शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध | shahid sainikachya patniche manogat marathi nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शहिद सैनिकांच्या पत्नीचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. 'वधूवरयोः शुभं भवतु सावधान' या शब्दांनी मी भानावर आले. मोगऱ्याचा टवटवीत, धवल, सुगंधित फुलांचा अंतरपाट दूर झाला. मी वीरेंद्रच्या गळ्यात वरमाला घातली. वाजंत्र्यांच्या गजरात, सूर्यनारायण नि अग्निदेवाच्या साक्षीने मी 'देव' यांची गृहलक्ष्मी झाले.
माझे बाबा 'मेजर' च्या हुद्यावर होते. 'वीरकन्या' मी, ' वीरेंद्रशी विवाह म्हणजे सतीचे वाण ! ते मी डोळसपणे स्वीकारलं. 'जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे' हे मला ज्ञात होतं..
वीरेंद्र नावाप्रमाणेच वीर होते. त्यांचं रणांगणावरील रूप प्रलयंकारी रुद्राचं असलं तरी घरात ‘एक कर्तव्यदक्ष, प्रेमळ, नम्र, मनामिळाऊ व्यक्तिमत्त्व' अशी त्यांची प्रतिमा होती. आमचा संसार फुलला, बहरला. सुरेंद्रच्या जन्माने तर आमच्या घरात नंदनवनच अवतरले. त्याच्या बाललीलांचं कौतुक करता करता दिवस अपुरा पडायचा. दहा वर्षे कशी भुर्रकन उडून गेली हे माहीतच नाही पडले .
अधूनमधून त्या सुखसागरात परकीय आक्रमणाचं छोटंमोठं वादळ यायचं. वीरेंद्रना ते आव्हान वाटायचं. शत्रूला धूळ चारून परत आले की नेत्रांच्या निरांजनांनी मी त्यांना ओवाळायची. चिमुरडा सुरेंद्र “मी पण बाबांसारखा शत्रूशी ढुशुम् ढुशुम् करणार" म्हणायचा तेव्हा कौतुकानं ऊर दाटून यायचा. मी मनोमन म्हणायची, “मी जिजाऊ होणार, शिवबाला घडविणार!"
पाकिस्तानी आक्रमणाचं सावट आलं. वीरेंद्रला तडकाफडकी कामावर रुजू व्हावं लागलं. त्यांना औक्षण करताना कुंकुमतिलक लावताना, हात उगाचच थरथरला, दिव्याची ज्योत अकारण फडफडली. मनात शकेची पाल चुकचुकली. वाटलं, हे यांचं अखेरचं दर्शन तर नाही? पण सैरभैर मनाला लगाम लावला, अणूंना बांध घातला, ओठावर उसनं हास्य आणलं नि त्या वीरोत्तमाला निरोप दिला.
माझी अनामिक भीती खरी ठरली. 'लाहोर आघाडीवर शत्रूचे एक सेबरजेट विमान पाडत असता, फ्लाइट लेफ्टनंट श्री. वीरेद्रं देव यांना वीरगती प्राप्त झाली, ही वार्ता वाऱ्यासारखी येऊन थडकली. मृत्यूने त्यांना अमरत्व प्रदान केलं. त्यांच्या स्वागतासाठी स्वर्गाचं दार खुलं झालं. 'जातस्य हि ध्रुवो मृत्युः' हे खरं असलं तरी तो अकाली येणं दुःखदायकच ना? वीरेंद्रना अजून खूप खूप शौर्य गाजवायचं होतं. त्यासाठी उदंड आयुष्य हवं होतं. पण नियतीला ते कुठे मान्य होतं!
सुरेंद्रकडे पाहून पतिविरहाचं दुःख मी गिळून टाकलं. माता आणि पिता या दोन्ही भूमिका मला वठवायच्या होत्या. त्याच्या हृदयात देशभक्तीची ज्योत पेटवायची होती, साहसाचं बीज पेरायचं होतं, पराक्रमाचा अंकुर फुलवायचा होता, आत्मविश्वासाचं बाळकडू त्याला पाजायचं होतं. वीरेंद्रच्या आईबाबांचे प्रेमळ छत्र मस्तकी होते. त्या सावलीत सुरेंद्र लहानाचा मोठा झाला. सैन्यात भरती झाला. शौर्य गाजवू लागला. वीरकन्या, वीरपत्नी नि वीरमाता अशा त्रिवेणी संगमाने माझी जीवनसरिता पावन झाली.
देशकार्यासाठी पती आणि पुत्र अर्पण करून मी समाजाचं ऋण फेडलं. स्वतःचं दुःख उगाळत बसून कधी कर्तव्यविन्मुख झाले नाही. ते वीरेंद्र ना तरी आवडलं असतं का? युद्धाची आघाडी वीरेंद्रनी सांभाळली, घरची आघाडी आमच्या सूनबाईंनी” असं सासूसासरे कौतुकाने सांगतात तेव्हा मला गहिवरून येतं.
-मृदू पुष्पांच्या शय्येवर एखादा काटा टोचावा तसं एक शल्य माझ्या मनाला डाचतं आहे. ते म्हणजे भारतीयांची मानसिकता. स्वांत्र्यप्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी, देशभक्तांनी घरादाराची होळी केली. मायभूच्या रक्षणार्थ जवान शिरतळ हाती घेऊन लढतात पण याची तिळमात्रही जाणीव या बांधवांना नसावी, ही कृतघ्नताच नाही का?
भारतीय नागरिकाचा ,
घास रोज अडतो ओठी ।
सैनिक हो तुमच्यासाठी ।।
हे काव्यामध्ये ठीक आहे पण त्यात वास्तवाचा भाग किती आहे? दुसऱ्याच्या मुखीचा घास हिरावून घेऊन स्वतःच्या पोळीवर तूप ओढून घेणारे नराधम पाहिले की मन उदास होते. 'हे व्यर्थ न हो बलिदान' असं वाटतं. देशाच्या भवितव्याची चिंता जाळू लागते. 'भगतसिंग, सुखदेव, राजगुरु, मदनलाल, सावरकर यांचा हाच देश का? असा प्रश्न पडतो. हे कुठे तरी थांबायला हवं, थांबवायला हवं. देशवासीयांना मला एवढेच सांगायचे आहे.
‘ए मेरे वतनके लोगो, जरा आँख मे भर लो पानी । जो शहीद हुओ है उनकी, जरा याद करो कुर्बानी ॥" जय हिंद!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
युद्धात कामी आलेल्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत
राहुल ‘एअर फोर्स'मध्ये जाणार असं कळल्यावर काल रात्री रागानं आईबाबा- म्हणजे सासुसासरे जेवलेच नाहीत. ते राहुलवर व माझ्यावर खूप रागावले होते. बरोबर आहे त्यांचं! ऐन तारुण्यात त्यांचा एकुलता पुलगा युद्धात मृत्युमुखी पडल्यावर त्यांचं पोळलेलं मन नातवालाही एअर फोर्समध्ये पाठवायला कसं तयार होईल?
मी तरी ते दुःख कसं सहन केलं हे माझं मलाच माहीत. ते १९७१चं वर्ष असावं. आमच्या लग्नाला दोनच वर्षं झाली होती. लग्नापासूनच मी ह्यांच्या आईवडिलांजवळच राहात होते. ह्यांची बदली कलकत्त्याजवळील 'खरगपूर'ला झाली होती. बदलीचे ठिकाण पुण्याहून फार लांब त्यातून 'क्वॉर्टर्स' मिळाले नाहीत म्हणून मी, आईबाबा व छोटा राहुल पुण्यालाच आमच्या ब्लॉकवर राहात होतो.
दर वर्षीप्रमाणे दिवाळीत हे रजा घेऊन आले. चांगली महिन्याची रजा होती. परंतु नेमकी दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी ह्यांना कामावर हजर होण्याची तार आली. सर्वांच्या चेहऱ्यावरचा दिवाळीचा आनंद उडून गेला व त्याची जागा दुःख व निराशा यांनी घेतली. त्या दिवशी पाडव्याला त्यांना जे औक्षण केलं ते शेवटचं औक्षण ठरलं. जाताना 'स्वत:ला जप', 'सर्वांना संभाळ' असं नेहमीप्रमाणे सांगून ह्यांनी आमचा निरोप घेतला.
तोच त्यांचा 'कायमचा' निरोप ठरला. नंतर एक महिन्यानं ह्यांचं चार ओळीचं पत्र आलं. त्यात गावाचं नाव नव्हतं. परंतु त्यांची स्वारी युद्धभूमीवर पराक्रम गाजवीत आहे, युद्धात रमून गेली आहे, एवढं समजत होतं.
भारत - बांगला देश - पाकिस्तान यांमधील युद्धाच्या बातम्या आम्ही रेडिओवर ऐकत होतो. वर्तमानपत्रांतून वाचत होतो. भारतीय सैनिकांचे पराक्रम वाचून अभिमानानं छाती फुगत होती. आणि त्या काळ्याकुट्ट दिवशी पोस्टमन दारात आला. रात्री, अवेळी पोस्टमन पाहून मनात दुःशंकेची पाल चुकचुकलीच! पोस्टमनचा उदास चेहराही बरंच काही सांगून गेला. पाय लटपटू लागले. हात कापू लागले. छातीत धडधडू लागलं. तरी धीर करून तार वाचली. ती तार हे गेल्याची होती!
नंतर स्वत:ला सावरून आई-बाबांना धीर द्यायला पुरे सहा महिने गेले. युद्ध संपल्यावर ह्यांचे एअर फोर्समधील मित्र सांत्वनाला आले. त्यांनी सांगितलं, “विमानातून शत्रूवर बॉम्ब टाकून हे परतत होते. परंतु विमानविरोधी तोफांनी भडिमार केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. तरीही सावधगिरीनं आपल्या हद्दीत त्यांनी विमान आणलंच! परंतु विमानाच्या पुढच्या भागाचे पत्रे तुटून पोटात, डोक्यात घुसले होते. शरीर रक्तबंबाळ झालं होतं. तरीही त्यांनी हुशारीनं हातात घेतलेली कामगिरी पार पाडली. स्वत:च्या जीवनाच बलिदान दिलं. परंतु सहकाऱ्यांचे प्राण वाचवले.
त्यांच्या तोंडून ऐकलेल्या युद्धाच्या रम्य कथांनी दुःखाला अभिमानाची छटा आली. लाभते जया वीरमरण भाग्याचे। वैकुंठपदी तो नाचे॥ या कवी कुंजविहारी यांच्या ओळी धीर देऊन गेल्या. माझ्या राहुललाही हीच शिकवण मी लहानपणापासून दिली. त्यामुळेच तो आज एअर फोर्समध्ये ट्रेनिंगसाठी जात आहे. ही शौर्याची परंपरा तो चालू ठेवणार आहे म्हणून मी आनंदी आहे. कारण शेवटी माणूस किती जगला, याला महत्त्व नसून तो कसा जगला याला महत्त्व आहे!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद