शाळेतील स्नेहसंमेलन निबंध मराठी | Shaletil snehasamelan essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शाळेतील स्नेहसंमेलन मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. शाळेतील गोड आठवणींपैकी एक आठवण म्हणजे शाळेतील स्नेहसंमेलन. साधारणतः दिवाळीची सुट्टी संपली की स्नेहसंमेलनाचे वारे वाहू लागतात. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने जे अनेक कार्यक्रम आयोजित केले गेलेले असतात, त्यांत प्रत्येक विदयार्थी कुठे ना कुठे सहभागी झालेला असतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे संमेलन सर्वांचे होते.
संमेलनाचे कार्यक्रम साधारणतः चार-पाच दिवस चालतात. त्यामुळे त्या आठवड्यात अभ्यासाला सुट्टी मिळते. सगळीकडे नुसता आनंदीआनंद, जल्लोष असतो. स्नेहसंमेलन व्यवस्थित पार पडावे म्हणून वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जातात. त्यांत मार्गदर्शक-शिक्षकांसह विदयार्थ्यांचा समावेश असतो. त्यामुळे संमेलनाच्या निमित्ताने विदयार्थी अनेक नव्या गोष्टी शिकतात.
संमेलनातील सर्वांत महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे विदयार्थ्यांनी बसवलेले नाटक. या नाटकाची निवड, पात्रांची निवड, त्यांची चालणारी तालीम या सर्व गोष्टींबाबत सर्व विदयार्थ्यांना उत्सुकता असते. याशिवाय वर्गांचे कार्यक्रम, वैयक्तिक कार्यक्रमही होतात आणि त्यांत भाग घेतलेल्यांना विविध पारितोषिके दिली जातात. अशा कार्यक्रमांतूनच भावी कलाकार पुढे येतात.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शाळेत स्वच्छता आणि सजावट केली जाते. व्यासपीठ सजवण्यासाठी अनेक विदयार्थी कलाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अप्रतिम सजावट करण्यात गुंतलेले असतात. मुख्याध्यापकांनी केलेली प्रशंसा आणि इतर शिक्षकांनी व दोस्तांनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप यांमुळे त्यांना खूप समाधान लाभते.
या स्नेहसंमेलनात पारितोषिकांचे वार्षिक वितरण होते. यासाठी पालकांनाही आमंत्रित केलेले असते. त्या निमित्ताने शाळेत कला व विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. प्रदर्शनांत विदयार्थ्यांची वर्षभराची सर्व मेहनत प्रत्ययाला येते. या प्रदर्शनांतील मार्गदर्शकाची, माहिती देण्याची सर्व जबाबदारीही विदयार्थीच सांभाळत असतात
.
" स्नेहसंमेलनात सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे विदयार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी यांचे सहभोजन. येथेही विदयार्थ्यांची खूप मदत होते. या सहभोजनाने या मधुर संमेलनाची सांगता होते. पण त्याच्या गोड आठवणी मनात दीर्घकाळपर्यंत रेंगाळत असतात.
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्वाचे मुद्दे वापरू शकता. )
मुददे :
- शाळेतील रम्य आठवणींपैकी एक
- स्नेहसंमेलन
- सर्वांचा सहभाग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात
- विविध स्पर्धा- वेगवेगळ्या समित्या
- शिक्षकांचे मार्गदर्शन
- विदयार्थ्यांनी सादर केलेले नाटक
- विविध गुणदर्शन
- कार्यक्रम पार पाडणारे विद्यार्थी उदयाचे कलाकार
- सभाधीटपणा
- प्रदर्शने
- पारितोषिक वितरण
- सहभोजन
- आनंद द्विगुणित
- संमेलन संपत आले की वाटणारी हुरहूर.