थांबला तो संपला निबंध मराठी | thambla to sampla nibandh marathi
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण थांबला तो संपला मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण थांबला तो संपला शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत युगानुयुगे धावणारी धरणीमाता एका दुर्दैवी क्षणी थांबली. भूचर, जलचर सर्व प्राणिमात्रांच्या हृदयाचा ठेका चुकला. वारा वाहायचं विसरला. सूर्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. आकाशाच्या पोटात खड्डा पडला. नद्यांचे प्रवाह कुंठित झाले. चराचर सृष्टीचं भवितव्य अंधकारमय होऊन गेलं. हा अनर्थ ओढवला होता पृथ्वी थांबल्यामुळे.
आई ऽऽऽ आई ऽऽ गं - मी जीवाच्या आकांताने ओरडलो. ऐन कडाक्याच्या थंडीत दरदरून घाम फुटला. अरे चिन्मय, काय झालं? वाघबिघ दिसला की काय स्वप्नात? आई विचारत होती. एकंदरीत मी पाहिलेले ते स्वप्न (दुःस्वप्न) होते तर ! पण ते दुःस्वप्न तरी कसे म्हणू? त्या अद्भूत, अविस्मरणीय, अदृष्टपूर्व स्वप्नाने मला नवी दृष्टी दिली. सत्याचा साक्षात्कार घडविला. जीवनाचा महामंत्र सांगितला. 'चरैवेति, चरैवेति चालत राहा, चालत राहा. जगायचं असेल तर चालत राहा आणि दमही भरला, 'थांबशील तर संपून जाशील."
"माझ्या माणसांना मी खड्डे खणून बुजवायला लावीन पण कोणाला आळसाने स्वस्थ बसू देणार नाही'' श्री गोंदवलेकर महाराज म्हणायचे. त्यांच्या वचनाचं मर्म समजून घ्यायला हवं.' Empty mind devil's workshop' ही म्हण शंभर टक्के खरी आहे. म्हणूनच श्री रामदासस्वामी बजावून सांगतात, 'रिकामा जाऊ नेदी एक क्षण.' क्रियाशीलता, गती म्हणजे जीवन. निष्क्रिय व्यक्ती जगाच्या दृष्टीने असून नसल्यासारखी.
जग ही कर्मभूमी आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काही कर्म वाढून ठेवले आहे. तेव्हा 'आलिया कर्मासि असावे सादर' हे कर्म करताना गतीचा कायदा पाळावा. काळाचे भान राखायला हवे. काळ काम वेगाचे गणित बिनचूक सोडवायला हवे. कवी माधव जूलियन हिंदपुत्रांना आवाहन करताना म्हणतात,
"कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला थांबला तो संपला" काळ अनंत का? कधीच उसंत घेत नाही म्हणून. नद्या निरंतर वाहतात.
म्हणून ‘जीवनदायिनी' असतात. पृथ्वीवर जीवसृष्टी का? ती सतत फिरत असल्यामुळे. तिच्या बरोबरच सृष्टीतील प्रत्येक जीव गतीच्या नियमाने बद्ध आहे हे विसरून कसं चालेल? 'ससा आणि कासवा'च्या गोष्टीवरून काय बोध मिळतो? ससा थांबला म्हणून हरला.
निरलसपणे चालणाऱ्या कासवाने शर्यत जिंकली. जर्मनी दुसऱ्या महायुद्धात बेचिराख होऊनही आज प्रगतिपथावर असण्याचे कारण त्याची उद्यमशीलता. जपान अणुस्फोटात घायाळ झाला तरी थांबला नाही म्हणूनच जगाच्या नकाशावरून पुसला गेला नाही. देशभक्तांच्या अथक परिश्रमांमुळे भारतवासीयांना स्वातंत्र्याचा सूर्योदय पाहायला मिळाला.
"माणूस बसता भाग्य झोपते ।
चालता पुढेच घेई झेप ते ॥"
असं तुकडोजी महाराजांचं सांगणं आहे. हातावर हात अन पायावर पाय ठेवून स्वस्थ बसून राहणे आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. 'चराति चरतो भगः ।' चालणाऱ्याचे भाग्य चालते. सतत प्रयत्न करणाऱ्याला भाग्यलक्ष्मी प्रसन्न होते. कामात 'व्यस्त असणारी व्यक्ती 'स्वस्थ' 'चुस्त' आणि 'मस्त' राहते. तिच्या मनाबरोबर तनाचं आरोग्यही सांभाळलं जातं. तेव्हा जाग्रत । उठा, जागे व्हा, आळस झटकून कामाला लागा. भूमातेचा संदेश सदैव ध्यानात ठेवा.
“अविश्रांत चालेल काळासवे जो, तयाचे सवे भाग्यही चालते।
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
थांबला तो संपला निबंध मराठी
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- कोणतेही कार्य करताना येणाऱ्या अडचणी
- त्यांच्यावर मात करणे
- शास्त्रज्ञ, संशोधक, राज्यकर्ते, कोलंबस व विद्यार्थ्यांचा,देशभक्तांचा प्रयत्नवाद
कायदा पाळा गतीचा, काळ मागे लागला, थांबला तो संपला!
कवी माधव ज्युलियनांनी आपल्या 'भ्रांत तुम्हा का पडे' या कवितेतून मनातील संभ्रम, शंकाकुशंका, न्यूनगंड दूर करून स्वदेशाच्या उत्कर्षासाठी कार्यप्रवृत्त होण्याचे आवाहन केले आहे.
कोणतेही काम घेतले, की त्यात अडचणी आल्याच, नीच लोक किंवा कमकुवत वृत्तीचे लोक कामात अडचणी येणार म्हणून त्यांच्या भीतीने कोणतेही काम हातात घेत नाहीत किंवा कोणत्याही कामाची सुरुवातच करत नाहीत. मध्यम वृत्तीचे लोक कामाचा प्रारंभ करतात. परंतु त्यात अडचणी निर्माण झाल्या, की ते काम तसंच अर्धवट टाकतात व उत्तम' लोक एकदा हातात घेतलेलं काम, त्यांच्यावर संकटांनी कितीही प्रहार केला तरी टाकत नाहीत पूर्णच करतात.
कोणतीही चांगली गोष्ट सहजासहजी मिळत नाही. समुद्रातून मोती काढण्यासाठी कितीतरी वेळा बुड्या माराव्या लागतात. शास्त्रज्ञांना किंवा संशोधकांना एक-दोनदा प्रयोग करून तत्त्व समजत नाही किंवा रहस्य उलगडता येत नाही. जर त्यांनी चिकाटी दाखवली नसती तर शोध लागलेच नसते. विज्ञानाच्या क्षेत्रात, यंत्रशास्त्र व तंत्रज्ञानात प्रगतीच झाली नसती. परिणामत: आपल्या दैनंदिन जीवनात सुखसोयी निर्माण झाल्या नसत्या.
शिवाजीमहाराजांना स्वराज्य स्थापन करताना थोड्या का अडचणी आल्या? पण म्हणून त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याचे काम अर्धवट टाकले नाही. अंतराळातील स्थितीचा वेध घेताना अनेकदा अपयश आले. परंतु न थांबता प्रयत्न केल्यामुळेच सर्व ग्रह, तारे यांचे ज्ञान होऊन मानव यशस्वी झाला.
१८५७ सालचे स्वातंत्र्ययुद्ध अपयशी ठरले. म्हणून कोणी स्वातंत्र्यप्राप्तीचे प्रयत्न सोडून दिले नाहीत. एखाद्या हुशार विद्यार्थ्यालासुद्धा अपयशाला सामोरं जावं लागतं, मग त्याने अभ्यास सोडून, घरी बसून चालेल का? केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!
कवी कुसुमाग्रजांचे 'कोलंबसाचे गर्वगीत' हाच जीवनविषयक दृष्टिकोण स्पष्ट करते. कोलंबसाचे सर्व साथी त्या न संपणाऱ्या प्रवासाला कंटाळले होते. त्यांचे मन दुःख व निराशेने ग्रासले होते. परंतु अतुलनीय ध्येयासक्ती असलेला कोलंबस आपल्या धीर खचलेल्या सहकाऱ्यांना सांगतो,
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती। कथा या खुळ्या सागराला। अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा। किनारा तुला पामराला!
आपल्या भारत देशाची प्रगती करतानासुद्धा वाटेत अनेक समस्यांचे डोंगर आहेत. म्हणून प्रगतीपथावरून मागे फिरायचे का? छे! कवी माधव ज्युलियन म्हणतात, 'धावत्याला शक्ति येई आणि रस्ता सापडे!'
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील तिसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 3
थांबला तो संपला
थांबला तो संपला...." परमेश्वर एका वेळी एक क्षण देतो.दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. 'गतीशिवाय नाही प्रगती' गतीचा सूर्य कलला की अपयशाच्या सावल्या मोठ्या दिसू लागतात. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. म्हणून 'जाते घडि ही अपुली साधा' हे लक्षात ठेवले पाहिजे.गती आणि वाढ ही जिवंतपणाची लक्षणे आहेत.
"कल करे सो आज कर, आज करे सो अब,
पलमें प्रलय होत है, बहुरि करैगा कब?"
असे संत कबीर यांनी म्हटलेच आहे. जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर धावण्याशिवाय पर्यायच नाही-जीवनाचा मधुघट घडवायचा असेल तर ध्येय, कर्म, कर्तव्य यांची जाणीव ठेवून प्रत्येक क्षणाचा उपयोग आपण करून घ्यायला हवा.
आपल्या कर्मानुसार आपले जीवन घडत असते. उठणाऱ्याचे नशीब उठते , बसणाऱ्याचे नशीब बसते, झोपणाऱ्याचे नशीब झोपते, जो चालतो त्याचे नशीबही चालते.
'चराति चरतो भगः' समुद्रमंथनात अमृतप्राप्ती हे देवांचे ध्येय होते.तेंव्हा मौल्यवान रत्नांच्या प्राप्तीमुळे देव संतुष्ट झाले नाहीत किंवा हलाहल विषामुळे गांगरले नाहीत.तर अमृत मिळेपर्यंत समुद्रमंथन त्यांनी थांबविले नाही. म्हणून ध्येयाकडे डोळे हवेत.अखंड परिश्रम हवेत.जीवनाचं आकाश प्रयत्नाच्या , प्रगतीच्या चंद्रानं खुलतं.नेहरूंजी म्हणतः “व्यर्थ घातलेला क्षण म्हणजे दुर्दैवाला दिलेली ओसरीच!" सूर्याइतका वक्तशीरपणा आणायला बाबा भिडे सांगतात
" न थांबला सूर्य कधी
न थांबली धरणी....." :
क्षणभंगुर जीवनात एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही.वैयक्तिक व सामाजिक प्रगतीसाठी आपण झटले पाहिजे , नदीचे पाणी वाहायचे थांबले तर डबके होईल म्हणून गती हवी आहे. 'सदैव सैनिका पुढेच जायचे' हा महामंत्र भारतातील प्रत्येकासाठी आहे. देशाला उन्नत करण्यासाठी लोकशिक्षण आवश्यक आहे. “कायदा पाळा गतीचा' हा मंत्र प्रत्येकाला कळलाच पाहिजे.
'झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात' राजा राममोहन रॉय हे लॉर्ड बेटिंगसारख्यांना सतत चौदा वर्षे विनंती-पत्रे लिहून सती जाणाऱ्या स्त्रीला चितेवरून परत आणतात.महात्मा फुले, महर्षी कर्वे ज्ञानाचा तिसरा डोळा देऊन समाजात स्थान मिळवून देतात.इतिहास हेच सांगतो की वेळ, प्रयत्न व निश्चय यांच्या संगमाने जीवन फलवा.
हिरोशिमाच्या राखेतून जपानची अस्मिता जागृत झाली. वेळीच त्यांनी स्वतःला सावरले. नियोजन व कृती यांचा मिलाफ हवा काळाचा कायदा पाळला तरच अधिकारी मंत्री समारंभाला वेळेवर हजर राहतील, सर्वजण ऑफिसला वेळेवर जातील नाही तर बारशाला निघालेल्या पण लग्न समारंभाला पोहोचलेल्या गोगलगायीसारखी अवस्था व्हायची.कूपमंडूकवृत्ती ( विहिरीतील बेंडूक ) सोडून चौफेर निरीक्षण करून अधिक ज्ञान मिळवून प्रगतीची शिखरे गाठायला प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजेत.
आळस हा आपला शत्रू आहे. सतत कार्यरत राहा. केवळ मनोराज्ये नकोत. गेलेला क्षण परत फिरून येत नाही म्हणून प्रत्येक क्षण परिपूर्ण जगणे हेच योग्य ! किती जगलो यापेक्षा कसे जगलो हे महत्त्वाचे आहे. आयुष्य क्षणभंगुर आहे. कधी संपेल नेम नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद