सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध savitribai phule nibandh marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सावित्रीबाई फुले माहिती मराठी निबंध बघणार आहोत. ज्या काळात स्त्री शिक्षण घेणे वाईट समजले जायचे त्या काळात स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला तो याच सावित्रीबाई फुलेंनी अशा महान व्यक्तीबद्दल आणखी माहीती घेऊया आणी सुरूवात करूया निबंधाला.
स्त्री अबला नसून सबला आहे, हे आज कर्तृत्ववान स्त्रियांनी सिद्ध केले आहे. पोस्टमनपासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा, असेच स्त्रीचे कर्तृत्व आहे. या साऱ्याचे श्रेय अर्थातच सावित्रीबाई फुले यांना आहे. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे.
अशा काळात फुले दंपतीने क्रांतिकारक कार्य केले. आपल्या पतीच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सावित्रीबाई! मुलींसाठी शाळा काढून मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण 'बालिका दिन' म्हणून साजरा करतो.
सुमारे १८३१ साली नायगाव येथील खंडोजी पाटील यांच्या घरात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई लहानपणापासूनच चुणचुणीत, हुशार नि बंडखोर विचारांच्या होत्या. तो काळ मागासल्या विचारांचा होता. रूढी, प्रथा यांना महत्त्व दिले जात असे. बालविवाह सर्रास होत असत. चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र होते. अशा काळात जन्म झालेल्या सावित्रीबाईंना समंजस व शिक्षित पती मिळाला. त्यांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंच्या जन्माचे सोने झाले.
सावित्रीबाई हुशार होत्या. त्यांना शिकण्याची आवड व इच्छा होती. ती इच्छा त्यांच्या पतीने म्हणजेच जोतीराव फुले यांनी पूर्ण केली. सावित्रीबाईंचे ते गुरू बनले. सावित्रीबाईदेखील उत्तम शिष्या बनल्या. त्या जिज्ञासेने व कुतूहलाने शिकत होत्या. काल शिकविलेले आज त्या धडाधडा म्हणून दाखवीत.
रोज नवीन काहीतरी शिकत. त्यांची प्रगती वाखाणण्यासाठी होती. हातात पुस्तक पडले, की लगेचच त्या ते वाचून काढत. वाचन, पाढे, बेरीज, वजाबाकी, हिशेब, इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान शिकत. त्यांचा शिक्षणाचा ध्यास व झपाटा विलक्षण होता.
लवकरच त्यांनी चौथीची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. 'जिच्या हाती विद्येची दोरी, ती जगाला उद्धारी' ही उक्ती त्यांनी खरी करून दाखवली. जोतीराव म्हणत असत “एक स्त्री शिकली की एक कुटुंब शिकते. अशी अनेक कुटुंबे शिकली, का समाज शिक्षित होतो. समाज शिक्षित झाला, की राष्ट्र शिक्षित होते.”
जोतीरावांनी चांगल्या कामाची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच केली. स्वत:च्या पत्नीला शिकवून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला. समाजानेदेखील या आदर्शाप्रमाणे पाऊल पुढे टाकावे, अशी त्यांची इच्छा होती.
१८४८ साली भिडे वाड्यात त्यांनी पतीच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला. सुरुवातीला मुलींची संख्या कमी होती. प्रवाहाच्या दिशेने पोहणारे सगळेच असतात; पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासाठी धैर्य लागते. हळूहळू हे धैर्य वाढू लागले.
मुलींची संख्या वाढू लागली. सनातनी लोकांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. 'कलियुग आले, धर्म बुडाला,' अशी टीका होऊ लागली. तरीही हे सारे शांतपणे सहन करीत त्या आपले कार्य नेटाने पुढे नेत असत.
विघ्नसंतोषी माणसे त्यांना खूप त्रास देत; पण तो त्रास सहन करीत त्या प्रत्युत्तरादाखल म्हणत, “हे पवित्र कार्य मी सतत करावे म्हणून तुम्ही शेण, खडे मारत नसून माझ्यावर फुलेच उधळीत आहात, असेच मला वाटते.' सावित्रीबाईंची जिद्द, चिकाटी, धाडस पाहून जोतीरावांना आनंद होत असे. त्यांची स्त्री-शिक्षणाची इच्छा पत्नीकडून पूर्ण होत आहे, हे पाहून त्यांना समाधान वाटत असे.
त्या काळातील महिला रूढी-परंपरा यांच्या गुलामगिरीत जखडल्या होत्या. त्यांची या गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा त्यांनी चंगच बांधला. प्रयत्नांची शिकस्त केली. महिलांच्या विकासासाठी त्यांनी महिला सेवा मंडळा'ची स्थापना केली. केशवपनाविरुद्ध बंड केले. नाभिकांचा संप घडवून आणला. 'बालहत्या प्रतिबंधक गृह' सुरू करून त्यांनी अडल्या-नडल्या आणि वाट चुकलेल्या विधवांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. दुष्काळ, प्लेग या साथीच्या काळात रंजल्या-गांजल्यांची सेवा केली आणि अन्नछत्रे चालविली.
अशा प्रकारे सावित्रीबाई क्रांतिज्योत बनल्या. स्त्री-जीवनात क्रांती घडविणाऱ्या, ज्ञानज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई समाजापुढे आदर्श होत्या. स्वतः शिकून स्त्रीपुरुष समानतेचा पाया घालणाऱ्या, दलित बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या क्रांतिज्योतीला शतश: प्रणाम! १० मार्च हा सावित्रीबाईंचा स्मृतिदिन. त्यांना स्त्रीच्या प्रगतीची आदरांजली!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
सावित्रीबाई फुले निबंध 2
स्त्रीपुरुष समानता प्रतिपादण करणाऱ्या प्रथम महिला कोण? स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या पहिल्या प्रणेत्या कोण ? स्त्रीची प्रतिष्ठा सांगणारी आद्य नारी कोण ? या तीनही प्रश्नांचे उत्तर आहे, ‘सावित्रीबाई फुले.'
सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी व शूद्रांसाठी शाळा काढल्या आणि शिक्षणाची दारे खुली करून दिली, एवढे सांगून त्यांच्या कार्याची खऱ्या अर्थाने कल्पना येऊ शकणार नाही. ते कार्य कोणत्या परिस्थितीत केले याचा विचार केल्यावरच त्याचे मूल्यमापन होऊ शकेल. त्यांच्या कार्याला न्याय देता येईल.
फुल्यांचा काळ म्हणजे अव्वल इंग्रजीचा काळ. त्यावेळी वर्णीय विषमतेने अत्यंत उग्र रूप धारण केले होते. जनमानसावर सनातनी विचारांचा पगडा होता. नीती, माणुसकी, सदाचार, दया परोपकार म्हणजे धर्म लोकांना विसर पडला होता. धर्माला विकृत स्वरूप देण्यात आले होते. स्त्रिया आणि शूद्र यांची स्थिती अत्यंत दयनीय होती.
ज्ञानाचा प्रकाश जणू त्यांच्यासाठी नव्हताच. जीवन अंधःकारमय झाले होते. इंग्रजांच्या कारकीर्दीत इंग्रजी विद्येची द्वारे सर्वांना मोकळी झाली. पाश्चात्यांनी केलेल्या सुधारणेमुळे दोन परस्परविरोधी प्रतिक्रियांच्या प्रचंड लाटा समाजात उसळल्या. एक अनुकूल व दूसरी प्रतिकूल. ज्योतिराव फुले यांनी पाश्चात्य सुधारणेचे स्वागत केले.
त्या काळी सरकारी शाळांबरोबरच मिशनरी शाळाही शिक्षणप्रसाराचे कार्य करीत होत्या. याच वेळी सावित्रीबाईंनी समाजातील शिक्षणापासुन वंचीत मुलांसाठी शाळा काढली. मुलांनी शाळेत यावे म्हणून त्या मुलांना खाऊ देत. पाट्या, पुस्तके, कपडे पुरवीत. मुलामुलींना शिक्षण देताना, ती केवळ पढीक पंडित होणार नाहीत तर आपल्या समाजाचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करतील. त्यांची मने संवेदनाक्षम बनतील याबाबत त्या दक्ष होत्या.
शिक्षण प्रसाराबरोबरच आणखी एका सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी पाऊल उचलले. अभागी विधवांचे अंधारातील उसासे, पशुवत जिणे, अपमान, जीवघेणे कष्ट, त्यांना मिळणारी अमानुष वागणूक पाहून त्यांचे हृदय द्रवले, मन बंड करून उठले. विधवांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम फुले दांपत्याने पोटतिडीकीने केले.
विधवांच्या जीवनात सौभाग्याची पहाट उमलावी यासाठी एकमेव मार्ग होता पुनर्विवाहाचा. निव्वळ भाषणे देऊन किंवा लेख लिहून प्रबोधनाचे काम होण्यासारखे नव्हते. त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी होती. १८६४ मध्ये विधवेचा पुनर्विवाह घडवून आणण्याचे धाडसी, क्रांतिकारक पाऊल त्यांनी यशस्वीपणे उचलले.
विधवांसाठी पुनर्विवाहसंस्था स्थापन केली. पतितांच्या अर्भकांसाठी अनाथाश्रम काढला. ते पाहून सनातन्यांची माथी भडकली. जातिबांधवांनी वाळीत टाकण्याची धमकी दिली पण त्या धमक्यांना भीक घालायला ज्योतिबा अन् सावित्रीबाई काय कच्च्या गुरुचे चेले होते ?
१८६० सालापासून महाराष्ट्राला अधूनमधून दुष्काळाचे चटके बसत होते. 'अन्नासाठी वणवण हिंडणाऱ्या लोकांना काम व अन्न द्या' अशी ज्योतिबांनी मायबापसरकारला विनंती केली. इतकंच करून ते थांबले नाहीत तर धनकवडी येथे आश्रमस्थापन करून दोनहजार मुलांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था तब्बल दोन वर्षे त्यांनी केली. या वसतिगृहाची संपूर्ण व्यवस्था पाहण्याचे काम सावित्रीबाईंनी आनंदाने केले. अशा होत्या सावित्रीबाई ! रंजल्या गांजलेल्याच्या आई ! ।
मनोभावे अव्याहत कार्य चालू असता १८८८ च्या जुलै महिन्यात ज्योतिरावांना अर्धांगवाताचा झटका आला. त्यांच्या अर्धांगिनीने त्यांची अहर्निश सेवा केली; परंतु २८ नोव्हेंबर १८९० हा दुर्दिन उजाडला. ज्योतिबांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली. ज्योतिबांची प्राणज्योत मावळली पण त्यांनी प्रज्वलित केलेली क्रांतिकार्याची ज्योत या आधुनिक ‘सावित्री' ने तेवत ठेवली.
सत्यशोधक समाजाच्या नेतृत्वाची धुरा आता सावित्रीबाईंच्या खांद्यावर येऊन पडली. ती त्यांनी समर्थपणे पेलली. पतीच्या मृत्यूनंतर सात वर्षे कार्यरत राहून पतिव्रतेचा उच्च आदर्श त्यांनी जगासमोर ठेवला. १० मार्च १८९७ रोजी प्लेगचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी जगाचा निरोप घेतला. एक कर्मयोगी जीवन संपुष्टात आले. त्यांचे त्यागमय जीवन पाहून कोणाचेही मस्तक आदराने झुकावे .
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद