माझी वर्गशिक्षिका मराठी निबंध | Mazi Varga Shikshika Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी वर्गशिक्षिका मराठी निबंध बघणार आहोत. आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये एका वर्गातील विद्यार्थ्यांकडून निरनिराळ्या विषयांचा अभ्यास शिक्षक करवून घेतात. विद्यार्थी त्यामुळे बऱ्याच शिक्षकांच्या संपर्कात येतात. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मनावर शिक्षक शिक्षिकांचा प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. परंतु त्यांचा सर्वात जास्त संबंध आपल्या वर्गशिक्षिकेशी येतो. वर्गशिक्षिका रोज विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतात. प्रत्येक विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती त्यांना असते.
श्रीमती सरोज जोशी माझ्या वर्गशिक्षिका आहेत. भरपूर उंची असणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या असणाऱ्या जोशी बाईंचे वय ३५ वर्षांचे असावे. त्या प्रेमळ आहेत पण बेशिस्त. उद्धट विद्यार्थ्यांना रागावण्यास किंचितही मागेपुढे पाहत नाहीत. त्या आम्हाला संस्कृत शिकवितात. भाषेवर त्यांचे पूर्ण प्रभुत्व आहे. व्याकरण शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. शिकविताना खूप उदाहरणे देतात, त्यामुळे विषय पूर्ण स्पष्ट होतो.
श्लोकांचा अर्थ समजावून सांगताना त्याला पर्यायी मराठी कविता सांगतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत अडचणीही त्या सोडवितात. रिकाम्या वेळात जेव्हा इतर शिक्षिका गप्पा मारत बसतात तेव्हा आमच्या वर्गशिक्षिका वह्या तपासतात किंवा एखादे पुस्तक वा वर्तमानपत्र वाचतात.
आमच्या या वर्गशिक्षिका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या संचालिका आहेत. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्यास त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करतात. शाळेत सगळे त्यांना मान देतात. मुख्याध्यापक पण त्यांच्या कामाची प्रशंसा करतात. त्या सुंदर कविता करतात. त्या मासिकात, वर्तमानपत्रात प्रकाशित होतात. त्यांच्या कविता मला अतिशय आवडतात.
त्यांच्या विषयात विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण मिळवितात, इतकेच नव्हे तर प्रावीण्य मिळवून शाळेला गौरव प्राप्त करून देतात. अशा या जोशीबाई मला खूप आवडतात. त्याच्याविषयी मला आदर वाटतो. मी माझ्या या वर्गशिक्षिकेमुळे इतकी प्रभावित झाले आहे की मला शिक्षिका बनण्याचीच इच्छा आहे.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद