आवडतो. माझे शब्द फेर धरू लागतात


वर्षाराणी येते जणू अमृतकुंभ बरोबर घेऊनच! निराशा, मरगळ पार नाहीशी होते. प्रसन्नता व आनंद यांचा मिलाफ होतो. वर्षाराणी म्हणजे अमृतसंजीवनीच. समृद्धीचा सुगंध बहरतो, रोम रोम सृष्टीचा पुलकित होतो, 


पावसाच्या सरी आल्या की सृष्टी तृप्त होते, हिरवीगार धरती, आसमंतातले सिंदुरी रंग, झाडे, ओल्या मातीचा ओला कस्तुरी सुगंध, आनंदाने बागडणारी जनावरे, चहकणारे पक्षी, चमकणाऱ्या विजा , गडगडणारे ढग, नाचणारे मयूर , डोलणारी फुले , तुडुंब भरून वाहणारे ओहोळ, अवखळ नद्या, नाचणारी मुले,कागदांच्या होड्या , रंगबिरंगी छत्र्या, वादळावाऱ्यात नाचणारं सारं जग.....सारंच कसं जादूच्या नगरीतलं वातावरण. आकाशातले अमृतबिंदू पिऊन धरती ताजीतवानी होते. 'सुजलाम सुफलाम्' होते. 


पावसाळा सृष्टीचे वरदान आहे. तो  सजीवांची गंगोत्री आहे. वसंताचा साजशृंगार करायला तो येते. असं घडलं नाही तर, पाऊस पडला नाही तर, दुष्काळाची भीषणता आपल्याला गिळू लागते . भारत कृषीप्रधान देश आहे. शेती, जंगले , पशु-पक्षी, मानव सर्वांनाच पाऊस हवा . 


पाऊस बेताचा हवा. पावसाळ्याचे उग्र रूप, प्रंचड पूरही नको. पण पुरेसा पाऊस हवाच. जल जीवन आहे. दिवसेंदिवस सृष्टीवरील तापमान वाढते आहे. पाऊस कमी होऊन पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जीवनाच्या समृद्धीचा व सुखाचा नजराणा हा ऋतू आपल्याला देतो. आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे. 

पावसाळ्याची चाहूल होताच शेतकऱ्याचे डोळे , साहित्यिकाची लेखणी , चित्रकाराची कुंचला जागी होतो. निर्झराची झुळझुळ सुरू होते. गुराख्याचा मंजूळ पावा बोलू लागतो. सागराची गर्जना जोर करते. विहंगाचे कूजन मनाला भुरळ घालते, पर्जन्यसरींचा पदन्यास चालू होती. सृष्टी नाचू लागते.

“आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे...."

या बालकवींच्या ओळी गुणगुणत या रेशमी ऋतूची रेशमजादू मी अनुभवत असतो. कधी रिमझिम तर कधी धो-धो पाऊस, लख्ख विजा, काळेभोर ढग यात निसर्ग . जाऊन दडतो. खरच निसर्गाचा चमत्कार अनोखा आहे. तेज , उदात्तता व सुंदरता या त्रिवेणी संगमाने नटलेला पावसाळा जीवनात चैतन्याचे असंख्य फुलोरे फुलवून जातो हेच खरे!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद