घड्याळ बंद पडली तर निबंध इन मराठी | ghadyal band padli tar nibandh in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण घड्याळ बंद पडली तर मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो मानवाचे पुर्ण जीवन आज घड्याळ्याच्या काट्यावर चालत आहे . असे असताना जर घड्याळ बंद पडले तर कोणत्या गमतीदार गोष्टी घडतील व कोणत्या गोष्टीला अर्थ राहणार नाही याचीच माहिती आपण निबंधामध्ये बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
शेजारच्या मोहिनीची रोज सकालची आठ सदतीसची लोकल चुकायची! तिला नेहमी वाटायचे, या रेल्वेचं घड्याळ कधी बंद का पडत नाही? एकदा घड्याळ बंद पडल्यामुळे काय गंमत झाली होती माहीत आहे का? नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्व लोक जमले. सर्वजण रात्रीचे बाराचे ठोके पडण्याची आतुरतेने वाट पहात होते. परंतु नेमके बाराला अर्धा मिनिट असताना घड्याळ बंद पडले! नंतर दहा मिनिटांनी ही गोष्ट लक्षात येताच सर्वत्र हशा पिकला!
माणूस घड्याळाचा किती गुलाम झाला आहे. त्याचे सर्व दैनंदिन व्यवहार घड्याळाच्या काट्यावर चालतात. रस्त्यानं जाताना ऑफिसला वेळेवर पोचावं म्हणून धावत-पळत' जाणारे पादचारी दिसतात किंवा जलद वेगानं धावणाऱ्या गाड्या दिसतात. वेळेवर पोचावे म्हणून सर्वांचा आटापिटा चालेला असतो. पण घड्याळे बंद पडली तर अशी कोणाचीच धावपळ होणार नाही.
कोणीही कोणत्याही वेळी ऑफिसमध्ये जाईल. त्याला 'लेट' हा शेरा कधी मिळणार नाही. तर तो केव्हाही उठून घरी येऊ शकेल. 'अजून साडेपाच वाजले नाहीत,' असे त्याला कोणी सांगणार नाही. तसेच शाळेचे! शाळेत अमूक वाजताच गेलं पाहिजे असं बंधन उरणार नाही. मुले रमतगमत केव्हाही शाळेत जातील.
शिक्षकसुद्धा एका वर्गावर एकदा गेले तर तासन् तास शिकवत बसतील. 'पस्तीस मिनिटं झाली' म्हणून बेल वाजवायला शिपायाला तरी कसं समजणार घड्याळं बंद पडल्यावर!
शाळा, ऑफिस, कारखाने केव्हा चालू करावेत व केव्हा बंद करावेत हे कोणालाच समजणार नाही. या सर्व ठिकाणची सर्व व्यवस्था कोलमडून पडेल. सर्वत्र सावळागोंधळ माजेल. घड्याळे बंद पडल्यामुळे हॉटेल, खानावळी यांच्यामध्येसुद्धा गंमत होईल. 'इडली दुपारी बंद. फक्त सकाळी दहापर्यंत', 'जेवणाची वेळ दुपारी बारा ते दोन' या फलकांना काही अर्थ राहाणार नाही.
हॉटेल नेमके केव्हा उघडावे व केव्हा बंद करावे? हेसुद्धा हॉटेल मालकाला कळणार नाही. सकाळचे नऊ वाजले किंवा रात्रीचे नऊ वाजले हे समजायला काहीच मार्ग नसेल.
विद्यार्थी मात्र खुशीत असतील. पहाटेचे पाच वाजले म्हणून कोणाची आई कोणाला उठवू शकणार नाही. किंवा 'रात्रीचे बारा वाजले', 'आता अभ्यास पुरे' असे कोणी दटावू शकणार नाही. दवाखान्यात जन्मलेल्या नवजात शिशूची जन्मवेळ कशी कळणार ? सर्वच कारभार अदमास पंचे दाहोदरसे' अशा धर्तीवर चालू राहील.
घड्याळे बंद पडली तर मग मात्र आजीच्या चमत्कारिक' घड्याळावर अवलंबून राहावे लागेल. सूर्योदय, सूर्यास्त, माध्यान्ह व रात्र या चारच वेळा सर्वांना निश्चित समजतील. त्याच जोरावर दैनंदिन व्यवहार कसे तरी आटोपले जातील.
खरंच कित्ती गंमत होईल नाही घड्याळे बंद पडली तर... ठराविक एका दिवशी जगातील सर्व कॉम्प्यूटरमध्ये व्हायरस येतो. तशीच वर्षातून एकदा, एका दिवशी तरी जगातील सर्व घड्याळे बंद पडावीत. काय मजा होईल नाही?
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- सर्वत्र शांतता
- धावपळ नाही
- संथ व्यवहार
- सवयीनुसार वारंवार घड्याळात पहाणे
- वाहतुकीवर
- रेल्वे, बस इ. परिणाम
- कार्यालये-शाळा यावर परिणाम
- वेळेचे बंधन नसल्यामुळे हॉटेल व खानावळी यांवर परिणाम
- निसर्गाच्या घड्याळावर सर्व गोष्टी अवलंबून
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद