डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | apj abdul kalam essay in marathi

डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध | apj abdul kalam essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण डॉ एपीजे अब्दुल कलाम मराठी निबंध बघणार आहोत.   डॉ. अब्दुल कलाम मिसाइल मॅन डॉ अ. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली तामिळनाडुतील रामेश्वरम या छोट्या बेटासारख्या गावात, एका मध्यमवर्गीय तमिळ कुटुंबात झाला. 


त्यांचे वडील जैनुलबदीन लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करीत असत. त्यांची आई आशियम्मा उत्तम गृहिणी होती. माता-पित्यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली. श्री इयादुराई सालोमन या गुरूंनी त्यांना योग्य दिशा दाखवली, त्यामुळे ते आयुष्यात यशस्वी बनू शकले. महत्त्वाकांक्षा, ध्यास व हाती घेतलेले काम पूर्ण होईल, असा दृढ विश्वास या तीन गोष्टी त्यांच्या मनात रुजल्या. 


मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हणतात. त्याप्रमाणेच अब्दुल कलामांना बालपणापासूनच पक्ष्यांचे उडणे अतिशय रम्य व गूढ वाटायचे. पक्ष्यांप्रमाणे आपणही आकाशात उडावे, असे त्यांना वाटत असे. ‘इन्कोस्पार'मध्ये त्यांची रॉकेट इंजिनिअर म्हणून नेमणूक झाली. तेव्हा ही संधी त्यांना स्वप्नांच्या जवळ नेणारी होती. १९६२ मध्ये 'धुंबा' येथे अवकाशतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. अवकाशयानाच्या उड्डाणासाठी ही जागा योग्य म्हणून निवडण्यात आली.


भारतातील रॉकेटवर आधारित अवकाश-संशोधनाची संधी त्यांना मिळाली. नंतर 'नासा' या अमेरिकेतील संस्थेत अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांना पाठविण्यात आले. 'लँगले रिसर्च सेंटर'मध्ये ते काम करू लागले. तेथून मेरीलँड स्टेटमधील ग्रीनबेल्ट या गावी 'गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर' येथे ते गेले.  'नासा'चे प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यावर नोव्हेंबर १९६३ मध्ये भारताचे पहिले अंतराळयान अवकाशात सोडण्यात आले.


हे यान ‘नायके-अपाची' 'नासा' मध्ये बनविण्यात आले होते; आणि त्याची जुळणी धुंबा येथे करण्यात आली होती. 'नाइकेअपाची'चे उड्डाण यशस्वी झाले. 'धुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँच स्टेशन' म्हणजे 'टर्लस' या संस्थेत त्यांनी रॉकेट करणे, पेलोड एकत्रीकरण, झालेली उपकरणे तपासणे, या कामांत स्वत:ला झोकून दिले. 'रोहिणी' व 'मेनका' ही दोन रॉकेट्स् बनवली गेली. 


नोव्हेंबर १९६७ मध्ये 'रोहिणी ७५'चे उड्डाण झाले व ते यशस्वी झाले.  भारतातील संरक्षणखात्याने क्षेपणास्त्रे बनवायची चाचपणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली, त्यामध्ये कलामांचा समावेश होता. क्षेपणास्त्राचे दोन प्रकार म्हणजे ‘स्ट्रेटेजिक' आणि 'टॅक्टिकल'. ही क्षेपणास्त्रे युद्धासाठी वापरली जातात. या क्षेपणास्त्रनिर्मितीत अब्दुल कलामांचा सहभाग होता. 


१९६८ मध्ये 'इंडियन रॉकेट सोसायटी'ची स्थापना झाली. भारतीय बनावटीचे सॅटेलाइट लाँच व्हेइकल' म्हणजे 'उपग्रह अवतरण वाहन' बनवायचे विक्रम साराभाई यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी स्वत: काही शास्त्रज्ञांची निवड केली. त्यात इस्रोचा प्रमुख म्हणून अब्दुल कलामांची निवड झाली.


'एस. एल. व्ही-३' च्या कामात त्यांनी स्वत:ला झोकून दिले. १० ऑगस्ट १९७९ ह्या दिवशी हे रॉकेट अवकाशात उडाले; पण त्यात त्यांना अपयश आले. पण खचून न जाता त्यात झालेल्या चुका, राहिलेल्या त्रुटी सुधारण्याचा प्रयत्न केला. पुढे १७ जुलै १९८० या दिवशी या रॉकेटची दुसरी चाचणी श्रीहरिकोटा अवकाशतळावरून होणार होती. दुसऱ्या प्रयत्नात मात्र त्यांना यश मिळाले. त्यातून पुढे 'अग्नी'ची निर्मिती झाली. ह्यासाठी ५०० शास्त्रज्ञ झटत होते.


२० एप्रिल १९८९ ला ‘अग्नी' क्षेपणास्त्र उडविण्याचे ठरले होते; पण प्रत्यक्षात मात्र २२ मे १९८९ रोजी याचे उड्डाण निश्चित करण्यात आले. 'अग्नी'मुळे शस्त्रास्त्रक्षेत्रात भारताचा दबदबा वाढला. देशाच्या सामर्थ्याची जाणीव जगाला झाली. री-एंट्री तंत्रज्ञानातील कौशल्य सिद्ध झाले.

१९८५ मध्ये कांचामधील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान संशोधन केंद्रा'ची उभारणी पूर्ण झाली, 'त्रिशूल हे क्षेपणास्त्र आकाशात उडाले. हे उड्डाण यशस्वी झाले. १९८८ मध्ये 'पृथ्वी' या क्षेपणास्त्राचे काम पूर्ण झाले. २५ फेब्रुवारी १९८८ रोजी ११ वा. ३३ मि. नि 'पृथ्वी'ने अवकाशात झेप घेतली. आज आपला देश क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनला आहे. ही बाब भारताच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

१९९८ मध्ये ‘पोखरण' येथे झालेल्या अणुस्फोटाशी कलामांचा संबंध होता. देशातील तीन बलाढ्य संशोधन केंद्रांमध्ये काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. त्यांच्या त्यातील भरीव कामगिरीबद्दल त्यांना बहुमान मिळाले.

१९९८ मध्ये 'भारतरत्न' पुरस्काराने त्यांना गौरविण्यास आले. भारताचे राष्ट्रपती म्हणून यशस्वी कारकीर्द करून त्यांनी भारतीयांच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण केले. आज जग त्यांना ‘मिसाइल मॅन' म्हणून ओळखते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद