माझा आवडता खेळाडू निबंध मराठी मध्ये | maza avadta kheladu marathi nibandh
भारतातील लोकप्रिय क्रिकेटवीरांची नावे घेताना सुनील गावसकर हे नाव घेणे अपरिहार्यच आहे. अगदी लहान वयात, अगदी थोड्या काळात लोकप्रियता मिळविण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येते.. सुनील गावसकर हा त्यांपैकी एक भाग्यवान! आज सर्व खेळात क्रिकेट हा खेळ अतिशय लोकप्रिय आहे. या खेळात इंग्लंडवर मात करून आल्यावर भारतीय संघ सर्वात लोकप्रिय बनला आणि सुनिल गावसकर याला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
क्रिकेट हा सुनीलचा अगदी लहानपणापासूनचा आवडता खेळ. अगदी लहान असताना तो आपल्या वडिलांबरोबर क्रिकेटचा खेळ पाहावयास जात असे. तेव्हा चेंडू पकडण्यासाठी, बॉल टाकण्यासाठी त्याची धडपड चाले. सुनीलचे मामा माधव मंत्री यांच्याकडून त्याला शालेय जीवनातच या खेळाबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाले, त्यामुळे त्याचा खेळ अतिशय शास्त्रशुद्ध बनला. त्याने आपल्या खेळाने आपल्या शाळेला, महाविद्यालयाला अनेक विजय मिळवून दिले.
सुरुवातीला 'रणजी' सामने खेळून नंतर सुनीलने कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला. चिकाटी व एकाग्रतेच्या जोरावर त्याने या खेळावर आपले लक्ष केंद्रित केले. १९७१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात भाग घेतला आणि ७०० पेक्षा अधिक धावा काढल्या.
भारताच्या क्रिकेट संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजाची उणीव असे. उंचीने कमी पण बळकट शरीरयष्टी असलेल्या सुनीलने ही उणीव भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याचे नाव अतिशय गाजले. शतके आणि द्विशतके रचून त्याने सोबर्सच्या संघास सळो की पळो करून सोडले. त्यामुळे इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर त्याला पाहायला अतिशय गर्दी झाली होती.
जोशात गोलंदाजी करणारा इंग्लंडचा स्नो व न घाबरता आत्मविश्वासाने त्याला तोंड देऊन खेळणारा सुनील गावसकर यांचा खेळ पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सुनीलचा खेळ पाहून जुन्या क्रिकेटप्रेमींना विजय मर्चट यांच्या खेळाची आठवण झाली.
सुनीलच्या या खेळाचे चीज झाले. विश्वसंघात त्याची निवड झाली. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुराही त्याने अनेकदा समर्थपणे सांभाळली आहे. आणि भारताला अनेक विजय मिळवून दिले आहेत. एक श्रेष्ठ फलंदाज म्हणून त्याचे नाव जगात मशहूर झाले आहे. संयम, चिकाटी आणि एकाग्रतेच्या जोरावर या फलंदाजाने नेहमीच शास्त्रशुद्ध खेळ केला.
इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझिलंड, ऑस्ट्रेलिया वगैरे अनेक देशांतील खेळाडूंशी गावसकर खेळलेला आहे. आतापर्यंत त्याने १२५ कसोटी सामन्यांतून फलंदाजी केली आहे. त्याची या सर्व सामन्यांमधील धावसंख्या आहे १०१२२ एवढी!
एवढी विलक्षण कामगिरी करणाऱ्या या खेळाडूने अनेक मानसन्मान मिळविले, भारतीय संघाला मिळवून दिले. पण योग्य वेळ येताच थांबायचाही, खेळातून निवृत्त होण्याचाही निर्णय १९८७ साली घेतला. हे पाहिले की पटते हा खेळाडू कर्तृत्वाने जितका मोठा तेवढाच मनानेही मोठा आहे.
मुळात क्रिकेट हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा आवडता खेळ होय. त्यातही सुनील गावसकरसारखे खेळाडू जेव्हा खेळत, तेव्हा भारतीयांनी जो आनंद लुटला, त्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. असा हा सर्वांचा लाडका सुनील गावसकर माझाही आवडता खेळाडू आहे.
निबंध मराठी 2
माझा आवडता खेळाडू-सुनील गावस्कर! 'भारतीय किक्रेट जगतातील एक चमकता तारा', असे ज्याचे वर्णन करता येईल. असा खेळाडू म्हणजे सुनील गावस्कर. सुनीलची उंची कमी होती; पण त्याने आपल्या खेळातील कौशल्याने खेळाला मात्र खूप उंचीवर नेले. अगदी कमी वयात आणि कमी काळात लोकप्रियतेचे शिखर गाठणारा हा क्रिकेटवीर.
सर्व क्रिकेटप्रेमी जनतेच्या मनावर याने अधिराज्य केले. शालेय संघात खेळणारा हा सुनील आपल्या खेळातील कौशल्याने भारतीय संघात निवडला गेला. अगदी लहानपणापासूनच सुनीलला क्रिकेट या खेळाची आवड होती. आपल्या वडिलांबरोबर तो क्रिकेटची मॅच पाहायला जायचा. चेंडू फेक, चेंडू पकड याचा तो येता जाता सराव करीत असे. त्याची ही आवड ओळखून त्याचे मामा माधव मंत्री यांनी त्याला क्रिकेटचे मार्गदर्शन केले. त्यामुळे खेळातील कौशल्य आत्मसात करण्यास त्याला मदत झाली.
सुनीलचा खेळ अगदी शास्त्रशुद्ध बनला. शालेय व महाविद्यालयीन जीवनातच सुनीलने आपल्या संघाला अनेक विजय मिळवून दिले. त्याचे नाव या क्रिकेट जगतात झळकू लागले. रणजी'पासून खेळाची सुरुवात झाली नि कसोटी सामन्यांतही तो झळकू लागला.
वेस्ट इंडीज आणि इंग्लंडवर मात करून भारताचा संघ विजयी झाला आणि सुनीलला लोकप्रियता मिळाली. . भारताच्या संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजाची उणीव असे. ही उणीव सुनीलने भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्याचे नाव गाजले. शतके, द्विशतके रचन सोबर्सच्या संघास त्याने नामोहरम केले. त्याचमुळे जेव्हा इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर सामना होता, तेव्हा त्याचा खेळ पाहण्यासाठी अफाट गर्दी झाली होती.
सामन्याच्या शेवटच्या दिवशी मैदानावर वीस हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. दूरदर्शनचे कॅमेरे सज्ज होते. इंग्लंडचा स्नो गोलंदाजी करत होता आणि सुनील चौकार, षट्कार यांची आतिषबाजी करीत होता. त्याचा अद्भुत खेळ पाहून लोकांच्या डोळ्यांचे अक्षरश: पारणे फिटले होते. अशा खेळाडूला लोक डोक्यावर न घेतील, तरच नवल!
सुनीलच्या कष्टाचे चीज झाले. विश्वसंघात त्याची निवड झाली. भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा अनेक वेळा त्याने समर्थपणे सांभाळली. सुनीलपाशी खेळावर निष्ठा, जिद्द, चिकाटी, देशावरील प्रेम, चाहत्यांच्या प्रेमाची कदर करण्याची वृत्ती होती.
या गुणांमुळे तो आदर्श खेळाडू बनला आणि म्हणूनच माझा आवडता खेळाडू बनला.