दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध | dahashatwad ek samasya marathi nibandh
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज दहशतवाद एक भीषण समस्या मराठी निबंध बघणार आहोत. दहशतवादाच्या भोवऱ्यात संघटित व योजनाबद्ध हिंसाचाराच्या आधारे सामान्य, शांतताप्रिय समाजाला वेठीला धरून आपली उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न म्हणजे दहशतवाद.
काही वर्षांपूर्वी दहशतवाद' हा शब्द फक्त काश्मीर व पंजाब येथे घडणाऱ्या घटनांशी निगडित होता. परंतु गेल्या काही वर्षांतील घटना बघता, हे चित्र झपाट्याने बदलत आहे. १९९२ मध्ये, नंतर २६/११ अशा दोन वेळा मुंबईवर दहशतवादी हल्ले झाले. बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. त्यानंतर कर्नाटक, आंध्र येथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला. पुण्यातील जर्मन बेकरीवर बॉम्बस्फोट केला गेला. एवढेच काय संसदभवनावरही हल्ला झाला. या सर्व घटनांमधून दहशतवादाचे वाढते सत्र लक्षात येते.
धर्माच्या नावाखाली लोकांच्या भावना प्रक्षोभित करून दंगा पसरवायचा, ही दहशतवाद्यांची नीती आहे. याचे उदाहरण म्हणजे दिल्लीत धर्मग्रंथ जाळल्याची अफवा पसरवून औरंगाबाद, पुणे, अहमदाबाद, नांदेड, देवास, कानपूर येथे दंगे उसळले. या दंग्यांमागे दहशतवादी कारस्थान होते. विमान-अपहरणासारख्या अनेक घटना घडल्या.
भारतात आतंकवादी चळवळींनी जन्म घेतला. आसाम व पूर्वांचल राज्यात ३-४ आतंकवादी संघटना आहेत. बोडोलँडसारख्या चळवळी आहेत. काश्मीरमधील अतिरेकी गट वाढतच आहेत. भारताबरोबर जगातील अनेक देशांना दहशतवादाने संकटात टाकले आहे. ११ सप्टेंबर २००१ मध्ये अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वर आतंकवादी हल्ला झाला. ख्यातनाम न्यायमूर्ती नीलकंठ यांना १९८९ मध्ये अतिरेक्यांनी भर बाजारात बेछूटपणे गोळ्या घातल्या.
आपल्या देशातील पंतप्रधानांच्या हत्या या दहशतवादातूनच झाल्या. अफगाणिस्तान अशाच दुष्टचक्रातून जात आहे. काश्मीरमध्ये गेल्या दहा वर्षांत अतिरेक्यांकडून २०,०५३ रायफल्स्, १०९२ मशिनगन्स्, १३०८ रॉकेट लाँचरी, २४३१ रेडिओ सेट्स्, ग्रेनेड्स्, सुरुंग, RDX व अन्य स्फोटके २२, ६३० किलो जप्त केले गेले. या आकडेवारीवरून लक्षात येते की, परकीय सत्ता, देश यांचे आर्थिक बळ पाठीशी असल्याशिवाय दहशतवाद्यांना ही सामग्री मिळविणे केवळ अशक्य.
आज अशा पसरत चाललेल्या दहशतवादाने जगातील अनेक देशांना विविध प्रकारे संकटात टाकले आहे. समाजात दुर्बलतेची भावना, भीती वाढत आहे. सरकारवरील विश्वास उडत आहे. आर्थिक विकासाला खीळ बसत आहे. सर्वसामान्य जनता विचित्र मन:स्थितीतून वाटचाल करत आहे. सर्वांनी एकत्रित येऊन हा दहशतवाद नष्ट करण्याच प्रयत्न केला पाहिजे.
दहशतवाद
दहशतवादाच्या बातम्या रोज आपण वृत्तपत्रांत वाचतो. उदा. पंजाबात चार जणांची गोळी मारून हत्या, मुंबईला बाँबस्फोट झाला, दोन जणांचा मृत्यू चार जण जखमी, काश्मिरात उच्च अधिकाऱ्याचे अपहरण व हत्या, विदेशी पर्यटकांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांच्या मोबदल्यात दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी इ. ते आपल्या स्वार्थासाठी दहशतवाद पसरवितात. आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करतात.
भारतात दहशतवादाची समस्या काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आहे. काश्मीर, पंजाब, आसाम, बिहार, नागालँड इत्यादी राज्यांत दहशतवादाची समस्या खूपच गंभीर बनली आहे. दहशतवाद वर्तमानकाळात, आज अस्तित्वात आला असे नसून त्याला प्राचीन परंपरा आहे. पूर्वकाळातील शक, हूण, अरब, मोगल, इंग्रज यांनी भारतात दहशत पसरविली.
दहशतीच्या आधारे या लोकांनी भारतावर राज्य केले आणि सोन्याची चिमणी समजल्या जाणाऱ्या या देशाला भिकेला लावले. हळूहळू भारतीयांमध्ये दहशतवादाबद्दल चीड निर्माण झाली. त्यांनी संघटित होऊन दहशतवादाला विरोध केला आणि इंग्रजांना पळवून लावले.
आज दहशतवादी तोंडाला काळे फडके बांधून हातात स्वयंचलित हत्यारे घेऊन निघतात आणि निःशस्त्र लोकांवर वार करतात. यात किती तरी मातांचे पुत्र, भगिनींचे भाऊ त्यांच्यापासून हिरावून घेतले जातात. संध्याकाळ होताच गल्लीबोळांत स्मशान शांतता पसरते. लोकांचे दैनंदिन जीवन अस्ताव्यस्त होते आणि मनात मृत्यूच्या भयाची छाया असते. व्यापार उद्योग बंद पडतो व देशाची आर्थिक प्रगती थांबते.
दहशतवाद एखाद्या वाळवीप्रमाणे आहे जो आतल्या आत देशाला खाऊन टाकीत आहे. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संसर्गजन्य रोगाप्रमाणे पसरत चालला आहे. सरकारने दहशतवादापासून सुटका करून घेण्यासाठी काही ना काही ठोस उपाय अवश्य योजले पाहिजेत. चार सहा महिन्यांनी राज्यपाल बदलणे, दहशतवादी कारवाया वाढताच त्याठिकाणी सेना पाठविणे हा या समस्येवरील उपाय नव्हे.
ज्या ज्या वेळी दहशतवाद दडपण्यात आला त्या त्या वेळी देशाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. याला इतिहास साक्षीदार आहे. पंजाबातील दहशतवाद संपविण्यासाठी इंदिरा गांधींनी खंबीर पावले उचलली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. मे १९९१ मध्ये राजीव गांधींच्या हत्येसाठी लिट्टेला दोषी मानले जाते. अत्यंत कडक अशी सुरक्षा व्यवस्था असूनही पंतप्रधानाची हत्या होणे.
आमच्या सुरक्षाव्यवस्थेतील उणीवांना उजेडात आणतात. जगात दोन प्रकारची शासन व्यवस्था मुख्यत्वेकरून अस्तित्वात आहे. एक म्हणजे लोकशाही आणि दुसरी हुकूमशाही. लोकशाहीत दहशतवादाला जागा नाही पण हुकूमशाहीत ती आहे. हुकूमशाही शासन पद्धती असलेले अनेक देश जगात आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतात लोकशाही स्थापन झाली.
अमेरिकेचे राष्ट्रपती अब्राहम लिंकन यांनी "लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेली प्रशासन व्यवस्था म्हणजे लोकशाही" अशी व्याख्या केली होती. याचे तात्पर्य असे की, यात कोणत्याही व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही. जनताच मालक आणि जनताच सेवक! जर जनतेला असे वाटले की तिच्या अधिकारांचे हनन होत आहे तर ती सरकारला हटवू शकते.
ज्याप्रमाणे १९७७ मध्ये काँग्रेसला हटवून जनता पक्षाला सत्ता प्राप्त झाली. या परिवर्तनशील जगात काहीच एकसारखे असत नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हळूहळू लोकांची मानसिकता पण बदलली. १९७९ मध्ये विधानसभा बरखास्त झाल्यावर गुजरातमध्ये आणि १९७५ मध्ये बिहार प्रांतात दहशतवादी कारवायांनी उग्र स्वरूप धारण केले. आता तर असे प्रतीत होते की जणू सारा भारतच दहशतवादाच्या विळख्यात सापडला आहे.
दहशतवाद अचानक आला नाही. त्याच्या जन्माची अनेक कारणे आहेत. मुख्य कारण आहे तरुणांमध्ये शासनव्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण होणे, कोण्या बुद्धिजीवी वा नेत्याने आपल्या इच्छापूर्तीसाठी तरुणांना हाताशी धरणे व आपल्या स्वार्थसिद्धीचे साधन बनविणे त्यांच्या साह्याने दंगे , मारामाऱ्या, लुटालूट, हत्या घडवून आणून समाजात, देशात, भय आणि दहशत पसराविण्याचे कार्य करणे यातूनच दहशतवादाचा जन्म होतो.
दहशतवादाचे दुसरे कारण बेकारी आणि गरिबी हे आहे. उच्च शिक्षण घेऊनही जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा तरुणांमध्ये नैराश्य येते. शासनव्यवस्थेबद्दल त्यांच्या मनांत चीड निर्माण होते व योग्य मार्गदर्शनाअभावी शास्त्राच्या ठिकाणी शस्त्र धारण करून ते दहशतवादी बनतात. दहशतवाद वाढविण्यात गरिबीचा सिंहाचा वाटा आहे. हे दहशतवादी कुणाचे शत्रू नसतात. पोट भरण्यासाठी, थोड्याशा पैशांसाठी देशात तणाव पसरविण्यासाठी ते तयार होतात.
कित्येकदा जास्त पैसा मिळविण्याच्या लालसेपोटी कित्येक-जण दहशतवादी बनतात. जेव्हा समाजातील एखादा विशिष्ट वर्ग आपले म्हणणे मान्य करण्यासाठी सरकारवर दबाव टाकतो आणि जेव्हा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. त्यांच्या मागण्या मान्य करीत नाही तेव्हा तो तोडफोडीला सुरवात करतो. त्यामुळे सरकार आणि जनतेचे लक्ष त्यांच्याकडे वेधले जाते. अशा रुष्ट झालेल्या नवयुवकांना शेजारी देश पण मदत करतात. भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानचा हात आहे हे सिद्ध पण झालेले आहे.
स्फोटके, हत्यारे त्यांना ते पुरवितात. त्याचबरोबर त्यांना हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण देतात. आर.डी.एक्सच्या प्रयोगामुळे दहशतवाद्यांची मारक क्षमता खूपच वाढली आहे. - हे दहशतवादी कोणत्याही प्रकारच्या समझोत्यासाठी, तडजोडीसाठी तयार होत नाहीत. त्यांचा उद्देश निरपराधी लोकांची हत्या करणे, त्यांचे अपहरण करणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे, देश-विदेशांत राष्ट्रविरोधी प्रचार करणे व त्यांची सहानुभूती मिळविणे, तरुणांना पथभ्रष्ट करून राष्ट्रविरोधी कारवाया करणे हा असतो.
दहशतवाद असाच वाढत राहिला तर एक दिवस आपला देश खंडित होईल. म्हणून सरकारने संसदेच्या चार भिंतीत भांडणे, वादविवाद न करता दहशतवादाचा कठोरपणे विरोध केला पाहिजे. स्वार्थी राजकारणी, बुद्धिजीवींनी शासन करून त्यांना धडा शिकविला पाहिजे. उच्चशिक्षित तरुणांच्या रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे. कुटिरोद्योग व हस्तोद्योग सुरू करुन बेकारीची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
शेजारी देशांनी चालविलेल्या दहशतवादी कारवायांना तोडीस तोड उत्तर दिले पाहिजे. जे दहशतवादी शरण येण्यास तयार असतील त्यांच्याबाबत उदार धोरण अमलात आणले पाहिजे आणि उरलेल्यांना कठोर शिक्षा देण्यात आल्या पाहिजेत. सीमेवरील घुसखोरी थांबविण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही कठोर शासन व्हावे.
जर आत्ताच दहशतवादी कारवाया कठोरपणे न थांबविल्या तर आपले आणि देशाचे भविष्य अंध:कारमय होईल. 'शठेशाठ्यम समाचरेत' अर्थात दुष्टांबरोबर दुष्टांसारखेच वागणे हीच नीती आहे या सिद्धांताप्रमाणे दहशतवादरूपी नागाला मारलेच पाहिजे तरच भारत सुखी होईल आणि प्रगतिपथावर अग्रेसर होईल.
दहशतवाद
संपूर्ण जगासाठी एक नव्या स्वरुपातील आव्हान हा वाद! नव्या स्वरुपातील याकरिता की दहशतवाद नवीन नाही. त्याचे केवळ स्वरुप बदललेले आहे. दहशतवाद पूर्वी होता. आजही आहे. मनुष्य जन्माला आल्यापासुन संघर्ष करतो. आपल्या जगण्यासाठी ; अस्तित्वासाठी; अस्मितेसाठी. जगण्यासाठी जेव्हा तो धडपडतो तेव्हा तो संघर्ष करत असतो परंतू अस्मितेसाठी जेव्हा तो संघर्ष करतो तेव्हा कधी कधी दहशतवाद ठरतो.
त्या संघर्षाकडे पाहण्याची प्रत्येकाच्या दृष्टीने ती अस्मितेची लढाई आहे. परंतु त्यांच्या दहशतवादाला नाहक बळी पडणाऱ्या निरपराधाकरिता तो दहशतवादच आहे. इतिहासात डोकावून पाहिले तर असे लक्षात येते की पूर्वी लढाया व्हायच्या. लढाया अनेक कारणामुळे व्हायच्या परंतु त्यातील एकाचा दहशतवाद असायचा तर दुसऱ्यासाठी ती अस्तित्वाची लढाई असायची. अस्मितेची लढाई असायची. तेव्हा अपराधाबरोबर नीरपराधांचा सुद्धा बळी जात होता. आणि म्हणून निरपराधा करिता लढाई म्हणजे एक प्रकारचा दहशतवाद होता. दहशतवाद! या शब्दाचे नामकरण नवे आहे परंतु जन्म मात्र केव्हाचा झालेला आहे.
आज संपूर्ण जग दहशतवादाच्या समस्येत होरपळत आहे.घरुन बाहेर गेलेला माणूस घरी परत येईल ह्याची खात्री वाटत नाही.प्रचंड भिती व दहशतीत माणूस जगतो आहे.जवळ-जवळ सर्व देशात ह्याची लागण झालेली आहे.दररोज नवनविन दहशतवादी कारवायांच्या बातम्या कानावर येतात.बाँबस्फोट,अपहरण,हत्या,सामुहिक कत्तली इ. घटना घडत असतात.
दहशतवादाची अनेक कारणे आहेत. त्यापैकी धर्मवेडेपणा,सत्तास्पर्धा,साम्राज्यविस्तार,बेरोजगारी, ही काही ठळक कारणे आहेत. धर्म हा मानवाच्या कल्याणासाठी असतो. धर्म संस्थापकांनी धर्माची स्थापना केली ती मानवाच्या कल्याणासाठी. परंतु त्याचा खरा अर्थ न समजल्यामुळे अनुयायांनी नव्हे भक्तांनी त्याचा चुकीचा अर्थ घेऊन मानवाच्या विनाशाकडे वाटचाल सुरु केली.
कोणताही धर्म हिंसेला मान्यता देत नाही. परंतु तरीही चुकीच्या अर्थामुळे धर्मवेडे लोक हिंसा करतात.धर्मासाठी, सत्तेसाठी मानवाने, जर दहशतवाद थांबविला तर जगातील ५०% समस्या सोडविल्या जातील. एकीकडे ईश्वर एकाच आहे असा प्रचार करायचा तर दुसरीकडे अनेक धर्माच्या स्थापना करायचा अशा अगदी चुकीच्या व वेड्या भ्रमात मनुष्य गुरफटला आहे.
मालिक ने तो हर इन्सान को इन्सान बनाया।
हमने उसे हिंदु या मुसलमान बनाया।।
कुदरत ने तो बक्षी थी हमे एक ही धरती।
हमने कही भारत कही इरान बनाया।।
वरील चार ओळी एका हिंदी गाण्यातील आहेत. ओळी चार आहेत परंतु चारशे पानाच्या धर्मग्रंथाची बरोबरी करण्याची ताकद त्या ओळी मध्ये आहे. त्याचा अर्थ जर आम्ही नीट लक्षात घेतला तर दहशतवाद मिटायला फारसा वेळ लागणार नाही.
चला, तर वरील कडव्याचा अर्थे लक्षात घेऊन माणूस बनुया!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद