विनोबा भावे निबंध मराठी | vinoba bhave essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विनोबा भावे मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत त्यामागे असंख्य विरांनी आपले बलीदान केलेले आहे त्यापैकी एक आहेत विनोबा भावे. या बद्दल आणखी माहिती घेऊया आणि सुरुवात करूया निबंधाला
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतीयांमध्ये स्वत्व आणि भारताबद्दलचा अभिमान जागवण्याचं जे महत्कार्य स्वामी विवेकानंदांनी हाती घेतलं, त्याचीच धुरा एका वेगळ्या अर्थानं समाजोपयोगी आकार देण्यासाठी विनोबांनी आपल्या खांद्यावर घेतली होती.
गागोदे या गावी जन्मलेल्या विनोबांना तीन भाऊ व एक बहीण होती. वीरांच्या, संतांच्या ते कथा नित्य ऐकत. विनोबा भावंडात थोरले. एकदा त्यांच्या आई त्यांना म्हणाल्या, “विन्या, लग्न केलेस, तर स्वत:च्या आईबापांचा उद्धार होईल; पण ब्रह्मचारी राहिलास, तर बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होईल. वयाच्या दहाव्या वर्षीच विनोबांनी आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतली अन् 'महामानव' शब्दाला अखेरपर्यंत जागतात, हे पुनश्च सिद्ध केलं.
तसंच एकदा आईनं पूर्ण गावाला दोन फणस वाटायचं काम त्यांच्यावर सोपवलं. मग विनोबांना फक्त दोन गरे दिले. त्यामुळे 'देण्या'तला (दुसऱ्याला) आनंद अनुभवण्याचा प्राथमिक धडाच गिरवला गेला. दानाचं महत्त्व त्यांना बालपणीच पटलं. ते म्हणत : 'जो देतो, तो देव व खातो, तो राक्षस!'
बालपण जन्मगावी डोंगराळ जंगलात भटकण्यात गेलं. बाराव्या वर्षी वडिलांबरोबर बडोद्यास आले; पण फारसं शिक्षण त्यांना मिळालं नाही. कारण 'लाल-बाल-पाल' या दैवतांनी तरुणांना संप्रेरित करण्याचा; पारतंत्र्याच्या शृंखलांच्या निनादानं तरुण पिढी अस्वस्थ होण्याचा काळ होता. मग समर्थ रामदासांचा स्वाभिमान नि आत्मविश्वास अंगी असणारे विनोबा स्वदेश व स्वभाषेच्या प्रेमापायी उतावीळ न झाले, तरच नवल!
त्याच सुमारास लाला लजपतराय एकदा म्हणाले तेहतीस कोटी लोक थुंकले, तरी त्या थुंकीच्या प्रवाहात एक लाख इंग्रज लोक वाहून जातील; पण हे तेहतीस कोटी भारतीय लोक एकत्र मिळून थुंकतील, तेव्हा ना?" या नि अशा वाक्यांचा संवेदनशील विनोबांवर परिणाम खूप झाला. मायभूमीला मुक्त करण्याचा ध्यास त्यांना लागला आणि ते जीवनाच्या शाळेत अनुभवाचे धडे शिकले. लौकिक अर्थानं हे असं अनौपचारिक शिक्षण विनोबांना लाभलं आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी झाली.
विनोबा इंटरला असताना आई गेली. तिन्ही भाऊ घर सोडून गेले. पुन्हा न परतण्यासाठीच ब्रह्मविद्या शिकावी व मोक्षप्राप्ती करावी, असा विचार करून सर्व सर्टिफिकिटं चुलीत जाळून ते काशीक्षेत्री गेले. तिथं महात्मा गांधींचे शब्द त्यांनी ऐकले... “इंग्रज जर आपणाला या देशात नको असतील, तर मग त्यांना सरळ सांगा, 'चालते व्हा !' मग असे बोलण्याबद्दल तुम्हाला फाशी जावे लागले, तर हसत हसत जा."
महात्मा गांधींसारख्या महापुरुषानं विनोबांना नवी दिशा, नवे ध्येय, नवे तेज दिले. मग विनोबा कसले राहतात काशीत? ते पोहोचले गांधींच्या सत्याग्रहाश्रमात. शरीर दुबळं असूनही त्यांनी इच्छाशक्तीच्या बळावर आश्रमात मेहनतीची कामं करून गांधीजींचं मन जिंकलं. आशीर्वाद मिळवलेत. एवढंच नव्हे, तर 'पुत्र' म्हणून गांधींनी त्यांना स्वीकारलं. मग गांधींचा अनुयायी म्हटला की, रंजल्या - गांजल्या, हीन-दीन, अनाथ-अपंग यांच्याशी त्याचा निकट संबंध येतोच. या समीकरणाचा विनोबांनी पुन:प्रत्यय दिला. अखंड भारतभर पदयात्रा केली. डोळस दृष्टीनं सूक्ष्म अवलोकन केलं.
नि:संग, ब्रह्मचारी विनोबांचा संसार हा 'अवघे विश्वचि माझे घर' या पायावर ठामपणे उभा होता. 'हिंदुस्थानातले सर्व लोक अज्ञान राहू नयेत, त्यांना लिहिलेलं वाचता यायला हवं. वाचलेलं आकलन व्हायला हवं. आकलनाप्रमाणे आचरण व्हावं, ही त्यांची तळमळ होती. विद्यादानाप्रमाणेच स्वातंत्र्य, समता व बंधभावाचं वर्धन होणारं वर्तन त्यांना अपेक्षित होतं. म्हणून त्यांनी 'भूदान' हा महायज्ञ सुरू केला. तरच समाजउन्नती शक्य आहे, हे त्यांचं प्रामाणिक मत होतं.
ते म्हणत,"भूदान' हे एकच सामाजिक उन्नतीचं 'निदान' आहे. जसं निदान जाणल्याखेरीज उपचाराला दिशा सापडत नाही, तसाच उपचार करणारा वैद्यही चांगला हवा." त्या कामाला समाजाची नाडी ओळखणारा विनोबाजींखेरीज दुसरा समंजस वैद्य दुसरा कोण असणार? माणसांच्या पिढ्यानपिढ्या नष्ट होतात; पण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली जमीन शिल्लकच राहते. विद्या लपविल्यास नाश पावते, तसं जमिनीबद्दलही म्हणता येईल.
म्हणून जमीन मुक्तहस्तानं द्यावी, अशी विचारसरणी ते लोकांपुढे ठेवत. सर्वच सामाजिक रोगांवर भूदान व विद्यादान हे रामबाण औषध आहे, असं विनोबाजी आग्रहानं प्रतिपादन करत. या महामानवाचं या महादानातलं योगदान म्हणजे महायज्ञच महर्षिचा!
शिक्षणाचा सर्वांगांनी साधकबाधक विचार करताना विनोबांनी अंत:शिक्षणावर भर दिला. ते भावरूप असून बाह्यशिक्षण अभावरूप आहे, असे ते मानत. 'अंतरीचे भावे स्वभावाबाहेरी' अशा रीतीने जे येते, तेच शिक्षण. कोणत्याही पद्धतीशिवाय जे पद्धतशीर बनते, कोणताही गुरू जे देऊ शकत नाही, तरीसुद्धा जे दिले जाते, असे शिक्षणाचे स्वरूप विनोबांना अभिप्रेत आहे.
गांधीजींच्या 'नई बुनियादी सलीम'ला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. कारण तिच्यात उत्पादनक्षमता आहे, ती आपल्या देशाला परवडणारी होती. पूज्य विनोबांच्या मते 'सच्चिदानंद' हा शिक्षणाचा मंत्र होता. सूर्य जसा प्रकाश देत नाही, तर स्वाभाविकपणेच त्याच्यापासून प्रकाश मिळत असतो, तसा खरा शिक्षक शिक्षण देतच नाही, तर स्वाभाविकपणे त्याच्यापासून शिक्षणच मिळत असते, अशी आचार्यांबद्दल त्यांची धारणा होती. ते स्वत: एक आदर्श आचार्यांचा मूर्तिमंत वस्तुपाठ होते. शिक्षक हे स्वत: एक सिद्ध शिक्षणकेंद्र असावे. शिक्षक हा साऱ्या देशाचे बुद्धी व हृदयाचे माहेरघर असावे.
शिक्षक जर बाल होऊ शकत नसेल, तर तो शिक्षण देऊ शकत नाही आणि बाल जर मोठा होऊ शकत नसेल तर तो शिक्षण घेऊशकत नाही, अशी विनोबांची धारणा होती. सामान्य योगी व स्वावलंबी विद्यार्थी तयार व्हावेत, ही त्यांची विचारसरणी होती. चारित्र्यनिष्ठा ईश्वराविषयी श्रदधा आणि देहभिन्न आत्म्याचे स्थान (भान) हे धर्म-सार आहे. म्हणून शीलवान शिक्षकांची योजना त्यांनी पुढे केली. धार्मिक शिक्षणास अनुभवाच्या कसोटीवर त्यांनी पारखले.
स्त्रिया मुलांना वाढवणार म्हणजे राष्ट्राला वाढवणार. त्यांच्याजवळ ज्ञानाची किल्ली हवी. त्यांनी पुरुषांचे नियंत्रण करावे. शिक्षिका बनून धर्मशिक्षण द्यावे म्हणजे भक्ती, मुक्ती, नीती आणि शक्तीचे वातावरण निर्माण होईल.
आज प्रौढ शिक्षणाच्या क्षेत्रात जी चळवळ देशभर उभारली जात आहे, तिची मुहूर्तमेढ खरेतर फार पूर्वी गांधी-विनोबांनी घातली होती. पूर्ण विकासाची बंद द्वारे खुली करण्यासाठी, जनता उद्योगशील आणि विचारशील बनवण्यासाठी प्रौढ शिक्षण साऱ्या देशात सक्तीचे करावे, असा विचार फार पूर्वीच त्यांनी मांडला होता. सुशिक्षित तरुणांनी हे राष्ट्रीय कार्य खेडोपाडी जाऊन करावे म्हणजे प्रौढांचा बौद्धिक विकास साधताना त्यांच्या मूलभूत गरजा व उद्योगाकडे दुर्लक्ष होणार नाही.
आपला देश हे सर्वधर्मीयांचं सुसंघटित प्रतिष्ठान आहे. भिन्न भाषा, जाती व धर्म गुण्यागोविदानं नांदावेत, राष्ट्रप्रेमाच्या भावनेनं एकत्र बांधले जावेत, म्हणून 'राष्ट्रभाषा' हा एक उत्तम पर्याय असतो. म्हणून विनोबांनी बोलण्यास सुलभ 'हिन्दी'ला तो दर्जा दिला, कारण ती शांतीचा मंत्र शिकवते. म्हणून तिला उज्ज्वल भविष्य आहे, असे ते म्हणत. हिन्दी विनयशाली व नम्र आहे. त्यांच्या मते, हिन्दी'च खऱ्या अर्थानं लोकनीतीचे वाहक बनण्यास समर्थ राष्ट्रभाषा आहे, असा हा संबंध राष्ट्रभाषा नि राष्ट्रपुरुषाचा!
“गीताई माणली माझी तिचा मी बाळ नेणता
पडता, रडता घेई उचलुनि कडेवरी ॥"
म्हणणारे कर्मयोगी विनोबा राष्ट्रसंत होते, राष्ट्रपुरुष होते, राष्ट्रीय शिक्षक होते. गांधीजींचे डोळस पुरस्कर्ते होते, राजा हरिश्चंद्राचा वारस होते. प्रखर साधनेचा सारांश होते. ब्रह्मचर्य-वैराग्याचे महामेरु होते. भूदान-महायज्ञाचे प्रवर्तक होते.
नवसमाजरचनेचे उद्गाते होते. आधुनिक शिक्षणातले तज्ज्ञ होते. भारतभाग्यविधाते होते. सत्याग्रहाचे अनुयायी होते. पवनारचे पूज्य प्रणेते होते. दूरदृष्टीचे थोर तत्त्ववेत्ते होते आणि म्हणूनच विनोबा एक ‘महामानव' होते.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद