माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | maza avadta mahina shravan essay in marathi

माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध | maza avadta mahina shravan essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता महिना श्रावण मराठी निबंध बघणार आहोत.  श्रावणमास आला की, नकळत माझ्या शब्दांची  गुंफण होते आणि श्रावणाचे सौंदर्य मी शब्दात बांधू पाहते. मला श्रावण महिना हवाहवासा वाटतो. सुजलाम् सुफलाम् धरती , विविध छटांचे वस्त्र लेऊन नटलेले आभाळ , क्षणात सरसर पाऊस तर क्षणात ऊन , संस्कृतीचे दर्शन देणारे सण, हे सारं काही मुठीत घेऊन यतो तो श्रावण! चैतन्य व सुंदरता यांचा मिलाफ.
 
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दात
  “हसरा नाचरा, जरासा लाजरा सुंदर साजरा, श्रावण आला...." 

चैत्र-वैशाखातला असह्य उकाडा व ज्येष्ठ-आषाढातला पावसाचा चिकचिकाट यात वैतागलेल मन श्रावणात मात्र सुखावतं! श्रावणातील आकाशात विलोभनीय सौंदर्य आढळते. बगळ्यांच्या रांगा, नाचणारी मुले, तरंगणाऱ्या होड्या, ओलाचिंब निसर्ग, विकसित फुले, भिजलेली पाखरे, हिरव्या कुरणांवर पाडसांसह बागडणाऱ्या सुंदर हरिणी, फुललेला सोनचाफा , सुगंधित केवडा , ओथंबलेलं आभाळ , भरारणारा वारा या साऱ्यांच्या रूपातून श्रावण भरभरून ओसंडत आहे, असेच वाटते. 


चैतन्य, सौंदर्य आणि समृद्धी यांच्या त्रिवेणी संगमाने नटलेला श्रावण कोणाला बरे आकर्षित करणार नाही? पावसाची दीर्घ प्रतीक्षा करणारा चातक, हर्षाने पंखाचा फुलोरा पसरवून नाचणारा मयूर (मोर पक्षी ) , डोळे आभाळाकडे एकटक लावून बसलेला शेतकरी या साऱ्यांच्या हृदयात असंख्य सुखे फुलवितो हा श्रावण ! मृगाचे तुषार तप्त धरित्रीला सुखवितात . वृक्ष , वेली, लता , पुष्प , पाखरे , पृथ्वी, आकाश, मानव सारेच निसर्गाच्या तालावर नृत्य करू लागतात.


हर्षाचा झंकार निनादतो . व्रतवैकल्ये व सण यामुळे या महिन्यात भक्तिरसाचा सर्वत्र आविष्कार झालेला दिसतो. श्रावणी सोमवारी महादेवाची पूजा केली जाते, मंगळवारी मंगळागौरी पूजतात.नागपंचमीला शेषनागाची पूजा केली जाते.गोकुळ अष्टमीला दहिहंडी फोडली जाते. दहिहंडीत मुले चिंब भिजून  श्रीकृष्णासारखं हंडी फोडून लोणी खातात. नारळी पौर्णिमा बंधु-भगिनी प्रेमाचा साक्षात्कार घेऊन येते- राखीच्या रूपाने ! असा श्रावण महिना मनाला अशी भुरळ घालतो की जीवन अधिक सुंदर भासू लागते.


श्रावणमास म्हणजे सौंदर्यमास! श्रावणमास म्हणजे श्रवणमास! सृष्टीचं सुमधुर संगीत चारी दिशांत निनादत असतं.  आनंदाचे कारंजे फुलविणारा श्रावणमास मला खूप प्रिय आहे. मला म्हणावेसे वाटते

"श्रावण - निसर्गाचे नर्तन श्रावण - समृद्धीचे गर्जन
श्रावण - सणांची गुंफण
श्रावण - कालचक्राचे भूषण." 

नकळत श्रावणाची जादू शब्दात अशी बध्द होते

 "निसर्ग खुलला, धरती रंगली
श्रावण आला, सृष्टी हर्षली समृध्दीचे द्योतक हे,
 आनंदाचे स्वागत वरूणराजाच्या स्वागती आली."

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद