निसर्ग मानवाचा मित्र मराठी निबंध | nisarg ani manav essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निसर्ग मानवाचा मित्र मराठी निबंध बघणार आहोत. निबंधाची सुरुवात बालकवींनी केलेल्या कवितेपासुन केली आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनि ऊन पडे' या सारख्या कवितांतून बालकवी 'हरिततृणाच्या मखमालीच्या हिरव्या गालिच्यातला निसर्ग आपल्या डोळ्यांसमोर किती हुबेहूब उभा करतात ! किती सुखावतो तो मानवी चित्ताला !
'चाफा बोलेना चाफा चालेना।
चाफा खंत करी काही केल्या खुलेना॥' असे म्हणणारे 'बी' कवी, 'घन तमी शुक्र बघ राज्य करी' लिहिणारे भा. रा. तांबे, आम्ही कोण?' विचारणारे केशवसुत... अशी कितीतरी शारदापूजक मंडळी निसर्गाचं वर्णन का करतात? कारण त्यांना तो हवाहवासा वाटतो.निसर्गाला बहर येतो, तो श्रावणात. या महिन्यात सणांचीही एकच झुम्मडगर्दी होते. जणु आनंदपर्वणीच ! नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी सोमवार, गोकुळाष्टमी, पोळा... एकाहून एक निसर्गसन्निध नेणारे सण काय सांगतात?
या सणांच्या माध्यमातून आमच्या भारतीय संस्कृतीने मानवाला निसर्गाच्या किती जवळ आणून ठेवलेय् ! पण आम्ही खरोखरच या मित्राच्या जवळ जात आहोत काय? गुरुदेव टागोरांचे 'शांतिनिकेतन'बिनभिंतीच्या खोलीतच भरते. निसर्गसन्निध शिक्षणाची मजाच काही औरच ! 'गीतांजली' व 'रवींद्र संगीत' याशिवाय का उपलब्ध होऊ शकते? पं. नेहरूंनाही निसर्गाचे विलक्षण वेड होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उत्तुंग करण्यासाठी निसर्गाचा वाटा फार मोठा होता. काश्मीरचा निसर्ग असो वा नॉर्वेचा डोंगरमुलुख असो, ते धुंद होत. 'मेघदूत' व 'ऋतुसंहारकर्ता कालिदास हा निसर्गकवी कुणास ठाऊक नाही? त्याने निसर्गावर अपरंपार प्रेम केले.
माती नी आभाळात 'किरणांचा उघडून पसारा, देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी' म्हणत हरपणारे तात्या कुसुमाग्रज असोत वा 'माझ्या गोव्याच्या भूमी'चा अभिमान व्यक्त करणारे कविवर्य बोरकर असोत, निसर्ग याही अर्थाने मानवाचा मित्रच !
दरी-दरडीत राहणारा आमचा आदिवासी बंधू हा खरा निसर्गपुत्र. तो आमच्यासाठी इमारती लाकूड सोडून स्वत:साठी जळाऊ लाकूड तोडतो आहे. कधी शहरात आणून विकतो आहे. आम्ही त्याच्यासह हा निसर्ग बोडखा करण्याचं एक कृतघ्न कार्य करतो. त्याचाच परिणाम म्हणून ऐन पावसाळ्यातही आम्हाला आभाळाकडे नजर लावून बसावं लागतं आहे. धरित्री काळीच्या काळी राहते आहे. तिची हिरवी लेणी म्हणजेच आमची पिकं, तिच्या अंगाखांद्यावर दिसावीत, म्हणून नवस करायचे दिवस आले आहेत, आमच्याच करणीने.
निसर्ग सहस्रहस्ते देतो. आमची झोळी फाटकी नको. त्याचे बोट धरून चाललो, तर त्याच्या देणग्या पुरेपूर मिळतात आणि बोट सोडताच आम्ही भरकटतो. निसर्ग एक कुबेर आहे. झाडे, पर्वत, पशु-पक्षी, ढग, हवा, पाणी, जमीन आणि कितीतरी त्याचे घटक. त्यांच्याकडे डोळस दृष्टीने पाहिल्यास देणाऱ्याचे हात परिपूर्ण दिसतात. तसेच त्याची किमया-चमत्कार दिसतात.
इंद्रधनुष्य, भरती-ओहोटी, सूर्य-चंद्राचे भ्रमण, पर्जन्य, सूर्यप्रकाश, ढगांचा गडगडाट, विद्युल्लतेचा लखलखाट, आकाशगंगा, नक्षत्रांगण... जणु काळ्या शालूवर जरतार, विविधरंगी पाखरे नी त्यांचे संगीत, अंडी-अळी कोष अन् फुलपाखरी अवस्था, कळीचं फूल होणं इ.इ. सारं सारं तो निसर्ग' नावाचा जादूगारच करून दाखवू जाणे आणि त्याचा राग/कोपही तेवढीच किंमत मोजायला लावतो. उदाहरणार्थ भूकंप, दुष्काळ, पूर, देखण्या निसर्गाकडून मिळणाऱ्या फायद्याच्या तुलनेत हा तोटा अपेक्षितच!
निसर्ग आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, प्राणवायू देतो. धान्ये, फुले, फळे, वनस्पती, मसाल्याचे पदार्थ, कवकांपासून पेनिसिलीन, मेण, हिरडा, बेहेडा यापासून राप, रबर, रंग, कात, निलगिरी, तेले, मध, डिंक, रेशीम, प्राण्यांपासून दूध, लाख, मांस, अंडी, लोकर, कातडी आणि बरेच पदार्थ देतो.
हे सर्व वेळोवेळी प्रमाणात मिळत राहावं, म्हणून निसर्गमित्राला आम्ही काही वचनं द्यायला हवीत. तेव्हाच हा मित्र समतोल राहील. त्याच्या संतुलनासाठी आम्हीही वचनबद्ध होण्यास, निसर्ग हे आमचे विद्यापीठ होण्यास तसे प्रयत्न सिमेंटच्या जंगलाकडून सुरू झाले आहेत, ही एक समाधानाची बाब आहे.
शासनाच्या धोरणाप्रमाणे '३३ टक्के जमीन जंगलाखाली असावी.' जळगाव जिल्ह्यात ती फक्त १७ टक्के आहे. हे शितावरून भाताच्या परीक्षेसारखं आहे. देशभर हीच परिस्थिती आहे, म्हणून आम्ही सामाजिक वनीकरणाच्या कुबड्या घेतल्या आहहेत. अधिकाधिक क्षेत्रात वनीकरण करू, तरच निसर्गाचं काही ऋण फेडू शकू.
खरेतर 'मनुष्य' हाच या निसर्गाचा एक घटक आहे. म्हणून पर्यावरणाचा लोकसंख्यावाढ, औद्योगिकीकरण या राक्षसांनी चालवलेला विध्वंस बघू जाता, वृक्षारोपणाचा वेग खूप वाढवायला हवा; पण निजामपूर-जैताणे परिसरात गुरे चारणारांनी चारशे रोपे सरपणासाठी तोडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. निसर्गाला आम्ही किती जखमी नि दु:खी करीत आहोत ! चारशे बालकांची जणू निघृण हत्याच !! मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जागोजाग कचऱ्यांचे डोंगर उभे झाले असल्याचे वृत्त काय दर्शवते? भोपाळची वायुगळती दुर्घटना काय सांगते?
विषारी वायू कमी करणे, जमिनीची धूप थांबवणे, पुरावर नियंत्रण करणे, योग्य पर्जन्याचे प्रमाण राखणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हवा, जल, भू-प्रदूषणाला रोखण्याचे, ऊर्जानिर्मितीला मदत करण्याचे भिन्न उपाय शास्त्रज्ञ शोधत आहेत. 'झाडे लावणाऱ्याचे हृदयही झाडाचे असावे लागते,' असे कवी मंगेश पाडगावकर उगाचच नाही म्हणत ! प्रदूषणनियंत्रण व वृक्षसंवर्धन हे सामाजिक बंधन आम्ही मानत नाहीत, तोवर हा निसर्ग आमचा मित्र आमच्यावर खूष होणार कसा?
सौरऊर्जा, कोळसा, पेट्रोलिअमसारखी संपदा, मोती-माणकं, मासे ही अनमोल जलसंपत्ती देणाऱ्या निसर्गाची त्याच्या प्रत्येक पानन्पानाच्या पर्णछिद्राची, मातीच्या हरएक कणाकणाची आणि जलप्रवाहाच्या दरएक थेंबाची स्वच्छता, विभिन्न वन्यजीवांच्या संरक्षण-सवंर्धनाची हमी या गोष्टींचे आम्ही देणे लागतो.
पर्यावरण संकटाला सामाजिक वनीकरण हे अंतिम उत्तर ठरणार आहे. पश्चिम घाट विकास योजना, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरण, वनशेती, अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने इ.इ. योजनांद्वारे आम्ही स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध काचेसारखे पाणी आणि छाती भरभरून घ्यावासा वारा मिळवू शकू.
'वृक्षवल्ली आम्हां सोयरे' म्हणणारे तुकोबा, 'अरे धरतीची माया, तिले नाही सीमा' लिहिणाऱ्या बहिणाबाई चौधरी, 'जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरि छत्राचे छल्लाळ' वर्णणारे संत नामदेवही निसर्गाला 'सन्मित्र' म्हणून गौरवितात, हेच स्पष्ट होते...
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता.व हा निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व व्हाट्सअँप ग्रुपवर शेयर करून वृक्षाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा हि नम्र विनंती. धन्यवाद