मानव मंगळावर पोचला तर मराठी निबंध | manav mangal var pochala tar marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मानव मंगळावर पोचला तर मराठी निबंध बघणार आहोत. हा एक कल्पनात्मक प्रकारचा निबंध आहे. कारण अजूनतरी कोणत्याही देशांतील मानवाने मंगळावर आपले पाऊल ठेवले नाही. यात मानव मंगळावर पोचल्यावर कोणत्या नवीन गोष्टी करू शकतो याबद्द्ल माहिती दिली आहे .
भिंतीवरचे कॅलेंडर इ. स. 2040 हा काळ दाखवत होते. मी मंगळावरच्या प्रवासाला निघालो होतो. त्यामुळे आप्तगणांचा निरोप घेण्याचा कार्यक्रम सुरू होता. या सर्वांची परत भेट केव्हा होणार, या विचाराने मन साशंक होते; पण त्याच वेळी एवढ्या मोठ्या कामगिरीसाठी भारताचे प्रतिनिधित्व करायला मिळणार, या विचाराने मी आनंदितही होतो.
मंगळाची विविध छायाचित्रे आता 'नासा'कडे गोळा झाली आहेत. त्यांच्या संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की, मंगळावर काही वर्षांपूर्वी मनुष्यवस्ती असावी आणि महाप्रलयामुळे ती नष्ट झाली असावी. पण मंगळाची माती ही जीवन व जीव यांची चिन्हे दाखवते. चंद्रापेक्षाही मंगळ हा ग्रह पृथ्वीवरच्या मानवाच्या वास्तव्याला अनुकूल दिसत होता. त्या निष्कर्षानुसारच जगातील सर्व प्रमुख राष्ट्रांचे प्रतिनिधी आज मंगळावर जात होते.
अमेरिकेतील 'नासा केंद्रा'वरील तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आमचा चमू मंगळावरील प्रवासासाठी निघाला. आमच्या चमूत वेगवेगळ्या राष्ट्रांतील पंधरा उमेदवार होते. शिवाय पाच अमेरिकन तज्ज्ञही होते. ते यापूर्वी पाच वेळा मंगळावर जाऊन आलेले होते. आमचे 'मार्स सर्व्हेअर' उडाले आणि खरोखरच पृथ्वीशी असलेला आमचा थेट संपर्क तुटला!
अलगद कापसाच्या गादीवर उतरावे, तसे आम्ही मंगळावर उतरलो. प्रथमदर्शनीच आम्हांला एक आश्चर्य दिसले. त्यावेळी पश्चिमेला आणि पूर्वेला दोन्हीकडे चंद्रोदय होत होता, हे कसे? तेव्हा मला आठवले की, मंगळाला दोन चंद्र आहेत. अनेक बाबतीत मंगळ व पृथ्वी यांच्यात बरेच साम्य होते; बहीण-भावासारखे साम्य! पण पृथ्वीसमोर मंगळ हे चिमुकले बाळ आहे. पृथ्वीच्या केवळ ११ टक्के वस्तुमान आणि पृथ्वीच्या त्रिज्येपेक्षा थोडा जास्त म्हणजे ६८०० किलोमीटर व्यास. मंगळाच्या मातीत असणाऱ्या जास्त प्रमाणातील आयर्न ऑक्साइडमुळे मंगळ लाल दिसतो.
मग आम्ही सारे पृथ्वीवासीय मंगळाची ओळख करून घेण्यासाठी बाहेर पडलो. मंगळावर पृथ्वीसारखेच ऋतुचक्र आहे. फरक इतकाच की, प्रत्येक ऋतूचा कालावधी सुमारे सहा महिन्यांचा असतो. मंगळावरील सृष्टीला 'रौद्रभीषण' हेच नाव योग्य वाटेल. उंच उंच पर्वत आणि खोल खोल दऱ्या यांनी मंगळाचे भूपृष्ठ व्यापलेले आहे. त्यात असंख्य विवरेही आहेत. ऑलेम्पस मॉन्स हे मंगळावरील आणि साऱ्या सूर्यमालेतील सर्वोच्च शिखर ९०,००० फूट उंचीचे आहे.
प्रत्येक राष्ट्राला आपल्या वसाहतीसाठी मंगळावरचा भाग निवडायचा होता. सगळ्या मंगळाची पाहणी केल्यावर मी सर्वोच्च शिखर निवडले. अहो, म्हणजे तेथे 'हिल स्टेशन' उभारता येईल ! पर्यटकांसाठी हॉटेल काढता येईल. कारण जगातील सगळेच पर्यटक पुढे-मागे मंगळावर येणारच! ऑक्सिजन सिलिंडर आणि पाण्याच्या बाटल्या यांचे कारखाने काढण्याचे नियोजनही मी केले. पृथ्वीवर परत गेल्यावर सगळ्या 'मंगळ' असलेल्या मंगळ्यांना आणि ज्यांचा जन्म मंगळवारी झाला आहे त्यांना मंगळावर पाठवावे, असे मी भारत सरकारला सुचवणार होतो.
इतक्यात आपल्याला कोणीतरी हाक मारत आहे, असे माझ्या लक्षात आले. डोळे उघडून पाहिले तर आई मला उठवत होती. ती म्हणाली "अरे, असं काय सारखं मंगळ मंगळ' करतोस?"
म्हणजे मी स्वप्नात मंगळावर भरारी मारून आलो तर...!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद
महत्वाचे मुद्दे :
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
- विज्ञानाच्या साहाय्याने विकास
- पृथ्वीपलीकडील अवकाशाविषयी कुतूहल
- चंद्रावर पाऊल ठेवले
- आता मंगळाकडे लक्ष
- पृथ्वी अपुरी पडतेगरजेतून शोध
- मंगळावर व्हायकिंग यान पोचले
- वास्तवाशी संबंधित कल्पनारंजनमंगळावरील गुरुत्वाकर्षण
- हवामान- जमीन-मंगळावर सजीव असण्याची शक्यता?
- साहित्यातून निर्माण झालेली मंगळाची प्रतिमा व वास्तव मानवी बुद्धीचा अश्वमेध
- नवे जग