राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध | rajarshi shahu maharaj essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण राजर्षी शाहू महाराज मराठी निबंध बघणार आहोत. राजर्षी शाहू महाराज २ एप्रिल १८९४ रोजी कोल्हापूर संस्थानामध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला. कोल्हापूर संस्थानला नवीन राजा मिळाला. राजेपद मिळाल्यापासून प्रत्येक क्षण प्रजेच्या सुखासाठी, हितासाठी वेचणारा हा राजा आगळा-वेगळा होता. त्याचमुळे या राजाला 'लोकराजा' ही उपाधी मिळाली.
छत्रपती शाहूमहाराजांचा जन्म २६ जुलै १८७४ मध्ये झाला अन् वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा राजर्षी होण्याचे भाग्य लाभले. राज्यकारभाराची सूत्रे स्वीकारल्यापासून केवळ प्रजेचाच विचार करणारा हा राजा प्रजेसाठी झटत राहिला.
त्यावेळी संस्थानामध्ये बहुजन समाजातील लोकांना नोकऱ्या मिळत नव्हत्या. प्रथमत: त्यांनी सामाजिक परिवर्तन घडविण्याचे ठरविले. गरिबांना रोजगार मिळून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, यासाठी बहुजन समाजातील लोकांना त्यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या कार्याचा उद्देश एकच होता, तो म्हणजे समाजाचे कल्याण. दलित, गरीब अशांच्या मुलांना शिक्षण घेणे शक्य होत नव्हते.
शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे त्यांना प्रगतीचा मार्ग दिसत नव्हता. म्हणून महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून वसतिगृहांची स्थापना केली आणि शिक्षणाचा प्रसार केला. राजांनी सोनतळी येथे भटक्या- विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली. भटक्या लोकांच्या आयुष्यात स्थिरता यावी, यासाठी महाराजांनी घरकुले बांधण्याची योजना अंमलात आणली. भटक्या लोकांना पोटासाठी वणवण करावी लागत असे. त्यांची ही वणवण थांबवण्यासाठी राजांनी खाजगीतल्या पहाऱ्यांचे काम त्यांच्यावर सोपविले. तळागाळातल्या लोकांचा विश्वास संपादन करून त्यांना प्रेमाने जिंकले.
महात्मा फुले यांच्या विचारांचा राजांवर प्रभाव होता. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराजांनी समाजसुधारणा घडवून आणण्याचा सपाटा लावला. समाजसुधारणेसाठी त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत असे. वेठबिगारी म्हणजे माणुसकीला असलेला कलंक होता. त्यांनी हे ओळखून वेठबिगारीची पद्धत बंद केली. त्यावेळी काही लोकांना गुलामगिरीत खितपत पडावे लागत असे. त्यांची या गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्तता केली.
महाराज सुधारकांना शिक्षणासाठी वर्तमानपत्र चालविण्यासाठी मदत करीत. त्यांच्या राज्यात त्यांनी बरेच पुरोगामी कायदे संमत करून अंमलात आणले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे कोल्हापुरला सत्यशोधक समाजाचे एका अर्थाने पुनरुज्जीवन करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक चळवळ जोमाने वाढली. महाराष्ट्रात पुन्हा एकदा त्याचा प्रचार झाला. त्याचप्रमाणे सामाजिक चळवळीसही शाहूमहाराजांनी प्रोत्साहन दिले. अनेकांना त्यांनी भरीव मदत केली व पाठिंबाही दिला. दलितांच्या परिषदा घेण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
अशा प्रकारे लोककल्याणाचा ध्यास असलेल्या राजर्षांनी आपल्या कारकीर्दीत अनेक सुधारणा घडविल्या आणि अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले. अशा या लोकनायकाचे १९२२ मध्ये निधन झाले.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद