मी पक्षी झालो तर मराठी निबंध | Me Pakshi zalo tar Nibandh in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पक्षी झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. विज्ञानाने आज आपल्याला पंख नसतानाही हवेत विमानाद्वारे उडण्याची सुविधा दिली आहे. पण स्वताच्या पंखाने उडण्याची मजा काही औरच असते म्हणुन कधी कधी मनात येते की मी पक्षी झालो तर कीती गमती जमती करता येतील . अशीच पक्ष्यांच्या जगातील आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला
सासरी सुखात नांदणाऱ्या त्या भाग्यवतीच्या माहेरी जायला माझं मन आसुसलं होतं. अंगणात फुलांचा सडा शिंपणारा पारिजात आणि घरात प्रेमाचा वर्षाव करणारे मायतात । पण कल्पनेच्या पंखांनी उडता थोडीच येतंय । त्यासाठी पक्षीच व्हायला हवं ! मग कितीतरी सासुरवाशिणींचे संदेश त्यांच्या माहेरी पोचविता येतील. त्या वेळी आपल्या छोट्या छोट्या डोळ्यात आनंदाश्रू गर्दी करतील. वाटेल 'धन्य धन्य हा पक्षीदेह !'
आज विज्ञानामुळे गगनात झेप घेणे मानवाला शक्य झाले आहे. पण पक्षी होऊन निळ्याभोर आकाशात विहार करण्याची, उंच भरारी घेण्याची मजा काही औरच असेल नाही का ? कवींनीही आकाशाची ही ओढ काव्यातून व्यक्त केली आहे. स्वतःचा ‘आकाशवेडी' म्हणून उल्लेख करणारी ही कवयित्री म्हणते,
"अशी झेप घ्यावी, असे सूर गावे, घुसावे ढगामाजि बाणापरी ढगांचे अबोली, भुरे, केशरी रंग, माखून घ्यावेत पंखांवरी ॥"
मला स्वप्नात जरी पक्षी होता आलं किंवा माझं पक्षी होण्याचं स्वप्न खरं झालं तर ? एखाद्या हिरव्यागार वृक्षाच्या ढोलीत आमचं टुमदार घरटं असेल. आई, बाबा, भावंडं असं आमचं चिमुकलं विश्व असेल. पण मन असेल विशाल, आकाशासारखं! आई आम्हाला उडायला शिकवेल तो अनुभव किती विलक्षण असेल नाही?
एक गंमत सांगू? मी चिमणी झाले तर कितीही पाऊस आला तरी लबाड कावळ्याला घरट्यात घेणार नाही. मला सापडलेला मोती तर त्याला मुळीच दाखविणार नाही. आरशातलं माझं चिमणं रूप पाहून मला खूप गंमत वाटेल. तुमच्या सुंदरशा आरशावर चोची मारण्याचा वेडेपणा मी करणार नाही. कारण ते माझंच रूप आहे, हे मला माहीत असेल.
तसं मला पोपट व्हायलाही आवडेल. समस्त बालगोपालांचा लाडका पक्षी. माझ्या चतुर, मधुर वाणीने मी सर्वांचं मन रिझवीन. पण एका अटीवर. मला पिंजऱ्यात कोंडायचा दुष्टपणा करायचा नाही. डाळ, मिरची, डाळिंब कशाकशाच्या मोहात पडून मी स्वातंत्र्याचा बळी देणार नाही, सांगून ठेवते.
कोकिळ होण्याची संधी मिळाली तर वसंतऋतूच्या आगमनाची वर्दी देण्याचं काम आनंदाने करेन. फक्त 'कुहू कुहू' एवढं एकच गाणं न गाता इतर गाणी शिकायचा माझा प्रयत्न असेल. चंडोल पक्षी झाले तर उगवत्या सूर्यनारायणाच्या स्वागताला सज्ज होईन. आणि मयूर होता आलं तर जलधारांबरोबर विजेच्या तालावर नृत्य करेन.
नृत्य करताना मला मैत्रिणींची, शाळेतील स्नेहसंमेलनाची आठवण येईल. मी मैत्रिणींना म्हणेन “ए, चला नं ग माझ्याबरोबर नाचायला !' पण त्या मला ओळखणार नाहीत आणि माझी भाषाही त्यांना समजणार नाही. मी नाराज होईन, मला वाईट वाटेल.
पक्षिजातीतले कायदे फार कडक आणि क्रूर आहे म्हणतात. माणसाचा स्पर्श होईल त्याला ते चोचीने घायाळ करून मारून टाकतात. असा स्पृश्यास्पृश्य भेद पाळणे वाईट आहे हे माझ्या बांधवांना पटवून देईन.
पक्षी झाले तर काही बाबतीत फारच गैरसोय होणार आहे. उडता येईल पण बोलता येणार नाही. हसता येणार नाही. मग वाढदिवस नाही. सणवार, उत्सव, सहल, उन्हाळ्याची सुट्टी, मामाचा गाव सारं विसरावं लागेल. नवनवीन कपडे, दागिने यांची हौस फिटणार नाही. पाणीपुरी, भेळ, आईस्क्रीम आणि आईच्या हातच्या खमंग पदार्थांची आठवण येऊन तोंडाला पाणी सुटेल. दूरदर्शनवर आवडती मालिका सुरू असली की कोणाच्या तरी घरात शिरायचा मोह होईल. पण हिंमत होणार नाही. आणि हिंमत केलीच तर हकालपट्टी झाल्याशिवाय राहणार नाही.
मग पक्ष्याच्या जिण्याचा वीट येईल. उडण्याची नवलाई संपली की त्याचाही कंटाळा येईल. अगदी जाम बोअर होईल आणि अभावितपणे माझ्या मनात कल्पना चमकून जाईल.मी मानव झाले तर ....
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला व तुम्हाला पक्षी झाल्यावर काय करायला आवडेल हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद