बहिणाबाई चौधरी मराठी निबंध | bahinabai chaudhari nibandh in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बहिणाबाई चौधरी मराठी निबंध बघणार आहोत. "एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीने हे (काव्य) सारे रचलेले आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावील, असा चमत्कार आहे;"असं विधान कै. बहिणाबाई चौधरीविषयी आचार्य अत्र्यांनी ३ डिसेंबर १९५२ ला बहिणाबाईंची गाणी' या बहिणाबाईंच्या काव्यसंग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत केलेलं आहे.
काव्यसृष्टीतला हा चमत्कार खरोखरच 'माय सरसोतीनं लेक 'बहिनाच्या' मनी पेरलेली गुपित'च आहे ! कागद अन् शाईचा स्पर्शही न झालेल्या 'कबीराची वंशज' शोभावी, अशी कवयित्री म्हणजे बहिणाबाई !!
प्रतिभा ही कुणा सुशिक्षित विचारवंताची जहागिरी नसते, हेच खरं. प्रतिभेचा साक्षात्कार हा नैसर्गिक असतो आणि ज्याचं अंत:करण शुद्ध नि आत्मा पवित्र असतो, त्यालाच तो होतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बहिणाबाई.
संस्कार, उच्च विचार हे केवळ शिक्षणानेच येतात, अशा परंपरागत विचारांना छेद देणारं हे सोज्ज्वळ अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे.
सगळ्याच जुन्यानव्या कवींमध्ये, त्यांच्या कवितांमध्ये सरस ठरावं असं खास खानदेशी शैलीतलं/बोलीभाषेतलं हे लेणं शारदामातेच्या दरबारी मान्यता पावलं, श्रेष्ठ ठरलं. कालच्या ग.ल. ठोकळांपासून (मीठ-भाकर) आजच्या विठ्ठल वाघांपर्यंत (तिफन) ग्रामीण ढंगाची/ढबाची एकूणच मराठी कविता बघू जाता, कै. बहिणाबाईंची कविता आपलं स्वत्व अन् आगळेपणानं आपलं स्थान एखाद्या संत/स्वयंभू अपौरुषेय काव्यासारखं जपून आहे. ती उत्स्फूर्त उद्गाराची, ताजी नि जिवंत चित्रणाची उद्गाती आहे. तिची वैशिष्ट्यं एक शोधावं, तेव्हा दुसरं हाती येतं, अशी वाचकाची, रसिकाची गत (अवस्था ) करून सोडणारी आहेत.
बहिणाबाईंच्या शब्दांची, काव्याची जातकुळीच निराळी आहे. हे शब्द अंत:करणाला/काळजाला हात घालतात, कारण आमच्या दैनंदिन गोष्टींचं घर, दार, चूल, नातेसंबंध, देव, पेरणी, अक्षय्यतृतीयेसारखे सण, जीव, माहेर-सासर अन् अशांसारख्या कित्येक बाबींचं सहज, साधं, नेमकं तरीही तत्त्वज्ञानाची बैठकसुद्धा असलेलं वर्णन फार विरळपणे, एकत्रितरीत्या मराठी कवितेत आढळतं, जे बहिणाबाईंनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या सिद्ध वाचेवाटे स्रवू दिलं, याचं खरं अप्रूप वाटतं!
काव्यातल्या अधिकारी व्यक्तीपासून, समीक्षकांपासून तर साध्याभोळ्या खेडुतापर्यंतही एकाच भावनेने, सारख्याच परिमाणाने थेट हृदयाला हात, हाक घालते. भावते, पटते. कुठेतरी आपल्या व या कवितेतल्या भावार्थाची नाळ जुळल्याचा आनंद होतो आणि हेच खरं झिरपणं आहे कवितेचं. रसिकाच्या मनातनं याचा दुर्लभ प्रत्यय येतो! त्यामुळे या किमयागाराला... बहिणाबाईला आपण मराठी काव्यसृष्टीतला 'चमत्कार' मानतो आणि बहिणाबाईंच्या गाण्यांना 'चमत्कृति' समजतो.
'अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर' हे गाणं तुमच्या-माझ्या घराघरात का पोहोचल? ओठांवर आपोआप कसं आलं? याचं कारण काय? झुळझुळ झऱ्याची निर्मळता लाभलेल्या या सहजसोप्या असामान्य कवितेत जेव्हा कवयित्री, 'मानसा, मानसा, कधी व्हशील मानूस !' असं पोटतिडिकीने म्हणते, तेव्हा तिची उंची आपोआप कळते. मानवतेचा मूलभूत प्रश्न काव्यातनं असा मांडलेला क्वचितच आढळतो.
अहिराणी भाषेचा गोडवा कायम ठेवून या कवितेच्या निमित्तानं मराठी सारस्वतात खानदेशाला मिळवून दिलेलं मानाचं स्थान हा आम्हांखानदेशवासीयांवर आणि त्याचवेळी मराठी भाषेवरही ऋणनिश्चितीचाच प्रकार ठरावा.
दंतकथा, आख्यायिका आणि लोकसाहित्य यांचं रम्य एकजिनसी असं मिश्रणही बहिणाईंच्या काव्यात आढळतं.
जात्यावर दळतादळता किंवा शेतात काही काम करताकरता साध्या शब्दांचा वापर करून एखादी घटना वा विचार कवितेतनं लक्षणीय सुंदरतेनं मांडताना कवयित्री संसारा'ची गाणी गात होती. ज्या कुणी ती कागदावर उतरून घेतली, त्यांची मराठी भाषा ऋणी राहील.
'खोकली माय'सारख्या कवितेतनं सहानुभूती आणि करुणरसाचा बेमालूम मिश्रण देणारा विनोद, 'भिवराई', 'छोटू भैया'सारख्या व्यक्तिचित्रातही आढळतो. 'ताड व भुइरिगणीचं झाड' ही विजोड जोडी असो वा जात्यातनं पीठ येते, तरी त्याला 'जाते' म्हणणं किंवा आड ‘उभा' असणं अशी उपरोधातनं विनोदनिर्मिती करणं हा काव्यखेळ बहिणाबाई सहजी-लीलया खेळताना आढळतात. हाही एक चमत्कारच नाही काय?
जीवन म्हणजे 'हिरिताचं देनं घेनं' असं त्या म्हणतात, तेव्हा त्यांची संतवाङ्मयाशी जुळणारी नाळ बरंच काही सांगून जाते, तर ‘मना'च्या श्लोकात जे संत रामदासांनी मांडलंय, त्याहून कितीतरी अधिक बहिणाबाई मनासंबंधी सांगून गेल्या आहेत. घटक्यात जमिनीवर घटक्यात आभाळात जाणारं पाखरू म्हणजे मन विंचूसापेक्ष... जहरी आहे, तर ईश्वराला जागेपणी पडलेलं स्वप्न म्हणजे मन, उभ्या पिकातलं 'वढाय' ढोर, ‘मोकाट', 'लहरी', 'चप्पय' असून तेच तर मन आहे, जे खसखसच्या दाण्याएवढं लहान, तर कधी आभाळाहून मोठं आहे....
जसं मनाचं, तसं संसाराचंही वर्णन त्यांनी आपल्या ओघवत्या; पण ओजस्वी शैलीत केलंय. प्रथम चटका, नंतर भाकर देणाऱ्या तव्यासारखा, कधी खोटा नसलेला प्रत्ययकारी, गळ्यात पडलेला, 'लोटनं' नसणारा खोऱ्याचा वेल, मध्ये गोडंबी, वरून भिलावा; आत सागरगोटे आणि वर काटे; दु:खाला होकार, सुखाला नकार देणारा दोन जीवांचा विचार, सुख-दु:खाचा व्यापार, जादुगार... असं कितीतरी प्रकारे संसाराची प्रतिमा हुबेहूब उभी करण्यासाठी कवयित्री यशस्वी प्रयत्न करते. एका अर्थानं तिच्यातला तत्त्वज्ञ - मानसशास्त्रज्ञ बरंच काही सांगत/ शिकवत राहतो. त्यांच्याच शब्दांत सांगायचं म्हणजे (त्यांच्या) “मस्तकातलं (ह्या) पुस्तकात गेलं (आणि); पुस्तकातलं (आमच्या) मस्तकात आलं!"
घाम जिरवला की काळीतून हिरवं उगेल, नंतर पिवळं सोनं पिकेल. मोघडापेरणीचा चौघडा, औत- कमाईला ऊत, तिफन- शेताचं मापन, वखर- मायेची पाखर, नागर- सुखाचं आगर, पेरणी- देवाची करणी अशी शाब्दिक नैसर्गिक करामतीची पेरणी कवयित्री करीत राहते.
ही कविता जुन्यासह नव्याचंही स्वागत करताना आढळते. सूक्ष्म निरीक्षण, प्रतिमेची देणगी व बहुश्रुतपणा यांनी बहिणाबाईंच्या कवितेला बहुपरिमाणं लाभत गेली. त्याशिवाय त्यांनी “देवानं सरकीला कसा पांढरास्वच्छ पोशाख नेसवून पाठवलं; पण माणसानं तिला नागडी केली आणि तिचे वस्त्र तो आपण स्वत:च नेसू लागला!" असं विधान केलंय. त्यामुळे आचार्य अत्र्यांच्या मते, अर्वाचीन मराठी साहित्याला प्राचीन मराठी साहित्याचे वैभव अन् प्रतिष्ठा बहिणाबाईंनी प्राप्त करून दिली आहे.
त्या मृत्यू आणि जीवनाचं सुंदर वर्णन करतात. तसेच मृत्यूनं त्या गांगरून न जाता धीरानं त्याला तोंड देतात. जगण्यामरण्यात फक्त एका श्वासाचं अंतर त्या दाखवून देतात. विधवा झाल्यावर 'झाड गेलं निघीसनी, माघे सावली उरली असंम्हणून मनगटीच्या कर्तृत्त्वावर विश्वास ठेवून म्हणतात, 'जरी फुटल्या बांगड्या, मनगटी करतूत, तुटे मंगयसूतर, उरे गयाची शपथ!' त्यांनी - 'अरे, होतो छापीसनी, कोरा कागद शाहना'सारख्या ओळींनी वा 'मी'पणाची मरीमाय, सोता सोतालेच खाय' किंवा 'माय म्हनता म्हनता ओठ ओठालागी भिडे, आत्या म्हनता म्हनता केव्हडं अंतर पडे' अशा विधानांनी माय सरस्वतीच्या दरबारात ही जी संपन्नता आणली आहे, ती बहिणाबाई स्वत:च एक 'चमत्कार' असल्यामुळेच !!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद