मी सैनिक झालो तर निबंध | mi sainik zalo tar marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी सैनिक झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. हा कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे . राष्ट्रासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांना नमन करूया आणि सुरुवात करूया निबंधाला .
मला वाचनाची खूप आवड आहे. त्यातून मला युद्धाच्या कथा वाचायला खूप आवडतात. युद्धाच्या कथा खूप रम्य असतात. एक दिवस शाळेत एका प्रत्यक्ष युद्धात भाग घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांला बोलविले होते. त्याचे अनुभव ऐकताना मी भारावून गेलो. माझ्या तर अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे अनुभव ऐकताना मी मनाने केव्हाच युद्धभूमीवर पोहोचायचो. माझे रक्त अगदी सळसळायचे. शत्रूबद्दलची चीड उफाळून यायची. मनात सारखे विचार येऊ लागले मी सैनिक झालो, तर....
भारताला सतत टांगणीला लावणाऱ्या शेजारी शत्रूला कायमचे नेस्तनाबूद करायचे, त्यांच्याविरुद्ध लढायचे आणि 'जिंकू किंवा मरू' या बाण्याने त्यांच्यावर मात करायची. बस, ठरले ! आता सैनिक होऊन प्राणांची बाजी लावायची. आजवर अनेकांनी देव, देश आणि धर्म यासाठी प्राण पणाला लावले. भारत माझा देश आहे. माझ्या देशावर माझे प्रेम आहे, अशी रोज प्रतिज्ञा घेतो ना आपण; मग या माझ्या देशासाठी, त्याच्या संरक्षणासाठी मी सैनिक होणारच.
मी सैनिक होणार, असे ठरविताच माझ्या डोळ्यांपुढे शिवरायांची मूर्ती प्रत्यक्ष दिसू लागली. 'शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती' हे गाणे कानांत घुमू लागले. बस्, मीदेखील बाजीप्रभू, तानाजी, दत्ताजी शिंदे यांच्या पंक्तीला बसणार; त्यांच्यासारखाच पराक्रम गाजवणार.
स्वत:हून स्वीकारलेल्या कामाचा कधीच पश्चात्ताप होत नाही. युद्ध म्हणजे असिधाराव्रत. अग्निपथ. त्यावरून मी जराही न डगमगता चालणार. जेव्हा शत्रू आमच्यावर विश्वासघाताने चाल करतात, तेव्हा त्यांना चोख उत्तर द्यायचेच. मला माहीत आहे, सैनिक होणे तितके सोपे नाही. सैनिक होणे म्हणजे, घर, घरातल्या माणसांना सोडून, सुरक्षित मायेच्या कोशातून असुरक्षित वादळ-वाऱ्याशी टक्कर देणे.
मान्य आहे मला. स्वत:साठी, घरासाठी सगळेच जगतात; पण त्याहून मोठे घर म्हणजे राष्ट्र. या राष्ट्रासाठी जगेन किंवा मरेन. शेवटी माणूस मर्त्य आहे. आज ना उद्या त्याला मरण येणारच आहे. मग 'झुंजता-झुंजता, मरेन मी.' जो देशासाठी धारातीर्थी पडतो, तो भारतमाचेचा वीरपुत्र ठरतो.
मी सैनिक झालो, तर शौर्य पणाला लावून शौर्यपदके मिळवीन. ती मी अभिमानाने छातीवर मिरवीन. मी देशाचा; देश माझा. माझ्या देशासाठी साहस करायला नक्कीच आवडेल मला. लहानपणी लुटुपुटीची लढाई केली, खोट्या बंदुकीने शत्रूला मारले; पण सैनिक झाल्यावर खरी लढाई, खरी बंदूक, खरे शौर्य, खरे देशप्रेम आणि खरी निष्ठा. भविष्यकाळात मी सैन्यात भरती होणार, हे नक्कीच!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद