बारावीचे वर्ष संपताना मराठी निबंध | baraviche varsha samptana marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण बारावीचे वर्ष संपताना मराठी निबंध बघणार आहोत. बारावी कॉमर्सच्या परीक्षेची तारीख जाहीर झाली होती. वर्षाच्या सुरवातीपासून मी व्यवस्थित अभ्यास केला होता. बारावीनंतर माझे भवितव्य काय? याची चर्चा आई-बाबा-दादा यांच्यात मात्र अधूनमधून होत होती. आईला वाटत होते मी लॉ'कडे जाऊन अॅडव्होकेट व्हावे.
तिचे आजोबा वकील होते. त्यांचा रुबाब तिला आठवत होता. 'तू अॅडव्होकेट हो' असा ती माझ्यामागे धोशा लावत असे. बाबा बँकेचे शाखा व्यवस्थापक होते. त्यांची नोकरीची वर्षे आता संपत आली होती. मी नोकरी करत करत शिकावे. जे जमेल ते करावे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. तरीसुद्धा उच्च शिक्षण घेण्यास त्यांचा विरोध नव्हता.
दादाने बँकेकडून कर्ज घेऊन इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे छोटेसे दुकान काढले होते. दुकानाचा व्याप वाढत होता. दादाला मदतनीस हवा होता. म्हणून मी त्याला धंदयात मदत करावी असे त्याला वाटत होते. सगळ्यांची मते ऐकताना माझा मात्र प्रचंड गोंधळ उडत होता.
समोर अनेक मार्ग असावेत; पण कोणत्या मार्गाने गेले असता आपण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोचू ते कळत नव्हते. कोणालाच दुखवावेसे वाटत नव्हते व कसल्यातरी दडपणामुळे आपले विचारही मोकळेपणी बोलून दाखवावेसे वाटत नव्हते. मला एम्. कॉम्. करून कॉलेजात प्राध्यापक व्हायचे होते. पुस्तके घेऊन या वर्गातून त्या वर्गात जाणाऱ्या किंवा लायब्ररीत पुस्तक वाचण्यात गढून गेलेल्या प्राध्यापकांमध्ये मी नेहमी माझे प्रतिबिंब बघत होतो.
आज परीक्षेची तारीख जाहीर झाल्यावर घरात ही चर्चा सुरू होईल असे वाटले. मी घरातून बाहेर पडलो. कॉलेजकडे वळलो. आमचा अभ्यासक्रम केव्हाच शिकवून संपला होता. पण आज आमचे अर्थशास्त्राचे सर वर्गात एक चर्चासत्र घेणार होते. मी अर्थमंत्री होऊन कॉलेजचा 'अर्थसंकल्प' तयार करणार होतो व त्याचे वाचन वर्गात करणार होतो. वर्गातील काही विदयार्थी विरोधी पक्षाचे नेते होऊन चर्चा करणार होते. तास सुरू झाला.
मी धडधडत्या अंत:करणाने प्लॅटफॉर्मवरील टेबलाजवळ उभा राहून वाचू लागलो. सर मागील बाकावर बसले होते. सर आणि माझे वर्गमित्र माझे वाचन बारकाईने ऐकत होते. सरांच्या चेहऱ्यावरील अनुकूल बदल पाहून मला वाचायला हुरूप वाटत होता. मुलांनी घेतलेल्या आक्षेपांना मी व्यवस्थित उत्तरे देत होतो. मी जेथे अडखळत होतो, तिथे सर मदत करत होते.
तास संपला. सर पुढे आले. पाठीवर शाबासकी देऊन त्यांनी माझे कौतुक केले. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. यातून आपल्या भारताला भविष्यकाळात एक चांगला अर्थशास्त्रज्ञ मिळेल असे आपण समजू या, " अशी माझी जरा जास्तच स्तुती त्यांनी केली. त्यांनी सर्वांना उद्देशून परीक्षेत सुयश चिंतिले. ते म्हणाले, "लक्षात ठेवा नेपोलियनच्या शब्दकोशात 'अशक्य ' हा शब्दच नव्हता. तेव्हा हाती घ्याल ते तडीस न्या. यश खेचून आणा. तुमचे स्वतःचे आणि महाविदयालयाचे नाव उज्ज्वल करा."
सरांच्या आशीर्वादाने जणू काही माझ्या मनातल्या गोंधळालाच उत्तर मिळाले होते. नेमके कोणत्या वाटेने जायचे ते मला चांगले समजले होते. तिथेच माझे स्वप्न माझी वाट पाहत होते.
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- बारावीनंतर काय
- विविध सल्ले
- मला प्राध्यापक होण्याची इच्छावर्गात अर्थमंत्री बनून अर्थसंकल्प सादर करणे
- शिक्षकांची शाबासकी
- आपल्या कुवतीविषयी विश्वास
- प्राध्यापक होण्याचेच निश्चित केले.